Valentine’s day: १९९२ च्या मुंबई दंगलीत फुललेली हिंदू-मुस्लिम प्रेम कहाणी

सना दिवाळीसाठी कुटुंबीयांसोबत खरेदी करत असताना, तो तरुण तिला पहिल्यांदा भेटला होता.

Idris and Sana Khan

नुशायबा इक्बाल

‘ते’ १९७८ चं वर्ष होतं. त्यावेळचा सुपर डूपर हिट चित्रपट ‘मुकद्दर का सिकंदर’ मधील ‘सलाम-ए-इश्क’ गाण्यावर तिचं नृत्य सुरु होतं. आपल्या लाजवाब नृत्य अदांनी तिने समोर बसलेल्या प्रेक्षकांवर एक प्रकारची मोहिनी करुन सोडली होती. कॉलेज गॅदरींगमध्ये सोफीया कॉलेजच्या या मुली नृत्याचा कार्यक्रम सादर करत असताना प्रेक्षक रांगेत पुढच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाकडे तिची नजर गेली. तो तरुण तिच्याकडे एकटक पाहत होता. महाराष्ट्र कॉलेज ऑफ आटर्स, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात शिकणाऱ्या त्या तरुणाला काही दिवसांपूर्वी भेटल्याचं सना खानच्या (४८) लक्षात आलं.

सना दिवाळीसाठी कुटुंबीयांसोबत खरेदी करत असताना, तो तरुण तिला पहिल्यांदा भेटला होता. पहिल्या नजरा-नजरेतच दोघांच्या मनातील प्रेमभावना परस्परांना कळल्या होत्या. त्याने त्याचा फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी सनाच्या हातात दिली. त्या तरुणाचं नाव होतं इद्रिस खान. आमंत्रण नसताना, फक्त सनासाठी तो तिच्या कॉलेजच्या गॅदरींगला आला होता.

सना खान पहिल्यांदा इद्रिसला भेटली, तेव्हा ती सपना सिंह होती. मूळची उत्तर प्रदेशातील ठाकूर समाजातील सवर्ण जातीमधील तरुणी. मुंबईत मरीन लाईन्सला तिचे कुटुंब रहायचे. दुकानात भेटलेल्या इद्रिसकडे ती पहिल्या भेटीतच आकर्षित झाली होती. तिलाही तो आवडला होता. तो मुस्लिम होता, पण त्यामुळे सपनाला काही फरक पडला नव्हता. तिच्या इद्रिस बद्दलच्या प्रेम भावना तशाच होत्या. इद्रिस सपनाच्या कॉलेजमधील कार्यक्रमाला गेला. त्यानंतर ते बऱ्याचदा भेटले पण त्यांच्या भेटीगाठी मित्र परिवाराच्या ग्रुपमध्ये असायच्या. सार्वजनिक ठिकाणी त्याने माझा हात पकडला तर काय? असा प्रश्न माझ्या मनात असायचा. त्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच भेटायचो, असे सना यांनी  सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींबद्दल सांगितले.

१९९२ चे दिवस होते. अयोध्येत बाबरी मशीद पाडली होती. मुंबईत प्रचंड तणाव होता. “मशीद पाडल्याच्या दुसऱ्या दिवशी इद्रिसला फोन करण्यासाठी, मी घराबाहेर पडले. त्यावेळी मरीन लाइन्स स्टेशनजवळ संतप्त जमावानं एका मुस्लिम व्यक्तीचे दुकान पेटवून दिल्याचं मी पाहिलं. डोळयासमोरचं ते दृश्य पाहून मी इतकी हादरुन गेले की, मी लगेच मागच्या मागे घराच्या दिशेने पळाले” असे सना त्या दिवसांच्या आठवणींबद्दल बोलताना म्हणाल्या.

मुंबईतील ते दिवस हिंदू-मुस्लिम तणावाचे होते. दोन्ही समाजात परस्परांबद्दल विश्वासाची भावना कमी झालेली होती. पण त्याचा सपना आणि इद्रिसच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांना परस्परांबद्दल वाटणार ओढ, आपलुकी, प्रेम भावना कायम होत्या. “आम्हाला फक्त आमच्या पालकांची भीती वाटत होती. आमच्या लग्नाला विरोध होणार, हे माहित होतं पण कायदा आमच्या बाजूने आहे, याची आम्हाला जाणीव होती.” असे सना म्हणाल्या.

