व्हेरिकोज व्हेन्स आणि स्क्लेरोथेरपी

आपल्या पायातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात प्रवाहित होते.

सौंदर्यभान : डॉ. शुभांगी महाजन

आपल्या पायात अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यत: दोन मोठय़ा रक्तवाहिन्या (शिरा) असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने रक्त जमा होते आणि त्यामुळे त्या शिरा फुगतात. या त्रासाला व्हेरिकोझ व्हेन्स (varicose veins) म्हणजे मराठीत ‘अपस्फित नीला’ असे म्हणतात.

कारणे

 • उतारवयात म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर व्हेरिकोझ व्हेन्सचा त्रास होऊ  शकतो
 • कौटुंबिक आनुवंशिकता असल्यास
 • बराच काळ उभे किंवा बसून राहण्याची सवय असल्यास
 • गरोदरपणात स्त्रियांना हा त्रास होऊ  शकतो
 • लठ्ठपणामुळे
 • व्यायामाचा अभाव
 • सिगारेट धूम्रपान यांसारख्या व्यसनांमुळे

आपल्या पायातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात प्रवाहित होते. त्यासाठी या रक्तवाहिन्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे पडदे असतात जे एकाच दिशेने रक्तप्रवाह करण्यास साहाय्यक ठरतात. मात्र, जास्त वेळ उभे राहिल्याने वा बसल्याने शिरांमध्ये ताण निर्माण होतो व पडदे निकामी होतात. त्यामुळे रक्त आपल्या हृदयाकडे जाण्याऐवजी शिरांमध्ये जमा होते आणि शिरा फुगतात. यालाच व्हेरिकोझ व्हेन्स असे म्हणतात.

लक्षणे

 • पायाला सूज येणे व पाय दुखणे
 • पायामध्ये असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे
 • पायाच्या पोटऱ्या दुखणे
 • पायावर निळ्या नसा फुगलेल्या दिसणे अथवा पाय काळवंडलेला दिसणे
 • कधी कधी पायावर अल्सर अथवा जखम निर्माण होणे

निदान

व्हेरिकोझ व्हेन्सच्या शंभर टक्के निदानासाठी ‘डॉपलर स्कॅन’ करण्याचा सल्ला दिला जातो. ‘डॉपलर स्कॅन’ ही एक प्रकारची सोनोग्राफी चाचणी आहे, ज्यात रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत आहे की नाही हे कळते.

उपचार पद्धती

१) कंप्रेशन स्टॉकिंग्स

‘कंप्रेशन स्टॉकिंग्स’ म्हणजे पायाच्या टाचेपासून मांडीपर्यंत नसांना सपोर्ट करणारे मोजे वापरणे. हे मोजे दिवसभर वापरावे लागतात. ते पायात घातल्यामुळे शिरांमध्ये रक्त जमा होत नाही. तसेच व्हेरिकोझ व्हेन्समुळे आलेली सूज कमी होण्यासही मदत होते

२) स्क्लेरोथेरपी (इंजेक्शन) थेरपी

स्क्लेरोथेरपी व्हेरिकोझ आणि स्पायडर व्हेन्सचा उपचार प्रभावीपणे करते. स्क्लेरोथेरपीमध्ये थेट शिरांमध्ये द्रावण इंजेक्ट केले जाते. त्यामुळे शीर व्रण पावते आणि त्यातील रक्त निरोगी नसांद्वारे पुन्हा मार्गस्थ होते. व्रण पावलेल्या शिरा स्थानिक ऊतकांमध्ये पुन्हा शोषल्या जातात आणि अखेरीस फिकट होतात. कधी कधी पूर्ण परिणाम पाहण्यासाठी एक महिना किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. काही वेळा अनेक स्क्लेरोथेरपी उपचारांची आवश्यकता भासू शकते.

३) एंडोव्हेनस लेजर अ‍ॅबलेशन

हे एक अत्याधुनिक तंत्र आहे. ‘एंडोव्हेनस लेजर अ‍ॅबलेशन’मध्ये लेसर किरणांच्या साहाय्याने व्हेन्समधील रक्तप्रवाह थांबवला जातो

४) रेडिओफ्रिक्वेन्सी अ‍ॅब्लेशन

यामध्ये फक्त एका सुईच्या छिद्राने आपण प्रभावित झालेल्या नसा पूर्णपणे बंद करू शकतो.

५) शस्त्रक्रिया

व्हेरिकोझ व्हेन्सचा त्रास अधिक होत असल्यास काही वेळा व्हेन स्ट्रीपिंग ही शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये व्हेरिकोझ व्हेन्सचा भाग काढून टाकला जातो.

प्रतिबंधात्मक काळजी

’ जीवनशैलीत बदल करणे.

’ वजन कमी करणे.

’ आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे.

’ पायाची हालचाल व नियमित व्यायाम करणे.

’ एकाच जागी फार वेळ उभे राहणे टाळणे.

’ दररोज झोपताना पायाखाली उशी ठेवणे. त्यामुळे रक्त एकाच जागी न थांबता ते हृदयाकडे जाण्यास मदत होते.

’ धूम्रपान, मद्यपान व इतर व्यसने टाळावी.

’ उंच टाचेच्या चपलेचा नियमित वापर टाळावा.

’ टाइट जिन्सचा वापर टाळावा.

स्क्लेरोथेरपीचे दुष्परिणाम

तात्पुरते दुष्परिणाम :

’ इंजेक्शनच्या ठिकाणी जखम होणे

’ त्वचेवर लाल चट्टे किंवा लहान फोड येणे

’  रेषा किंवा डागांच्या स्वरूपात त्वचा काळी होणे

’ हे दुष्परिणाम सहसा काही दिवस ते काही आठवडय़ांत निघून जातात. काही दुष्परिणाम पूर्णपणे अदृश्य होण्यासाठी महिने किंवा वर्षे लागू शकतात.

गंभीर दुष्परिणाम

’ इंजेक्शनच्या जागी सौम्य जळजळ होणे, परंतु यासोबत जर सूज, उबदारपणा आणि अस्वस्थता जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांना त्वरित संपर्क साधावा.

’ शिरामध्ये रक्ताची गुठळी तयार होऊन ती पायाच्या खोल शिरापर्यंत जाऊ  शकते (खोल शिरा थ्रोम्बोसिस).

’ फुप्फुसीय एम्बोलिझम (एक अत्यंत दुर्मीळ गुंतागुंत), एक आणीबाणीची परिस्थिती असते जिथे गुठळी आपल्या पायातून (डीप व्हेन थ्रोम्बोसिसमधून) आपल्या फुप्फुसात जाते आणि महत्त्वाच्या धमनीच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

’ हवेचे फुगे (एअर बबल). तुमच्या रक्तप्रवाहात लहान हवेचे फुगे वाढू शकतात. यामुळे नेहमीच लक्षणे उद्भवत नाहीत, परंतु जर ती झाली तर लक्षणांमध्ये दिसायला अडथळा येणे, डोकेदुखी, बेहोशी आणि मळमळ यांचा समावेश होतो.

’ अलर्जिक प्रतिक्रिया- द्रावणातील घटकांची अलर्जी होऊ  शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Varicose veins and sclerotherapy ssh

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या