बापू बैलकर

फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या वाहन प्रदर्शनात ऑफ रोडर असलेल्या एसयूव्हींमध्ये सुधारित स्वरूपात तीन कार दाखविण्यात आल्या होत्या. महिंद्रा आणि महिंद्राची थार, फोर्स मोटर्सची गुरखा आणि मारुतीची जिमनी. मात्र या तिन्ही कार करोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे लगेच बाजारात आल्या नाहीत. या तिन्ही कारची कारप्रेमींमध्ये मोठी चर्चा होती. त्यानंतर महिंद्राने आपली थार नव्या रूपात बाजारात उतरवली. या कारचे खरेदीदारांनी चांगले स्वागत केले आहे. तर फोर्स मोटर्सने आपल्या गुरखावरील पडदा काढला आहे. त्यांनी नुकतीच या कारची एक झलक प्रसिद्ध केली असून ती लवकरच बाजारात येईल याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या कारची उत्सुकता लागली आहे. तर मारुतीने आपल्या जिमनीची प्रतीक्षा कायम ठेवली आहे. त्यांनी या कारचे उत्पादनही सुरू केले आहे. मात्र ही कार नेमकी कधी बाजारात येणार याबाबत अद्याप जाहीर केलेले नाही.

थार : उत्साह

गेल्या वर्षी महिंद्रा आणि महिंद्राने आपली ऑफ रोडर एसयूव्ही थार २ ऑक्टोबर रोजी बाजारात आणली. करोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदी असताना पुढील आठ महिन्यांत म्हणजे मेपर्यंत या कारची ५५ हजापर्यंत नोंदणी झाली होती व तिचा वेटिंग कालावधी हा एक वर्षांपर्यंत पोहचला होता. गेल्या तीन महिन्यांत या कारची आणखी विक्री वाढली असेल यात शंका नाही.  थार नव्या रूपात प्रथम ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे. ती मोठी आकर्षक आणि उठावदार दिसत असल्याने पाहताक्षणी नजरेत भरते. त्यामुळे या कारबाबत विचारणा होत आहे.  या कारचे जमिनीपासूनचे अंतर २२६ मिमी १८ इंचाची चाके असल्याने रस्त्यावर उठून दिसते. अंतर्गत व बाहेरील रचनेत मोठा बदल केलेला आहे. कारचे दालन प्रशस्त आहे. दर्जाही उत्तम करण्यात कंपनीला यश आले आहे. याबरोबरच अँड्रॉइड ऑटो, एपल कार प्ले आणि नेविगेशन, क्रुझ कंट्रोल याबरोबरच ७.० इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट प्रणालीही देण्यात आली आहे.

ऑल-न्यू थार’मध्ये २.० लिटरचे ‘एमस्टॅलियन टीजीडीआय’ पेट्रोल इंजिन आणि २.२ लिटरचे ‘एमहॉक’ डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. चालक व सहप्रवाशांसाठी दोन एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ईएसपी, टीपीएमएस, हिल स्टार्ट आदी सुरक्षा प्राणालींचा वापर करण्यात आला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या सुरक्षा चाचणीत ग्लोबल एनसीएपीने या कारला चार मानांकने दिली आहेत.  महिंद्रा थार एसयूव्हीची किंमत १२.११ लाखांपासून सुरू होत असून तिचे उच्च मॉडेल १४.१६ लाखांपर्यंत जाते (दिल्ली एक्स शो रूम किंमत)

गुरखा : उत्सुकता

पुणे स्थित ऑटोमोबाइल कंपनी फोर्स मोटर्स त्यांची प्रसिद्ध एसयूव्ही फोर्स गुरखा नवीन रूपात बाजारात आणणार असून त्यांनी तिची उत्सुकता आणखी वाढवली आहे. कंपनीने २७ ऑगस्ट रोजी या कारची नवीन झलक आपल्या समाजमाध्यमांवरील अधिकृत अकाऊंटवरून प्रसिद्ध केली आहे. ही कार सध्या बाजारात असलेल्या महिंद्राच्या थार व येऊ घातलेल्या मारुतीच्या जिमनीला स्पर्धक ठरणार आहे.  विशेष म्हणजे ही कार पाच दरवाजांच्या पर्यायासह बाजारात येण्याची उत्सुकता वाढली आहे.

