शरीरात यूरिक अॅसिड तयार होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरातील प्यूरिन नावाच्या रसायनाचे विघटन झाल्यावर यूरिक अॅसिड तयार होते. साधारणपणे किडनी हे यूरिक अॅसिड फिल्टर करून मूत्रावाटे बाहेर टाकते. मात्र जेव्हा शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त वाढते किंवा किडनी ते नीट बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते सांध्यांमध्ये खड्यांच्या( क्रिस्टलच्या स्वरूपात साचू लागते. त्यामुळे सांध्यात वेदना, सूज, पायाच्या बोटांत आणि टाचांमध्ये त्रास जाणवू लागतो.
यूरिक अॅसिड वाढण्यामागे आहारातील काही पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः बिअर, वाटाणा, बीन्स आणि काही प्रकारच्या माशांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास शरीरातील प्यूरिन वाढते. अशा वेळी औषधांसोबत योग्य आहार पाळणे अत्यंत गरजेचे ठरते. काही फळे अशी आहेत ज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास यूरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
चेरीचे सेवन ठरू शकते फायदेशीर (Cherry Benefits)
चेरी हे यूरिक अॅसिड नियंत्रणासाठी उपयुक्त मानले जाणारे फळ आहे. चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी घटक आढळतात. हे घटक शरीरातील सूज आणि दाह कमी करण्यास मदत करतात. नियमित चेरी खाल्ल्याने सांध्यांमध्ये यूरिक अॅसिडचे खडे तयार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. तसेच संधिवाताचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते.
रोज सफरचंद खाल्ल्याने मिळू शकतो फायदा (Apple Benefits)
सफरचंद हे आरोग्यासाठी उपयुक्त फळ मानले जाते. रोज आहारात सफरचंदाचा समावेश केल्यास शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. सफरचंदात फायबर मुबलक प्रमाणात असल्याने ते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. नियमित दोन सफरचंद खाल्ल्यास यूरिक अॅसिडशी संबंधित काही लक्षणे कमी होण्यास मदत मिळू शकते.
बेरीज प्रकारची फळेही ठरतात उपयोगी (Berries Benefits)
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रासबेरी यांसारख्या बेरीज प्रकारातील फळांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ही फळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात आणि यूरिक अॅसिड सांध्यांमध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात साचण्यापासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात. याशिवाय या फळांमध्ये असलेले फायबर रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक ठरू शकते.
लिंबूपाण्याचा नियमित वापर उपयुक्त (Lemon Water Benefits)
यूरिक अॅसिड वाढले असल्यास लिंबूपाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. एका ग्लास पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून पिण्याची सवय लावल्यास शरीरातील आम्लता संतुलित ठेवण्यास मदत होते. लिंबामध्ये असलेले सिट्रिक अॅसिड शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यक मानले जाते.
यूरिक अॅसिड नियंत्रणासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक (Dietary Care for Uric Acid Control)
यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहणे पुरेसे नसते. योग्य आहार, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम यांचाही मोठा वाटा असतो. जास्त प्यूरिन असलेले पदार्थ कमी करणे, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे यामुळेही यूरिक अॅसिडची पातळी संतुलित ठेवता येऊ शकते.
टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
