How To Build Healthy Plate : दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण, प्रत्येक भारतीय घरात नेहमी एक चर्चा होते की, आपण डाळ-भात खाणार की पोळी-भाजी? आपल्यापैकी बहुतेकजण चव किंवा सोयीनुसार आपल्या ताटातील पदार्थ निवडतात. पण, त्यामुळे खरोखरच संपूर्ण फायदे मिळतात का? देशातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा संस्था भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) आता ही समस्या दूर केली आहे. पौष्टिक भारतीय थाळीचा संदर्भ देत, एफएसएसएआयने इन्स्टाग्रामवर विचारले आहे की, तुमच्या ताटात कोणत्या अन्नाचे किती प्रमाण असले पाहिजे…

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) लोकांना कुपोषण, लठ्ठपणा आणि विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करत असते. अनेकांना ताटात पोळी-भात जास्त असावा की डाळ-भात याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. याच संदर्भात एफएसएसआयने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की, तुमच्या थाळीत सर्वात मोठा भात कोणत्या अन्नाचा असावा?

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चारचा केली. कारण – योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. त्यामुळे तुमच्या ताटातील सर्वात मोठा कोणत्या पदार्थाचा असावा हे समजून घेणे गरजेचे आहे.

गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या उपाध्यक्षा डॉक्टर सुशीला कटारिया यांचा असा विश्वास आहे की, संतुलित पोषणाला चालना देण्यासाठी आणि जीवनशैलीशी संबंधित आजार टाळण्यासाठी ‘हेल्दी प्लेट’ ही संकल्पना एक प्रभावी मार्ग आहे. एफएसएसएआयच्या (FSSAI) एका प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर कटारिया म्हणाल्या की, ताटात भाज्यांचा वाटा सर्वाधिक असावा. फळांचा समावेश करणे देखील उत्तम ठरेल. कारण – फळे आणि भाज्यांच्या सेवनाने शरीराला फायबर, आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतात, पचनक्रिया सुधारतात आणि एकूणच आरोग्य सुधारतात.

तुमच्या आहारात आणखी काय असायला हवे?

डॉक्टर सांगतात फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त, तुमच्या आहारात संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे. बाजरी, गहू आणि ब्राऊन राईस यांसारखी संपूर्ण धान्ये शरीराला जास्त काळ ऊर्जावान ठेवतात. डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे आणि चरबी नसलेले मांस यांसारखे प्रथिनांचे स्रोत स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास आणि चयापचय आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

अन्नासोबतच, प्रमाणही महत्त्वाचे

लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यापैकी बहुतेक समस्या चुकीच्या खाण्याच्या सवयींशी निगडित आहेत. तज्ज्ञांच्या मते, केवळ आरोग्यदायी अन्नाचे सेवन करणेच महत्त्वाचे नाही. तर त्याचे प्रमाण आणि ते बनवण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रत्येक व्यक्तीच्या पौष्टिक गरजा वय, जीवनशैली आणि शारीरिक हालचालींच्या पातळीवर अवलंबून असतात. जे लोक जास्त शारीरिक काम करतात, त्यांना बैठ्या कामात असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त कॅलरीजची आवश्यकता असू शकते.

वय वाढत असताना शरीराच्या पोषणाच्या गरजाही बदलत जातात. तरुण वयात शरीर कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकते. तर वयोमानानुसार स्नायू मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज वाढते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आहार त्याच्या वय, आरोग्य आणि जीवनशैलीनुसार अवलंबून असणे महत्त्वाचे आहे. ‘हेल्दी प्लेट’ ही संकल्पना लोकांना रोजच्या आहारात योग्य आणि संतुलित पदार्थ निवडण्यास मदत करणारी एक सोपी मार्गदर्शिका आहे. मात्र, तिला कठोर नियम समजू नये. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असल्याने या मार्गदर्शिकेचा वापर आपल्या शरीराच्या गरजांनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे अधिक योग्य ठरते.