चंद्रावर ज्वालामुखीसारखी प्रक्रिया सुरू असल्याची शक्यता

मॅफिक माऊंड असे या डोंगरसदृश्य भागाचे नाव असून तो ८०० मीटर उंच व ७५ किलोमीटर रूंद आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक मोठा टेकडीसारखा भाग असून तो लामुखीसारख्या प्रक्रियेचा परिणाम आहे.

चांद्रयानाच्या माहितीआधारे संशोधन
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक मोठा टेकडीसारखा भाग असून तो ज्वालामुखीसारख्या प्रक्रियेचा परिणाम आहे. भारताने २००८ मध्ये सोडलेल्या चांद्रयान १ प्रकल्पात मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणातून ही बाब पुढे आली आहे. मॅफिक माऊंड असे या डोंगरसदृश्य भागाचे नाव असून तो ८०० मीटर उंच व ७५ किलोमीटर रूंद आहे.
दक्षिण ध्रुव- एटकेन बेसिन नावाच्या विवराच्या मध्यावर हा भाग आहे. अभ्यासाअंती असे लक्षात आले की, हा टेकडीसारखा भाग म्हणजे ज्वालामुखीचा परिणाम आहे. ज्या आघातामुळे तेथे विवर तयार झाले त्याचवेळी तेथे ज्वालामुखी प्रक्रियाही सुरू झाली होती. बाऊन विद्यापीठाच्या पृथ्वी, पर्यावरण व ग्रहविज्ञान शास्त्राचे विद्यार्थी व संशोधक डॅनिएल मोरियार्टी यांनी सांगितले की, जर हा निष्कर्ष बरोबर असेल तर तेथे पूर्वी न पाहिलेली ज्वालामुखी प्रक्रिया दिसून आली आहे. मॅफिक माउंड ( मॅफिक म्हणजे पायरॉक्झेन व ऑलिव्हाईन यांसारख्या खनिजांनी संपृक्त खडक) हा पहिल्यांदा मोरियार्टी यांचे सल्लागार व ब्राऊन विद्यापीठाचे भूगर्भतज्ज्ञ कार्ली पीटर्स यांनी १९९० मध्ये शोधून काढला होता. यात आश्चर्याची बाब म्हणजे त्याचा आकार पुरेसा मोठा आहे व त्याची खनिज रचना वेगळी आहे. हा डोंगरासारखा भाग कॅल्शियम पायरॉक्झिनने भरलेला आहे व इतर खडकात मात्र कमी कॅल्शियम आहे. मोरियार्टी व पीटर्स यांच्या मते इतर चांद्र मोहिमातून माहिती मिळत होती तरी भारताच्या चांद्रयानावरील चंद्र खनिज शोधक यंत्राने जी खनिजशास्त्रीय माहिती पाठवली आहे ती मोलाची आहे. नासाच्या ल्युनर ऑर्बिटर लेसर अल्टीमीटर या यानाने स्थानशास्त्रीय माहिती पाठवली होती त्यात त्या भागात गुरूत्वीय गुणधर्म विपरित असल्याचे समजले होते. दोन्ही माहितीसंचांचा वापर करून मॅफिक माउंड हा दोन ज्वालामुखी प्रक्रियांमुळे तयार झाला असावा व ती प्रक्रिया साऊथ पोल ऐटकेन आघातामुळे सुरू झाली असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्या आघातामुळे खडक वितळले व ५० किलोमीटर खोलीचे विवरही तयार झाले होते. तो वितळलेला भाग थंड होऊन आकुंचन पावला व अजूनही त्याच्या मध्यभागी वितळलेला लाव्हारस असावा तो टुथपेस्टमधून पेस्ट बाहेर यावी तसा बाहेर आला व त्यातून हा मोठा डोंगर ज्वालामुखी प्रक्रियेतून तयार झाला. त्यातून या डोंगरसदृश्य भागाची खनिजशास्त्रीय रचना वेगळी का आहे याचे उत्तर मिळत आहे. साऊथ पोल ऐटकेन या आघातामुळे जो थर वितळलेला होता त्याचे स्फटिकीकरण झाले व नंतर त्यातून जो लाव्हा बाहेर पडला त्यात कॅल्शियम पायरॉक्झिन भरपूर आहे व ते या डोंगराच्या खनिजशास्त्रीय माहितीशी जुळते आहे.

दुसरी एक शक्यता म्हणजे चंद्रावरील साऊथ पोल ऐटकेन आघातामुळे त्याचे कवच वितळले असावे त्यामुळे त्या दरीतून टनावारी खडकद्रव्य बाहेर फेकले गेले असावे व त्यातून कमी गुरूत्वाचा प्रदेश बनला असावा. हे संशोधन जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Unique volcanic process found on moon