Earth Day 2024, Throw This Items From Kitchen: २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २२ एप्रिल १९७० ला पहिल्यांदा एका चळवळीच्या माध्यमातून पृथ्वीच्या संवर्धनाचा प्रयत्न झाला होता आणि त्याच चळवळीतून ‘वसुंधरा दिन’ ही संकल्पना उदयाला आली होती. यानुसार आज आपली पृथ्वी ५४ वा वसुंधरा दिवस साजरा करत आहे. पृथ्वीवरील वाढत असलेले प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी असा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. पृथ्वीच्या संरक्षणाची चर्चा जेव्हाही होते तेव्हा एका मुद्दा प्रामुख्याने उचलून धरला जातो तो म्हणजे ‘प्लास्टिक’.

सरकारी नियमांनुसार काही वर्षांपासून कमी जाड असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत पण अजूनही अशा अनेक प्लास्टिकच्या वस्तू ज्या तितक्याच घातक ठरू शकतात त्यांना कित्येक घरात स्थान दिले जाते. आज आपण आपल्या किचनमधल्या अशा काही प्लास्टिकच्या वस्तू पाहणार आहोत ज्या पर्यावरणासह आपल्या आरोग्याला सुद्धा नुकसानदायक ठरू शकतात. ही माहिती वाचल्यावर कदाचित आपणही या वस्तू लगेचच फेकून द्याल.

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

भाज्या चिरण्यासाठी आपल्या घरातही प्लास्टिकचे बोर्ड वापरत असाल तर कदाचित तुम्ही मोठी चूक करताय. प्लास्टिक बोर्डवर जेव्हा सुऱ्यांनी चिरे पडतात तेव्हा प्लास्टिकचे कण आपण चिरत असलेल्या पदार्थामध्ये मिसळू शकतात. पुढे हेच पदार्थ आपल्या पोटात जाऊन पोटाचे विकार उदभवू शकतात.हे टाळण्यासाठी आपण शक्यतो लाकडी किंवा स्टीलचे बोर्ड भाज्या चिरण्यासाठी वापरायला हवे.

प्लास्टिक टिफिन

स्टीलच्या डब्यांना बाजूला सारून सहसा सर्वच घरांमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्लास्टिकचे टिफिन वापरले जातात. जेव्हा अशा डब्यांमध्ये गरम अन्न ठेवले जाते तेव्हा प्लास्टिक वितळून त्याचे काही अंश जेवणात मिसळू शकता. प्लास्टिक बनवतानाच बिस्फेनोफिल- ए नावाचे रसायन वापरले जाते जे उष्णतेमुळे सक्रिय होऊन डब्यातील जेवणात मिसळू शकते. हे अंश शरीरात पोहोचल्याने कर्करोगासारखे भीषण आजारही होऊ शकतात. काचेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे डबे यापेक्षा जास्त सुरक्षित ठरू शकतात.

प्लास्टिकची बॉटल

अलीकडेच कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटजर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात प्लास्टिकच्या बॉटलमधील पाण्यात प्लास्टिकचे किती अंश असतात याविषयी सांगण्यात आले आहे. संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, प्लास्टिकच्या कणांची पातळी प्रति लिटर १ लाख १० हजार ते ४ लाख किंवा सरासरी २ लाख ४० इतकी असू शकते.

हे ही वाचा<< एव्हरेस्ट फिश करी मसाल्याविरुद्ध मोठी कारवाई; जास्त सेवनाने शरीराचे किती व कसे नुकसान होते?

प्लास्टिक पिशवी

वर म्हटल्याप्रमाणे, निर्बंध असूनही अनेक घरात प्लास्टिक पिशव्या भरलेल्या पिशव्या सुद्धा बघायला मिळतात. या पिशव्या वापरात असतात तोपर्यंत पण ठीक आहे पण जेव्हा त्या फाटतात आणि कचऱ्यात टाकल्या जातात. तेव्हा त्या फक्त आजूबाजूच्या परिसरात कचरा वाढवण्याचं काम करतात. पावसाळ्यात यामुळे होणारा त्रास आपण याआधी अनुभवला आहे. त्यामुळे अशा पिशव्या वापरणे पूर्णतः टाळायला हवे. त्याऐवजी कापडी पिशव्या उत्तम पर्याय ठरतात.