How Probiotics Can Help Prevent UTI: महिलांमध्ये वारंवार होणाऱ्या सूरिनरी इंफेक्शनचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम होतो. जेव्हा यूटीआय अर्थात (यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन) वारंवार होते, तेव्हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढतो. यूटीआय टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यांप्रमाणे प्रोबायोटिक्सचे सेवन करणे फायदेशीर ठरते. प्रोबायोटिक्स चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळे हानिकारक बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.

यूटीआय वारंवार का होते?

वारंवार होणाऱ्या यूटीआयचे एक प्रमुख कारण म्हणजे योनी आणि मूत्रमार्गामध्ये चांगल्या बॅक्टेरियांची कमतरता असणे. यामुळे हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे यूटीआयचा धोका वाढतो. ज्या महिला कमी पाणी पितात, स्वच्छतेचा अभाव ठेवतात आणि दीर्घकाळ लघवी रोखून धरतात, त्यांच्यामध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग अर्थात यूटीआय अधिक सामान्यपणे आढळते.

प्रोबायोटिक्स यूटीआयला कसे रोखतात? प्रोबायोटिक्स केवळ बॅक्टेरियांचे संतुलन राखत नाहीत, तर मूत्रमार्गाचा एपिथेलियल अडथळा देखील मजबूत करतात. हा अडथळा शरीराच्या पहिल्या संरक्षक थराप्रमाणे काम करतो. तो बाहेरील संसर्गाला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतो. प्रोबायोटिक्स सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. प्रोबायोटिक्सचे सेवन केल्याने संसर्गामुळे होणाऱ्या वेदना आणि जळजळीपासून आराम मिळतो.

प्रोबायोटिक्समध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया शरीरातील मायक्रोबायोटा म्हणजेच बॅक्टेरियांचे संतुलन राखतात. जेव्हा हे संतुलन बिघडते आणि हानिकारक जीवाणू वाढू लागतात, तेव्हा मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. प्रोबायोटिक्समधील चांगले जीवाणू शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि वाढलेल्या हानिकारक जीवाणूंचे असंतुलन सुधारून संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

यूटीआय कसे टाळावे?

मूत्रमार्गाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रोबायोटिक्स घेण्याव्यतिरिक्त काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी उपयोगी ठरू शकतात.

  • पुरेसे पाणी प्या- मूत्रमार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. त्यामुळे शरीरातील जीवाणू बाहेर टाकले जात राहतील.
  • वैयक्तिक स्वच्छता राखा- स्वच्छतेच्या अभावामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखा. मासिक पाळीच्या काळा विशेष स्वच्छता राखा.
  • लघवी रोखून धरू नका- जास्त वेळ लघवी रोखून धरल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. नोकरी करणाऱ्या महिला ज्या घरापासून दूर असतात, त्या जास्त वेळ लघवी रोखून धरतात. अशा महिलांना यूटीआय होण्याचा धोका अधिक असतो.
  • प्रोबायोटिक अन्न खा- मूत्रमार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी दही, ताक, आंबवलेले पदार्थ यासारख्या प्रोबायोटिक अन्नाचा आपल्या आहारात समावेश करा.

यूटीआय झाल्यास काय करावे?

जर तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग झाला असेल, तर सर्वात आधी त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे ओळखा आणि त्वरित उपचार घ्या.

यूटीआयची लक्षणे ओळखा- जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल, वारंवार लघवी येत असेल किंवा पोटाच्या खालच्या भागात दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही यूटीआयची सुरूवातीची लक्षणे असू शकतात. वेळेवर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यूटीआयवरील उपचार थांबवू नका- जर तुम्हाला यूटीआय झालं असेल, तर विलंब न करता उपचार घ्या. जर संसर्ग पसरला, तर त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचारादरम्यान औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. औषधोपचार थांबवल्याने संसर्ग पुन्हा होण्याचा धोका वाढतो.

पती-पत्नी दोघांवरही उपचार आवश्यक- जरी एका जोडीदाराला मूत्रमार्गाचा संसर्ग झाला तरी, दोघांनीही उपचार घ्यावेत. यामुळे संसर्ग एका जोडीदाराकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

औषधाच्या निवडीकडे लक्ष द्या- जेव्हा तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग होतो, तेव्हा तुमचे औषध हुशारीने निवडा आणि स्वत:च्या मनाने औषधोपचार करू नका. चुकीचे औषध घेतल्याने समस्या अधिक गंभीर होऊ शकते आणि जीवाणूंची औषधाविरूद्धची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे औषधाचा प्रभाव कमी होतो.

यूटीआयला हलक्यात घेऊ नका

यूटीआय ही एक सामान्य आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. योग्य आहार घएणे, पुरेसे पाणी पिणे आणि आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करणे यामुळे ही समस्या बऱ्याच अंशी टाळता येते. चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे देखील महत्त्वाचे आहे. तरीही मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यास त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.