Vegetarian VS Non Vegetarian: शाकाहार चांगला की मांसाहारी, हा वाद प्रत्येक जेवणाच्या टेबलावर नेहमीच असतो. काहींच्या मते, शाकाहार हे दीर्घायुष्याचे गमक आहे; तर काहींच्या मते, मांसातील प्रथिने आणि पोषक तत्त्वे अधिक फायदेशीर आहेत. पण, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी कोणता आहार खरोखरच अधिक चांगला मानला जातो? चला, तज्ज्ञ आणि संशोधनाचा आधार घेऊन या प्रश्नाचा शोध घेऊया.
शाकाहाराचे फायदे काय सांगतात…?
अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, शाकाहारी लोकांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाईप २ मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी असतो. शाकाहारी लोकांचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स (BMI)देखील सामान्यतः कमी असतो. कारण- त्यांच्या आहारात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. भाज्या आणि फळांमधील व्हिटॅमिन ई, सी आणि कॅरोटीन शरीराला अंतर्गतरीत्या मजबूत करण्यास मदत करतात आणि कमी संतृप्त चरबी हृदयावरील ताण कमी करते.
मांसाहाराबाबतही नवीन दावे समोर
पूर्वीपासून असा समज होता की, शाकाहारी लोक जास्त जगतात; परंतु चीनमधील वृद्ध लोकांवर केल्या गेलेल्या एका अलीकडील अभ्यासातील संशोधनानुसार, मांसाहारी लोकांच्या तुलनेत केवळ शाकाहारी आहार ??? घेणाऱ्या लोकांचे (की- घेणारे लोक)??? १०० वर्षे जगण्याची शक्यता कमी असल्याचे आढळून आले. याचा अर्थ असा की, वृद्धापकाळात शरीराला आवश्यक असलेले पोषण केवळ वनस्पती-आधारित आहारातून पूर्ण होऊ शकत नाही.
मधला मार्गही एक पर्याय
या अभ्यासातील एक मनोरंजक निष्कर्ष असा होता की, जे लोक मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात किंवा जे पेस्को-शाकाहारी आहार घेतात, त्यांच्या आयुर्मानात मांसाहारी लोकांच्या तुलनेत लक्षणीय फरक दिसून आला नाही. यावरून असे सूचित होते की, दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी पूर्णपणे शाकाहारी किंवा पूर्णपणे मांसाहारी असण्यापेक्षा, संतुलित आहार अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
इतर घटकही जबाबदार
संशोधक असेही म्हणतात की, दीर्घायुष्य केवळ आहाराच्या सवयींवर अवलंबून नसते. आनुवंशिकता, जीवनशैली, शारीरिक हालचाल आणि एकूण आरोग्य यांसारखे अनेक घटकही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे केवळ शाकाहारी किंवा मांसाहारी असण्याने दीर्घायुष्याची किंवा अल्पायुष्याची हमी मिळत नाही.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मांसाहारी लोकांनी चरबी नसलेले मांस निवडावे आणि आपल्या आहारात वनस्पती-आधारित प्रथिनांचा समावेश करावा. तथापि, प्रत्येक व्यक्तीच्या पौष्टिक गरजा वय, लिंग, शारीरिक हालचालींची पातळी आणि एकूण आरोग्य यांनुसार बदलतात. त्यामुळे आहार योजना बनवण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरते.