ही कार कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या वाहन प्रदर्शनात सादर केली होती. ही दमदार एसयूव्ही अनेकदा भारतीय रस्त्यांवर चाचणी करतानाही दिसली आहे. त्यामुळे अनेक कारप्रेमी या कारच्या प्रतीक्षेत आहेत. या कारच्या रचनेमध्ये अनेक बदल असतील. त्यामुळे सध्या असलेल्या कारपेक्षा ही कार शानदार व आकर्षक असेल. आकर्षक फॉग लाइट्ससोबत रूफ कॅरियर, व्हील क्लॅडिंग आणि ब्लॅक आऊट साइड रियर व्ह्य़ू मिरर मिळेल.

ही एक दमदार ऑफ रोडर असल्याने या एसयूव्हीमध्ये फोर बाय फोर सिस्टीमसह ऑफ रोडिंग टायर मिळतील. त्यामुळे ती कितीही ओबडधोबड रस्त्यावर अगदी सहज धावू शकेल. कारमध्ये २.६ लिटर डिझेल इंजिन असू शकते. हे इंजिन ८९ बीएचपीची शक्ती देते आणि २६० न्यूटर्न मीटरचा टॉर्क निर्माण करते. यात ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मिळू शकतो. डबल हायड्रॉलिक स्प्रिंग क्वॉइल सस्पेन्शन आणि १७ इंचाचे टय़ुबलेस टायर दिले जातील. हे टायर एखाद्या मोठय़ा ट्रकच्या टायरप्रमाणे वाटतात. या एसयूव्हीमध्ये सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात येणार आहे.

जिमनी : प्रतीक्षा

मारुतीने आपली जिमनी ही ऑफ रोडिंग एसयूव्ही फेब्रुवारी २०२०च्या वाहन प्रदर्शनात दाखवली होती. या कारची प्रतीक्षा सध्या कारप्रेमी करीत आहेत. अधूनमधून ही कार बाजारात येईल अशी चर्चा सुरू असते. कंपनीने या कारचे उत्पादनही सुरू केल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप ती बाजारात आणण्याबाबत कंपनीने अधिकृत धोरण जाहीर केलेले नाही.

तीन आणि पाच दरवाजे असलेल्या प्रकारात ही कार येण्याची शक्यता असून दालनात प्रशस्त जागा मिळणार असून कुटुंबासहित प्रवासासाठीही तिचा वापर करता येणार आहे. या कारमध्ये कंपनी १०५ बीएचपी ऊर्जा निर्माण करणारे १.५ लिटर के १५ बी पेट्रोल इंजिन वापरणार असल्याची शक्यता आहे. हे इंजिन सध्या मारुती सुझुकी  सियाज, अर्टिगा आणि ब्रेजा या कारमध्ये वापरले जात आहे. हे इंजिन १३८ न्यूटर्न मीटरचा टॉर्क निर्माण करते. कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळेल. तसेच ऑटोमॅटिक पर्यायही असण्याची शक्यता आहे.  या कारची लांबी ३५५०, रुंदी १६४५ आणि उंची १७३० मिमी असेल, तसेच जमिनीपासूनचे अंतर हे २२५० मि.मी असेल. सुरक्षा प्रणालींना प्राधान्य असून त्यात एबीएससह ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, दोन ते सहा एअर बॅग, वेग नियंत्रक देण्यात येणार आहे. ऑटोनॉमस ब्रेकिंग सिस्टीम आणि मार्गिका मार्गदर्शक आशा सुविधा प्रणालीही देण्यात येतील. या कारची किंमतही दहा लाखांपासून पुढे असण्याची शक्यता आहे.

गुरखा व जिमनी या दोन कारबाबत दिलेली माहिती ही कंपनीने अधिकृत जाहीर केलेली नाही. फेब्रुवारी २०२० वाहन प्रदर्शनात मिळालेल्या माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे.