Vertigo Symptoms, Causes and Home Remedies: अचानक डोकं गरगरणं, आजूबाजूच्या वस्तू फिरत असल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं किंवा मळमळ होणं… अशी लक्षणं अनेकांना जाणवतात. काही वेळा ही लक्षणं थकवा किंवा अशक्तपणामुळे उद्भवल्याचं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र, वारंवार चक्कर येत असेल, तर त्यामागे व्हर्टिगो ही समस्या असण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे या त्रासाचा संबंध केवळ मेंदूशी नसून कानाच्या आतील भागाशीही असू शकतो. त्यामुळे चक्कर येण्याचं नेमकं कारण ओळखणं महत्त्वाचं ठरतं. व्हर्टिगो म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि हा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय उपयोगी ठरू शकतात? जाणून घेऊया.
व्हर्टिगो म्हणजे नेमकं काय?
व्हर्टिगो हा चक्कर येण्याशी संबंधित एक प्रकारचा त्रास आहे. त्यामध्ये स्वतःचे शरीर किंवा सभोवतालचा परिसर फिरत असल्याची जाणीव होते. काही व्यक्तींना अचानक डोकं गरगरल्यासारखं वाटतं, तर काहींना उभं राहताना किंवा चालताना तोल सांभाळणं कठीण जातं.
कानाच्या आतील भागात शरीराचा तोल सांभाळण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा असते. या यंत्रणेच्या कार्यात बिघाड झाल्यास चक्कर येऊ शकते. व्हर्टिगोची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे वारंवार चक्कर येत असल्यास स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
व्हर्टिगोची लक्षणं कोणती?
डोकं गरगरणं किंवा चक्कर येणं हे व्हर्टिगोचं प्रमुख लक्षण असलं तरी त्यासोबत इतर त्रासही जाणवू शकतात.
- मळमळ आणि उलटी होणे : चक्कर येण्यासोबत पोटात अस्वस्थता जाणवू शकते. काही व्यक्तींना उलटीही होऊ शकते.
- तोल सांभाळताना अडचण : चालताना डगमगल्यासारखं वाटणं किंवा उभं राहताना आधार घ्यावासा वाटणं, अशी लक्षणं दिसू शकतात.
- डोळ्यांच्या हालचालींमध्ये बदल : काही रुग्णांच्या डोळ्यांची अनियंत्रित किंवा असामान्य हालचाल होऊ शकते.
- डोकेदुखी आणि घाम येणे : चक्कर येण्याच्या प्रसंगात डोकेदुखी, अस्वस्थता किंवा घाम येण्याचा त्रास जाणवू शकतो.
- कानांमध्ये आवाज येणे : काही व्यक्तींना कानात गुणगुणल्यासारखा आवाज येतो किंवा ऐकण्याच्या क्षमतेत बदल जाणवतो.
प्रत्येक रुग्णामध्ये ही सर्व लक्षणं दिसतातच, असं नाही. लक्षणांचं स्वरूप आणि तीव्रता यांनुसार डॉक्टर पुढील तपासण्या सुचवू शकतात.
व्हर्टिगो होण्यामागे कोणती कारणं असू शकतात?
व्हर्टिगोचा एक सामान्य प्रकार म्हणजे बेनाइन पॅरॉक्सिझमल पोझिशनल व्हर्टिगो (BPPV). त्यामध्ये कानाच्या आतील भागातील अतिशय सूक्ष्म कण त्यांच्या नेहमीच्या जागेवरून सरकल्यामुळे डोक्याची स्थिती बदलताना चक्कर येऊ शकते. उदाहरणार्थ- अंथरुणावर वळताना, झोपेतून उठताना किंवा वरच्या दिशेला पाहताना काही व्यक्तींना अचानक चक्कर येते.
त्याशिवाय कानाच्या आतील भागात संसर्ग किंवा सूज निर्माण झाल्यामुळेही चक्कर येऊ शकते. मान किंवा डोक्याला झालेली दुखापत, तसेच मायग्रेनसारख्या काही समस्यांचाही याच्याशी संबंध असू शकतो. मेंदूतील रक्तपुरवठ्याशी संबंधित काही गंभीर समस्यांमध्येही चक्कर येऊ शकते. त्यामुळे केवळ लक्षणांवरून स्वतःच निदान करणं टाळावं.
चक्कर कमी करण्यासाठी घरगुती उपाय उपयोगी ठरतात का?
व्हर्टिगोचा त्रास जाणवत असल्यास सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी बसावं किंवा झोपावं. अचानक उठणं, वेगाने डोकं वळवणं आणि तोल जाण्याची शक्यता असताना एकट्यानं चालणं टाळावं.
१. पुरेसं पाणी प्या : शरीरात पाण्याची कमतरता असल्यास चक्कर येण्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे. मात्र, किती पाणी प्यावं हे व्यक्तीचं वय, आरोग्य आणि इतर आजारांवर अवलंबून असतं.
२. आहाराकडे लक्ष द्या : वेळेवर जेवण घेणं आणि संतुलित आहार राखणं आवश्यक आहे. आले किंवा बदाम खाल्ल्याने व्हर्टिगो बरा होतो, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे सफरचंदाचा व्हिनेगर, मध किंवा गिंको बिलोबा यांसारख्या पदार्थांना व्हर्टिगोवरील खात्रीशीर उपचार समजू नये. काही पूरक पदार्थांचे दुष्परिणाम किंवा औषधांशी परस्पर विसंवाद होऊ शकतात.
इप्ले मॅन्युव्हर म्हणजे काय?
BPPV या विशिष्ट प्रकारच्या व्हर्टिगोमध्ये इप्ले मॅन्युव्हर ही डोक्याची आणि शरीराची ठरावीक क्रमाने स्थिती बदलण्याची उपचारपद्धती उपयोगी ठरू शकते. या प्रक्रियेमुळे कानाच्या आतील भागातील सरकलेले सूक्ष्म कण योग्य ठिकाणी जाण्यास मदत होते.
मात्र, हा उपाय प्रत्येक प्रकारच्या चक्कर येण्यावर उपयोगी ठरतोच, असं नाही. त्रास कोणत्या कानाशी संबंधित आहे आणि त्यामागील कारण काय आहे, हे तपासून डॉक्टर योग्य पद्धत ठरवतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला न घेता, ही प्रक्रिया स्वतःहून करण्याऐवजी, ती योग्य प्रकारे कशी करावी हे शिकून घेणं अधिक सुरक्षित आहे.
‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
चक्कर येण्यासोबत अचानक तीव्र डोकेदुखी, बोलताना अडचण, दुहेरी दिसणं, चेहरा किंवा हात-पाय सुन्न होणं, शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा चालता न येणं, अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं वैद्यकीय मदत घ्या. ही स्ट्रोकसारख्या गंभीर समस्येची लक्षणं असू शकतात.
(महत्त्वाची सूचना : ही माहिती केवळ सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. वारंवार चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य निदानानंतरच उपचारपद्धती ठरवणं आवश्यक आहे.)
