Benefits Of Eating Poha With Lemon: सकाळी खूप गडबड आहे, नाष्टा काय करणार? जाऊदे चटकन पोहे बनवूया. फारशी भूक नाही आणि रात्री फार जड जेवण नसावं म्हणतात, जाऊदे चला चटकन पोहे बनवूया. एरवी वेळ वाचवायला बनवले जाणारे पोहे आपल्याला किती धष्टपुष्ट करू शकतात हे आज आपण पाहणार आहोत. छान वाफाळत्या पोह्यांची डिश, त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं, शेव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबाचा रस, तोंडाला पाणी सुटेल अशी पोह्यांची रेसिपी जितकी सोपी आहे तितकी आरोग्यदायी असते. विशेषतः पोह्यांवरील काही थेंब लिंबाचा रस त्याचे पोषण वाढवू शकतो. असं का? चला तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह प्रशिक्षक, कन्निका मल्होत्रा ​​यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पोहे हे कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शाश्वत ऊर्जा मिळते. पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) साधारणपणे कमी ते मध्यम श्रेणीत (३८ ते ६४ दरम्यान) मानला जातो, हे मूल्य पोह्याची जाडी आणि तयारीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर घटकांवर अवलंबून असते. याचा अर्थ रिफाईंड पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत पोह्यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर मंद आणि अधिक नियंत्रित प्रभाव पडतो.

आता, जर तुम्ही तुमच्या पोह्यात लिंबाचा रस टाकला तर तुम्ही हा नाश्ता अधिक पौष्टिक बनवू शकता. मल्होत्रा ​​सांगतात की, लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा अंश जोडतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि लोह शोषणास मदत होते. तुम्ही तुमचे पोहे कसे तयार करता यावर तुम्हाला किती पोषण मिळणार हे ही अवलंबून असते. म्हणजे तुम्ही वापरलेल्या डाळी, शेंगदाणे हे प्रथिने जोडतात तसेच काजू, सुकामेवा हे निरोगी फॅट्स जोडू शकतात.

पोह्यांवर लिंबाचा रस टाकण्याचे फायदे

रक्तातील साखरेवर नियंत्रण: पोह्यातील कमी ग्लायसेमिक इंडेक्स (पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.

पाचक आरोग्य: पोह्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, तर लिंबाचा रस पचनास मदत करू शकतो.

हायड्रेशन आणि व्हिटॅमिन सी बूस्ट: लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा डोस प्रदान करतो, जो संपूर्ण आरोग्य सुदृढ राखण्यास मदत करू शकतो.

पोह्यावर लिंबाचा रस टाकताना ‘ही’ काळजी घ्यावी

पोर्शन कंट्रोल: पोहे हा कार्ब्सचा स्रोत आहे त्यामुळे सेवन करताना प्रमाणाचे भान राखणे आवश्यक आहे. साधारण एका वेळी मूठभर पोहे खाणे योग्य ठरेल.

वारंवारता: संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पोह्याचा आस्वाद घ्या, याला तुमचे नियमित जेवण बनवू नका.

साखर आणि क्षार: आधीच पॅक केलेल्या पोह्यांच्या मिश्रणात जास्त साखर आणि सोडियम असू शकते जे पोह्याच्या पोषणाला मारक ठरते.

लिंबाचा रसच नव्हे पोह्यांमध्ये ‘या’ वस्तू जोडून वाढवा पोषण

प्रथिने: प्रथिने वाढवण्यासाठी चिरलेल्या भाज्या (मटार, गाजर), चणाडाळ किंवा उकडलेले अंडे घालू शकता.

आरोग्यदायी फॅट्स: निरोगी फॅट्ससाठी बदाम, सूर्यफूल बिया किंवा फ्लेक्ससीड्स, काजू घालू शकता.

मसाले: चव आणि फायद्यांसाठी हळद, जिरे आणि मिरची पावडर सारख्या मसाल्यांचा पोह्यात नक्की वापर करता येईल.

हे ही वाचा<< Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू

​​रिफाईंड तेलांऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाचे तेल यांसारखे हृदयासाठी फायदेशीर तेल निवडावे. साखर किंवा शेव, भज्या असे पदार्थ पोह्यांवर टाकू नका यामुळे विनाकारण फॅट्स वाढू शकतात. त्याऐवजी आपण कोथिंबीर भुरभुरून नक्की घालावी.