युरिक ॲसिड हा शरीरात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे, जो प्रामुख्याने प्युरिन्सच्या विघटनातून तयार होतो. सामान्यतः, मूत्रपिंडे ते गाळून मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकतात. तथापि, जेव्हा युरिक ॲसिड अतिरिक्त प्रमाणात जमा होते किंवा मूत्रपिंडे ते पुरेशा प्रमाणातक बाहेर टाकू शकत नाहीत, तेव्हा रक्तातील त्याची पातळी वाढू शकते. काही लोकांमध्ये, दीर्घकाळ युरिक ॲसिडची पातळी जास्त राहिल्यामुळे सांध्यांमध्ये स्फटिक जमा होऊ शकतात, ज्यामुळे गाऊट, वेदना, लालसरपणा आणि सूज यांसारख्या समस्या उद्भवतात. वाढलेल्या युरिक ॲसिडच्या पातळीमुळे केवळ सांधे आणि बोटांमध्ये तीव्र वेदना, सूज आणि ताठरपणाच येत नाही, तर त्यामुळे गाउट आणि किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे)देखील होऊ शकतात. अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि प्युरिनयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे रक्तामध्ये युरिक ॲसिड वेगाने जमा होऊ शकते. त्यामुळे अनेक लोक नैसर्गिकरीत्या त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर करतात.

आयुर्वेदात मेथीचे दाणे हा अनेक समस्यांवर प्रभावी उपचार मानला जातो; पण युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी तो खरोखरच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का? आयुर्वेदिक आणि युनानी औषधशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी म्हणतात की, मेथीच्या दाण्यांचे सेवन युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी आहे. जर तुम्ही मेथीच्या दाण्यांपासून पेय बनवून त्याचे सेवन केले, तर ते सांधेदुटटपखी आणि सूज नियंत्रित करू शकते. या पेयामध्ये हळद, धणे, जिरे, मेथी आणि काळी मिरी यांचा समावेश असतो. हे विशेष मिश्रण दररोज प्यायल्याने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होऊ शकते.

मेथीचे दाणे युरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यास कशी मदत करतात?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर, सॅपोनिन्स, फ्लेवोनॉइड्स आणि इतर बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात, ज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच पारंपरिकरीत्या सांध्यांच्या आरोग्यासाठी मेथीचा वापर केला जातो. मेथीचे दाणे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि युरिक ॲसिड काढून टाकण्यास मदत करतात, तसेच मूत्रपिंडांनाही आधार देतात. मेथीचे दाणे आणि पाने दाहशामक गुणधर्म आणि विविध अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे शरीरातील सूज आणि वेदना नियंत्रित करण्यास मदत करतात.

धणे, जिरे आणि मेथीचे दाणे कसे कार्य करतात?

धणे नैसर्गिक मूत्रवर्धक मानले जातात, जिरे पचन व किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, आणि मेथी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणारी मानली जाते. हे तीन स्वयंपाकघरातील मसाले शरीरातील युरिक ॲसिड बाहेर टाकण्यास किंवा किडनी स्वच्छ करण्यास मदत करतात.

हे पेय कसे बनवायचे?

हे पेय बनवण्यासाठी, दोन कप पाण्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे, अर्धा चमचा जिरे आणि रात्रभर भिजवलेली मेथीची पूड घालून सुमारे १० मिनिटे उकळवा. शेवटी चिमूटभर काळी मिरी घालून गाळून घ्या. चवीसाठी तुम्ही लिंबू किंवा थोडे मध घालू शकता. हे पेय रिकाम्या पोटी किंवा दररोज ठरावीक प्रमाणात चार ते सहा आठवडे सेवन केल्याने युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

युरिक ॲसिडच्या बाबतीत पाणी पिणे खूप महत्त्वाचे

शरीरातील पाण्याचे प्रमाण सामान्य राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे आणि त्यामुळे मूत्रपिंडांना लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मूत्रपिंड किंवा हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी पाणी पिण्याच्या प्रमाणाबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

युरिक ॲसिड वाढल्यावर काय टाळावे?

जर तुम्हाला युरिक ॲसिड किंवा गाऊटचा त्रास असेल, तर अवयवांचे मांस, अतिरिक्त लाल मांस, काही प्रकारचे समुद्री खाद्यपदार्थ, मद्य आणि साखरयुक्त पेये यांचे सेवन मर्यादित करा. तसेच, आपले वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित शारीरिक व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.

घरगुती उपाय युरिक ॲसिडच्या औषधांना पर्याय ठरू शकतात का?

जर एखाद्या व्यक्तीला वारंवार गाऊटचा झटका येत असेल किंवा युरिक ॲसिडची पातळी सतत वाढलेली असेल, तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. तुमचे डॉक्टर आवश्यकतेनुसार औषधे आणि नियमित तपासणीची शिफारस करू शकतात. घरगुती पेये किंवा हर्बल उपाय हे तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे थांबवण्याला किंवा त्यांच्या जागी वापरण्याला पर्याय नाहीत.