Vaginal Burning Causes : योनीमध्ये सतत होणारी जळजळ आणि खाज या समस्येने अनेक महिला त्रस्त असतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. सामान्यतः महिलांना असे वाटते की, वैयक्तिक स्वच्छता (इंटिमेट हायजीन) न ठेवल्यामुळेच योनीमध्ये इन्फेक्शन होते, परंतु केवळ हेच एकमेव कारण नाही. वैयक्तिक स्वच्छता न पाळणे हे एक प्रमुख कारण नक्कीच असू शकते, परंतु याव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी याला कारणीभूत असतात. आहारातील काही ठराविक पदार्थांचे अतिसेवनसुद्धा योनीमध्ये जळजळ होण्याचे कारण ठरू शकते.
याविषयावर एका वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य आणि वेलनेस तज्ज्ञ डॉ. सोनू खोखर (MBBS) यांनी सविस्तर माहिती दिली आहेय
योनीमध्ये जळजळ का होते?
योनीमध्ये वारंवार जळजळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये ईस्ट इन्फेक्शन (Yeast Infection), बॅक्टेरियल व्हॅगिनोसिस (Bacterial Vaginosis), युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI), हार्मोन्समधील बदल, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव आणि योनी कोरडी पडणे (Vaginal Dryness) ही सर्वात सामान्य कारणे आहेत. जर जळजळीसह जास्त डिस्चार्ज, तीव्र खाज, दुर्गंधी किंवा वेदना होत असतील, तर अजिबात उशीर न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुमचा आहार ठरू शकतो जळजळीचे कारण
योनीमध्ये सतत होणाऱ्या तीव्र जळजळीमागे आपला आहारही काही प्रमाणात जबाबदार असू शकतो. अतिप्रमाणात मसालेदार, ॲसिडिक किंवा कॅफिनयुक्त पदार्थ आणि पेये घेतल्यानंतर अनेक महिलांना योनीच्या भागात जळजळ जाणवते. अनेकदा लघवी करतानाही तीव्र जळजळ होते.
मसालेदार अन्न ब्लॅडर आणि युरिनरी ट्रॅक्टच्या अस्तरामध्ये (lining) जळजळ निर्माण करते. याचा थेट परिणाम योनीच्या pH लेव्हलवर होतो. pH चे संतुलन बिघडल्यामुळे योनीमध्ये जळजळ होऊ शकते.
याचे आणखी एक कारण म्हणजे मसालेदार अन्नामुळे पचनाच्या समस्या वाढतात. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यावर ते पचवण्यासाठी शरीर अधिक ॲसिड तयार करते, ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्स वाढू शकतो. याचा परिणाम पेल्विक भागावरही होतो.
मिरची आणि मसाले काही लोकांमध्ये ब्लॅडर व युरिनरी इन्फेक्शनची लक्षणे वाढवू शकतात. जर मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर लघवीमध्ये जळजळ किंवा त्रास होत असेल, तर त्याचे सेवन कमी करा. तसेच, जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानेही व्हॅजायनल इन्फेक्शनचा धोका वाढतो, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक वाढते.
योनीच्या उत्तम आरोग्यासाठी काय खावे?
इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी आहारात काही महत्त्वाचे बदल करू शकता:
- निरोगी आणि संतुलित आहार घ्या.
- शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा (हायड्रेटेड राहा).
- शहाळ्याचे पाणी प्या.
- प्रोबायोटिक पदार्थांचा (उदा. दही) आहारात समावेश करा.
- साखर, प्रोसेस्ड फूड, अतिमसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वारंवार खाज किंवा जळजळीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारात योग्य बदल करा, स्वच्छतेची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.
