Home Remedies For Urine Burning Infection In Summer : उन्हाळ्यात अनेकांना खूप घाम येतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन होते. त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. या काळात अनेक महिला आणि पुरुषांना लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच युरिन इंफेक्शन (UTI) झाल्याचे निदान होते. याचा अर्थ असा नाही की, ही समस्या फक्त हिवाळ्यातच जाणवते, तर अनेकांना उन्हाळ्यातही मोठ्या संख्येने लोकांना याचा त्रास होतो. पण खरंच कडक उन्हामुळे युरिन इंफेक्शनचा त्रास वाढतो का? याविषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयातील युरॉलॉजी डिपार्टमेंटच्या व्हाइस चेअरमन डॉ. अमरेंद्र पाठक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, उन्हाळ्यात युरिन इंफेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढते. कडक उन्हात युरिन इंफेक्शन होण्याचे मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन. जेव्हा आपण पुरेसे पाणी पीत नाही तेव्हा शरीर कमी लघवी तयार करते. लघवीद्वारे केवळ टाकाऊ पदार्थच बाहेर पडत नाहीत, तर मूत्रमार्गात असलेले जीवाणूदेखील बाहेर पडतात. जेव्हा लघवीचे प्रमाण कमी असते तेव्हा ई-कोलायसारखे हानिकारक जीवाणू मूत्रमार्गात चिकटून राहतात. म्हणूनच या काळात लघवी जाड आणि गडद पिवळी होते, जे युरिन इंफेक्शनचे पहिले लक्षण असते.
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने व्यक्तीच्या गुप्त भागाभोवती ओलावा राहतो. या ओलाव्यामुळे जीवाणू वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. अशाने युरिन इंफेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, विशेषतः शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये आणि जे लोक जास्त वेळ घामाने भिजलेले कपडे घालतात त्यांना हा त्रास अधिक होतो. त्याशिवाय उन्हाळ्यात सार्वजनिक तरणतलावाचा (स्विमिंग पूल) जास्त वापर केल्यानेदेखील यूटीआयचा प्रादुर्भाव वाढतो. बहुतेक लोक यूटीआयच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात; परंतु असे केल्याने संसर्ग अधिक गंभीर होऊ शकतो आणि स्थिती बिघडू शकते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, कमी प्रमाणात लघवी होणे, लघवी करताना तीव्र वेदना आणि जळजळ, ओटीपोटात जडपणा आणि लघवीला तीव्र वास येणे ही यूटीआयची प्रमुख लक्षणे आहेत. जर संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पसरला तर रुग्णाला कंबरदुखी, थंडी वाजून ताप येणे अशा शारीरिक समस्या जाणवू शकतात. अशा परिस्थितीत, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. पाठक यांनी स्पष्ट केले की, संसर्ग टाळण्यासाठी, उन्हाळ्यात दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी किंवा कोणतेही ज्यूस प्या. दररोज पाणी, नारळपाणी व ताक प्या. कॅफिन व अल्कोहोल टाळा, कारण- ते शरीराला डिहायड्रेट करते. उन्हाळ्यात वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, हलके सुती कपडे घाला.
तसेच कधीही लघवी रोखून ठेवू नका. कारण- लघवीचा प्रवाह स्थिर न राहणे वा दुभंगणे हे संसर्गाचे एक सामान्य कारण आहे. जर जास्तच त्रास होत असेल, तर युरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.
