scorecardresearch

जास्त दिवस केळी टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती; नक्की दिसेल फरक

केळी जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्पे उपाय करू शकता.

जास्त दिवस केळी टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती; नक्की दिसेल फरक
Photo : Freepik

केळी हे फळ सर्वांना आवडते, त्यामुळे बहुतांश घरात सकाळी नाश्त्यात केळ्यांचा समावेश असतो. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते. केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळं हे उत्तम फळ आहे. केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध असते. त्यामुळे केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. अशाप्रकारे केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात केळी हे फळ असतेच.

बहुतांश सर्वांनाच केळी आवडतात, त्यामुळे बाजारातून नेहमी जास्त प्रमाणातच केळी आणली जातात. पण केळी जास्त दिवस टिकत नाहीत. पिकलेली केळी तर कधीकधी एक-दोन दिवसांमध्येच खराब होतात. त्यामुळे केळी जास्त दिवस कशी टिकवायची हा प्रश्न सर्व गृहिणींसमोर असतो. यावर उपाय म्हणजे काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही केळी जास्त दिवस टिकवू शकता. कोणत्या आहेत त्या पद्धती जाणून घेऊया.

आणखी वाचा : या सवयींमुळे वाढतो मधूमेह होण्याचा धोका; लगेच करा बदल

केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी या पद्धती वापरा

  • बाजारातून केळी घरी आणल्यानंतर त्यांच्या देठावर प्लास्टिक किंवा कागद गुंडाळुन ठेवा. यामुळे केळी जास्त दिवस टिकतील.
  • केळी ठेवण्यासाठी विशेष हँगर बाजारात उपलब्ध असतात, त्याचा वापर करून केळी त्यात ठेवल्यास लवकर खराब होणार नाहीत.
  • ‘व्हिटॅमिन सी’ची गोळी केळी टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ची गोळी पाण्यात मिसळा आणि त्या पाण्यात केळी ठेवा. यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.
  • कधीही केळी फ्रिजमध्ये ठेऊ नये. केळ्यांना नेहमी सामान्य तापमानाला (रूम टेम्परेचर) ठेवावे.
  • बेकिंग सोडादेखील केळी टिकवून ठेवण्यात मदत करतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि या पाण्यात केळी ठेवा. नंतर थोड्या वेळाने केळी पाण्यातून बाहेर काढून सामान्य तापमानाला ठेवा. यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.
  • आंबट फळांमध्ये सायट्रिक एसिड असते. आंबट फळांच्या रसामध्ये केळी साठवल्यास, केळी लवकर खराब होणार नाहीत तसेच ती काळीदेखील पडत नाहीत.

आणखी वाचा : जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांना नसते Expiry Date; पाहा यादी

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use these tricks to store banana for longer period pns