अपेक्षेप्रमाणे दोघांच्या घरी, जेव्हा या प्रेमसंबंधांबद्दल समजलं, तेव्हा दोन्ही कुटुंबातून जोरदार विरोध झालां. इद्रिस आणि सना दोघांनी आता पुन्हा भेटायचं नाही, असं सुद्धा ठरवलं पण परस्परांशिवाय आपण राहू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. सनाचे कुटुंबीय तिचं लग्न ठरवत होते. त्यावेळी आता आपल्यालाच पावल उचलावी लागतील, नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, याची तिला पुरेपूर कल्पना होती. सना इद्रिससोबत पळून जाण्याचा विचार करत होती, त्यावेळी मुंबईत जातीय दंगली सुरु होत्या.

“आम्ही मुंबईत संमिश्र अशा वस्तीत राहिलो, जिथे बरीच मुस्लिम कुटुंब सुद्धा राहत होती. माझे वडिल आणि भावाचे अनेक मुस्लिम मित्र होते. दोन्ही समाजातील मतभेदांची आम्हाला जाणीव होती. पण १९९२ च्या काळात जे पाहिलं, तशी परस्परांबद्दल द्वेषाची भावना कधीही दिसली नव्हती” असे सना म्हणाल्या.

घर सोडण्याच्या वर्षभर आधी सना स्वेच्छेने घरात कोणाला काही कळू न देता गुपचूपपणे इस्लामिक रिवाजानुसार उपवास ठेवायची, प्रार्थना करायची. आपलं लग्न ज्याच्यासोबत होणार आहे, त्या कुटुंबाच्या परंपरा, रितीरिवाज माहित असावेत, हा त्यामागे तिचा हेतू होता. कुटुंबीय तयार होत नसल्यानुळे सनाला अखेर तिच्या आई-वडिलांचे घर सोडावे लागेल. ते इद्रिसच्या चुलतभावाकडे कल्याणला आले. तिथे त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या दिवशी सपनाने धर्मांतर करुन सना हे नवीन नाव धारण केले.

लग्न झालं पण त्यानंतर दोघांसमोरचा मार्ग खडतर होता. दोन्ही कुटुंबांची मान्यता मिळवण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांच्या मनात रागाची भावना होती. “लग्नानंतर तीन महिन्यांनी माझ्या कुटुंबाने स्वागत समारंभ आयोजित केला होता. सनाच्या कुटुंबियांना लग्नाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे घाईघाईत निकाह उरकल्याचे आम्ही स्वागत समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना सांगितले” असे इद्रिस (५६) म्हणाले. लग्नानंतर वर्षभराने सनाने मुलाला जन्म दिला. पण त्या नंतरही तिच्या कुटुंबाने या लग्नाला मान्यता दिली नाही.

लग्नानंतर चार वर्षांनी सनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिला पहिल्यांदा घरी बोलावलं. त्यावेळी तिथे नेमकं काय घडणार? याची इद्रिसला चिंता लागून राहिली होती. पण इद्रिसला जी चिंता होती, तसं काही घडलं नाही. सनाच्या आई-वडिलांनी दोघांचा मनाने स्वीकार केला, त्यावेळी जे अश्रू आले, ते आनंदाश्रू होते.

मागच्या महिन्यात सनाच्या मुलाचं लग्न झालं. त्यावेळी सनाच्या काक्या, चुलत भावंड सगळे खास वाराणासीहून लग्नासाठी आले होते. त्यावेळी एक सुंदर गेट-टुगेदर रंगल्याचं ती सांगते. यावेळी आम्हाला माझे स्वर्गवासी वडिल आणि सासऱ्यांची उणीव जाणवली. “प्रेमाला विरोध करणं निरर्थक आहे, पण तरीही लोक का विरोध करतात?” असा सना स्वत:च्या अनुभवावरुन सांगते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Valentines day special a romance bloomed in the shadow of the 1992 bombay riots dmp

ताज्या बातम्या