Keep Bananas Fresh This Monsoon! Amazing Pen Hack: फळं आणि भाज्या ताज्या ठेवणं ही अनेक गृहिणींसमोर समस्या असते. विशेषतः केळी घरी आणल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा रंग बदलू लागतो. कधी ती मऊ पडतात, तर कधी काळे डाग पडून खराब होऊ लागतात, त्यामुळे अनेक जण कमी प्रमाणात केळी खरेदी करतात. मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये केळी जास्त दिवस ताजी ठेवण्याचा एक वेगळाच घरगुती उपाय सांगण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या उपायासाठी कोणत्याही महागड्या वस्तूची गरज नाही. घरात सहज मिळणाऱ्या एका साध्या वस्तूचा वापर करून केळी लवकर खराब होण्यापासून वाचू शकतात, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे हा व्हिडीओ अनेक गृहिणींच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे फळे लवकर पिकतात. केळीही त्याला अपवाद नाहीत. अनेक जण केळी फ्रिजमध्ये ठेवण्याचा विचार करतात. मात्र, फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांच्या साली काळ्या पडू शकतात. अशा वेळी केळी ताजी ठेवण्यासाठी काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो.
याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा दावा एका यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेल्या माहितीनुसार, केळी जमिनीवर किंवा टेबलावर ठेवण्याऐवजी ती हवेत लटकवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी एका साध्या पेनचा आणि दोरीचा वापर करण्याची अनोखी पद्धत दाखवण्यात आली आहे.
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, सर्वप्रथम केळ्यांचा घड घ्यायचा. त्यानंतर एका पेनच्या मध्यभागी दोरी घट्ट बांधायची. ही दोरी केळ्यांच्या घडाच्या मधून काळजीपूर्वक बाहेर काढायची, त्यामुळे पेन घडाला आधार देतो आणि दोरी सहज निसटत नाही. त्यानंतर हा घड स्वयंपाकघरातील हूक किंवा योग्य ठिकाणी लटकावून ठेवायचा.
या पद्धतीमुळे केळ्यांवर एकमेकांचा दाब पडत नाही, त्यामुळे ती लवकर चिरडली जात नाहीत किंवा मऊ पडण्याची शक्यता कमी होते, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. केळी खाली ठेवली तर त्यांच्या वजनामुळे खालची फळे आधी खराब होऊ शकतात. मात्र, लटकवून ठेवल्यास हा दाब कमी होतो आणि केळी अधिक काळ चांगली राहू शकतात, असे या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून अनेकांनी या जुगाडाचं कौतुक केलं आहे. काहींनी हा उपाय करून पाहण्याची तयारी दर्शवली, तर काहींनी तो खरंच उपयोगी ठरतो का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, केळी जास्त काळ टिकवण्यासाठी त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर, हवेशीर ठिकाणी ठेवणं उपयुक्त ठरू शकतं. तसेच इतर लवकर पिकणाऱ्या फळांपासून केळी वेगळी ठेवल्यासही त्यांचा टिकाऊपणा वाढू शकतो, त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे घरगुती उपाय वापरताना त्याकडे दाव्याच्या स्वरूपात पाहणं आणि स्वतः अनुभव घेऊनच त्याचा निष्कर्ष काढणं योग्य ठरतं.
येथे पाहा व्हिडीओ
दरम्यान, हा उपाय Priti Rasoi या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला असून, त्यातून केळी अधिक काळ ताजी राहतील असा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा स्वतंत्रपणे वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झालेला नाही, त्यामुळे हा उपाय करून पाहण्यापूर्वी त्याकडे घरगुती प्रयोग म्हणूनच पाहणे अधिक योग्य ठरेल.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)
