वाहनांसाठी नवीन बीएच-सीरिज
भारत सरकारने वाहनांसाठी एक नवीन ‘बीएच’ सीरिज जाहीर केली आहे. याचा मोठा फायदा वाहनचालकांना होणार आहे. जर तुमची बदली राज्यात कुठेही होऊ शकली तरी तुमचे वाहन तुम्हाला त्या ठिकाणीही वापरता येणार आहे. या नवीन सीरिजमधील वाहनांची नोंदणी संपूर्ण भारतात वैध असेल आणि या नोंदणी क्रमांकाच्या आधारे आपले वाहने देशाच्या कोणत्याही भागात बिनधास्तपणे वापरण्यास सक्षम असतील.




सरकारने नुकतेच संसदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने देशभरात नवीन वाहनांसाठी नवीन ‘बीएच ’म्हणजेच भारत सीरिजमध्ये नोंदणी चिन्ह सादर केले आहे. संसदेत लेखी निवेदनात, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह-भारत सीरिज ( BH सीरिज) सादर करण्यात आली आहे. या बदलाची अधिसूचना या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काढली होती. हे नोंदणी चिन्ह असलेल्या खासगी वाहनाला वाहनाचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर वाहनासाठी नवीन नोंदणीची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, ‘‘भारत सीरिज अंतर्गत ही वाहन नोंदणी सुविधा संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार/राज्य सरकारे कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या/संस्थांच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने उपलब्ध असतील. ज्यांचे कार्यालय चार किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत, ते भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये खासगी वाहनांनी कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करू शकतील. मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा दोनच्या पटीत आकारला जाईल. चौदावे वर्ष पूर्ण झाल्यानंतर, मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल जो त्या वाहनासाठी पूर्वी आकारलेल्या रकमेच्या अर्धा असेल.
नोंदणी अशी
‘बीएच ’सीरिज नोंदणीचे स्वरूप BH #### असं ठेवण्यात आलं आहे. ज्यामध्ये BH प्रथम नोंदणीचे वर्ष दर्शवितो, BH हा भारत सीरिजचा कोड आहे, #### मध्ये ०००० ते ९९९९ पर्यंत यादृच्छिक संख्या असतील, XX मध्ये AA ते ZZ ही अक्षरे असतील.
रस्ता कराचे गणित
‘बीएच ’ सीरिज नंबर पाटी असलेल्या वाहनांना खरेदीच्या वेळी १५ वर्षांसाठी रस्ता कर भरण्याऐवजी दोन वर्षांसाठी आणि त्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी रस्ता कर भरावा लागेल. पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून १४ व्या वर्षांनंतर दरवर्षी मोटार वाहन कर आकारला जाईल, जो आधी आकारलेल्या कराच्या निम्मा असेल. १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर ८ टक्के कर लागेल. तर १० ते २० लाख रुपये किमतीच्या वाहनांवर १० टक्के कर आकारला जाईल. २० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर १२ टक्के कर लागणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना नियमित रकमेपेक्षा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. त्याचबरोबर विद्युत वाहनांवर निर्धारित रकमेपेक्षा २ टक्के कमी कर आकारला जाईल.
अर्ज कसा करायचा?
- तुमच्याकडे योग्य पात्रता असल्यास, तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल किंवा खासगी कंपनीत काम असेल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. मात्र यासाठी चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी, तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आणि वाहन पोर्टलवर जावे लागेल. नवीन वाहन खरेदी करतानाही बीएच-सीरीज क्रमांक डीलरमार्फत घेता येतो. यासाठी वाहन मालकाला वाहन पोर्टलवर उपलब्ध अर्ज २० आणि अर्ज ६० भरावा लागेल.
- खासगी क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांना या अजार्सह कर्मचारी ओळखपत्र रोजगार प्रमाणपत्रासह सादर करावे लागेल.
बाजारात नवीन काय?
ऑडी क्यू सेव्हनसाठी नोंदणी सुरू
‘ऑडी’ने मंगळवारपासून भारतात त्यांच्या पुढच्या पिढीच्या ऑडी क्यू सेव्हनसाठी नोंदणी सुरू केली आहे. नवीन क्यू सेव्हनमध्ये शक्तिशाली ३.० एल व्ही ६ टीएफएसआय पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. पेट्रोल इंजिन ३४० एचपी, ५०० एनएम टॉर्क निर्माण करते. त्याचबरोबर ही कार ० ते १०० कि.मी.चे अंतर ५.९ सेकंदांत कापते. ऑडी क्यू सेव्हनमध्ये अडॅप्टिव्ह सस्पेंशन, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह यांसारखी वैशिष्टय़े आहेत. सुरुवातीची नोंदणी रक्कम ५ लाख रुपये आहे. ऑडी क्यू सेव्हन ही कार प्रीमियम प्लस आणि तंत्रज्ञान दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
‘टाटा’च्या दोन सीएनजी कार
टाटा मोटर्सच्या दोन कारचे सीएनजी प्रकार बाजारात येणार आहेत. टाटा टियागो सीएनजी आणि टाटा टिगोर सीएनजी अशी कारची दोन प्रकार आहेत. टाटा डीलरशिपवर दोन्ही कारची नोंदणी सुरू झाले आहे. १९ जानेवारी रोजी या दोन कार बाजारात येतील. टियागो आणि टिगोरच्या सीएनजी प्रकारांमध्ये कोणतेही मोठे डिझाइन बदल दिसणार नाहीत. नवीन सीएनजी बॅजिंग फक्त त्याच्या टेलगेटवर दिसेल. कंपनीने व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन अद्याप जाहीर केलेले नाही. सध्याच्या व्हेरिएंटच्या एंट्री-लेव्हल आणि मिड-लेव्हल व्हेरिएंटवर सीएनजी किट दिले जाण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल व्हेरियंटसह इंजिन उपलब्ध असेल. १.२ लिटर , ३ सिलिंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन सध्या टियागो आणि टिगोरमध्ये वापरले जाते. जे ८५ बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क निर्माण करते. हा इंजिन सेटअप बहुधा सीएनजी प्रकारांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल प्रकार मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्यायांसह ऑफर केले जातात, तर सीएनजी प्रकार फक्त ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह असतील.