Vijay Deverakonda Recalls Cutting Water Intake for Liger : चित्रपटात रुबाबदार आणि पिळदार (Shredded) शरीरयष्टी दिसण्यासाठी कलाकार अनेकदा टोकाचे मार्ग अवलंबतात. ‘लायगर’ (Liger) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता विजय देवरकोंडा यानेही असाच एक भयानक प्रयोग केला होता. स्क्रीनवर स्नायू अधिक स्पष्ट आणि रेखीव दिसावेत म्हणून त्याने तब्बल १० तास पाण्याचा एक थेंबही पिणे बंद केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने या अत्यंत वेदनादायी अनुभवावर मोकळेपणाने भाष्य केले आहे.
मुलाखतीत बोलताना विजय देवरकोंडाने सांगितले, पिळदार शरीरयष्टीसाठी मी पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी केले होते. सुरुवातीला दररोज ४ ते ६ लिटर पाणी पिण्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट ३०० मिली आणि नंतर १०० मिलीवर आला. शूटिंगच्या १० तास आधी तर मी पाण्याचा थेंबही घेत नव्हतो. फक्त जिभेवर बर्फाचा तुकडा ठेवून तो चाटावा लागायचा. हे आरोग्यासाठी अजिबात योग्य किंवा चांगले नाही.”आपली अवस्था सांगताना तो पुढे म्हणाला, “जेव्हा मी दिवसभरात फक्त ३०० मिली पाणी प्यायचो, तेव्हा प्रत्येक मिनिटाला डोक्यात फक्त ‘पाणी, पाणी आणि पाणी’ हाच विचार चालू असायचा. अगदी झोपेतही मला पाण्याचेच स्वप्न पडायचे. ४ तास संपले की पाणी प्यायला मिळेल, असा हिशोब मी लावायचो. हा टप्पा पूर्ण झाल्यावर मी माझ्या टीमला कोणतेही अन्न न मागता थेट ४ लिटर शहाळ्याचे पाणी मागवून प्यायचो.”
शरीर पिळदार होण्यासाठी ही पद्धत किती धोकादायक? (How Dangerous is Water Cutting for Shredded Body?)
फिटनेस तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, शरीरातील पाणी अचानक कमी करणे ही वजन किंवा चरबी (Fat) कमी करण्याची योग्य पद्धत नाही. बॉडीबिल्डर्स किंवा ॲथलीट्स केवळ फोटोशूट अथवा स्पर्धेच्या वेळी काही तासांसाठी ही पद्धत वापरतात. परंतु, सामान्य लोकांनी याचे अनुकरण करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते.
- चरबी कमी होत नाही: पाणी कमी केल्यामुळे त्वचा स्नायूंना घट्ट चिकटते आणि शरीर पिळदार दिसू लागते. परंतु, यामुळे शरीरातील चरबी कमी होत नसून केवळ पाण्याचे प्रमाण घटते.
- गंभीर आजारांचा धोका: शरीरात तीव्र डिहायड्रेशन (Dehydration) झाल्यामुळे चक्कर येणे, प्रचंड अशक्तपणा, डोकेदुखी, रक्तदाब अचानक कमी होणे आणि एकाग्रता सुटणे यांसारखे त्रास होतात.
- अवयवांवर ताण: पाणी कमी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते. याचा थेट वाईट परिणाम मूत्रपिंड (Kidneys) आणि हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.
फक्त बर्फ चाटल्याने किंवा शहाळ्याच्या पाण्याने भरपाई होते का? (Can Ice or Coconut Water Recover Severe Dehydration?)
ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे अंतर्गत वैद्यक संचालक डॉ. अमित सराफ यांच्या मते, केवळ बर्फ चाटल्याने शरीराला आवश्यक ते पाणी अजिबात मिळत नाही. अनेक तास पाणी न प्यायल्यानंतर एकदम शहाळ्याचे पाणी पिणे हे डिहायड्रेशनवरचा उपाय असू शकत नाही. दिवसभरात केवळ १०० ते ३०० मिली पाणी पिणे हे कोणत्याही प्रौढ व्यक्तीसाठी अत्यंत धोकादायक आहे. अत्यंत गडद रंगाची लघवी होणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा गोंधळ उडणे ही गंभीर डिहायड्रेशनची लक्षणे असून अशा वेळी त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला (Expert Advice for Sustainable Fitness)
चित्रपटाच्या काही तासांच्या शूटिंगसाठी लूक मिळवणे वेगळे आणि वास्तविक जीवनात निरोगी राहणे वेगळे, असा स्पष्ट फरक तज्ज्ञांनी मांडला आहे. शाश्वत आणि योग्य पद्धतीने वजन किंवा चरबी कमी करायची असेल, तर पाण्याचा त्याग करण्याऐवजी योग्य कॅलरी कॅल्क्युलेशन (Calorie Deficit), पुरेसे प्रोटीन्स, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे यांवरच भर दिला पाहिजे. कोणत्याही शॉर्टकटपेक्षा शिस्तबद्ध दिनक्रमच आरोग्यासाठी हितकारक ठरतो.
