Viagra For Alzheimer: व्हायग्रा हे औषधाचं नाव आतापर्यंत कित्येकदा चर्चेत आलं आहे, अगदी अतिडोस झाल्याने एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यापासून ते या गोळीच्या शोधापार्यंत अनेक चर्चा या निळ्या रंगाच्या गोळीभोवती यापूर्वी झाल्या आहेत. पुरुषांच्या (लिंगाच्या ताठरतेबाबत येणाऱ्या समस्या) इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपचार म्हणून प्रसिद्ध असणारी ही गोळी घेतल्याने आता एक अन्य मोठ्या आजाराचा धोका कमी होत असल्याचे नव्या अभ्यासात समोर आले आहे. संशोधकांनी पाच वर्षांच्या कालावधीत इरेक्टाइल डिसफंक्शनचे निदान झालेल्या अडीच लाखांपेक्षा अधिक पुरुषांवर केलेल्या अभ्यासानंतर हे निरीक्षण नोंदवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, व्हायग्रा हे औषध घेतल्याने अल्झायमर रोग होण्याचा धोका जवळपास १८ टक्के कमी होतो असे समजतेय . या संशोधनासाठी अडीच लाख पुरुषांमध्ये काहींना हे औषध घेण्यास सांगितले होते तर काहींना तशी सूचना दिलेली नव्हती. या दोन्हीमधून समोर आलेल्या निरीक्षणांची नोंद पाहिल्यावर अभ्यासकांना आढळून आले की इरेक्टाइल डिसफंक्शनचे औषधे घेत असणाऱ्यांना अल्झायमर होण्याची शक्यता १८% कमी होती.याचा अर्थ व्हायग्रा सारखी औषधे, जी रक्तवाहिन्यांमधून अधिक रक्त वाहू देण्यासाठी कार्य करतात, त्यांचा वापर अल्झायमर रोगाचा विकास रोखण्यास किंवा आटोक्यात ठेवण्यास फायदा होऊ शकतो.

अभ्यास काय सांगतो?

न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधनिबंधात २ लाख ६९ हजार ७२५ पुरुष सहभागींचे विश्लेषण करण्यात आले, ज्यांचे सरासरी वय ५९ वर्षे होते. तसेच संशोधकांनी वय, धूम्रपानाचे प्रमाण, मद्यपानाचे प्रमाण यासारख्या अल्झायमरवर परिणाम करणाऱ्या घटकांना सुद्धा लक्षात घेतले होते. यातील प्रत्येक सहभागीला नुकतेच इरेक्टाइल डिसफंक्शनचे निदान झाले होते आणि ५५% लोकांकडे या स्थितीसाठी डॉक्टरांनी सुचवलेली औषधे होती, तर ४५% सहभागी औषधे घेत नव्हते. कोणत्याही पुरुषास विचार किंवा स्मरणशक्तीची समस्या नव्हती, जी अल्झायमर असलेल्या लोकांमध्ये आढळून येणारी स्थिती आहे.

अभ्यासाअंती, १,११९ पुरुषांना अल्झायमरचे निदान झाले होते ज्यापैकी ७४९ लोक इरेक्टाइल डिसफंक्शनचे औषधे घेत होते. सरासरी पाहता प्रत्येकी १०,००० पुरुष- वर्षाकाठी ८.१ प्रकरणे नोंदवली गेली होती. तर ३७० जण हे इरेक्टाइल डिसफंक्शनचे औषध घेत नव्हते ज्याची सरासरी काढल्यास १०,००० पुरुष- वर्षाकाठी हे प्रमाण ९. ७ असे होते. (पुरुष-वर्षाकाठी या संज्ञेचा अर्थ असा की किती पुरुषांचा वर्षभरात अभ्यास करण्यात आला आहे याची ही आकडेवारी आहे.)

हे ही वाचा<< एक चमचा आल्याचं लोणचं रोज खाल्ल्याने शरीराला काय मदत मिळू शकते? बनवायचं कसं ते ही पाहा 

महिलांनाही होणार का व्हायग्राचा फायदा?

दरम्यान, या नव्या अभ्यासातील लेखिका, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील डॉ रुथ ब्राउअर सांगतात की, “आम्ही अल्झायमरच्या नवीन उपचारांमध्ये प्रगती करत आहोत, यातून रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या लोकांच्या मेंदूतील अमायलोइड प्लेक्स काढून टाकण्याचे काम होऊ शकते. आपल्याला अशा उपचारांची नितांत गरज आहे ज्याने अल्झायमर रोगाचा विकास थांबवता येऊ शकतो. सध्या समोर येणारे निष्कर्ष हे आशादायी आहेत व नक्कीच यावर पुढेही संशोधन होण्याची गरज आहे. या औषधांचा संभाव्य फायदा आणि वापराचे योग्य प्रमाण शोधणे पुढील टप्यात आवश्यक आहे. हे निष्कर्ष स्त्रियांना कितपत लागू होतील हे तपासण्यासाठी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. “

(टीपः वरील लेख माहितीपर आहे. यास वैद्यकीय सल्ला समजु नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viagra used for erectile dysfunction to reduce 18 percent risk of alzheimer how viagra will help women in future new study svs
First published on: 08-02-2024 at 16:19 IST