Vegetables for control cholesterol: आजकाल खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढत्या ताणामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे. तळलेले पदार्थ, लाल मांस, प्रक्रिया केलेले स्नॅक्स व मिठाई यांचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचते, ज्यामुळे प्लाक तयार होतो आणि त्याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक व उच्च रक्तदाबाचा धोका दुप्पट होतो. म्हणून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, आहार आणि जीवनशैलीत काही बदल करून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.

मेडिसिनच्या एमडी डॉ. शालिनी सिंग साळुंके यांच्या मते, जर तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल, तर तुम्ही काही भाज्या खाव्यात. काही भाज्यांचे नियमित सेवन हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. या भाज्यांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी घटक भरपूर असतात. ते रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देतात. कॅलरीज कमी असलेल्या या भाज्या जवळजवळ कोलेस्ट्रॉलमुक्त असतात. त्या वजन नियंत्रित करण्यास मदत करतात आणि त्यामुळे शरीर हलके वाटते.

कंटोला

कंटोला ही एक अतिशय फायदेशीर भाजी आहे. त्यात भरपूर फायबर असते, जे शरीरातील अतिरिक्त वाईट कोलेस्ट्रॉल शोषण्यापूर्वीच बाहेर काढण्यास मदत करते. ही भाजी चरबीमुक्त आणि कमी कॅलरीज असलेली आहे. त्यामुळे ती हृदयासाठी फायदेशीर ठरते. कंटोलामध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करतात, जे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे. कंटोलाचे नियमित सेवन केल्याने धमन्या स्वच्छ राहण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुधारतो.

भेंडी

भेंडीमध्ये असलेला तंतुमयता हा घटक पेक्टिन हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हा घटक रक्तातील कोलेस्ट्रॉल बांधतो आणि तो शरीरातून काढून टाकतो. भेंडी हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहेत. भेंड्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक सूक्ष्म पोषक घटक असल्याने, ती वजन व्यवस्थापनातही उपयुक्त आहेत. कारण- त्यामुळे पोट लवकर भरण्यास मदत होऊन, जास्त खाण्यापासून प्रतिबंध होतो.

पडवळ

पडवळ ही आपल्या स्वयंपाकघरात आढळणारी एक सामान्य भाजी आहे; परंतु तिचे गुणधर्म असाधारण आहेत. त्यात विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते, जे कोलेस्ट्रॉलला बांधते आणि शरीरातून काढून टाकते. पडवळमध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि त्यात कॅलरीजही खूप कमी प्रमाणात असतात. ते वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. भोपळ्यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात.

दुधी भोपळा

दुधी भोपळ्यामध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत होऊन, रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याला प्रतिबंध होतो. नियमितपणे दुधीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते, हृदय हलके वाटते आणि सूज कमी होते. सकाळी दुधीचा रस प्यायल्याने शरीर थंड होते आणि हळूहळू वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.

कारले

कारल्याची चव कडू असू शकते; परंतु त्याचे फायदे अमूल्य आहेत. कारल्यातील फायटोकेमिकल्स आणि विरघळणारे फायबर शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स धमन्यांमधील जळजळ कमी करतात आणि रक्तवाहिन्या उघड्या ठेवतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य मजबूत होते.