Viral Kitchen Hack Why Put a Coin in the Freezer: फ्रिज म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर लगेच भाजीपाला, दूध, फळं, शिजवलेलं अन्न आणि इतर खाद्यपदार्थ येतात. घरातील पदार्थ जास्त काळ ताजे राहावेत म्हणून आपण ते फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवतो; पण तुम्ही कधी फ्रिजमध्ये पैसे ठेवण्याबाबत विचार केला आहे का?

ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पैसे ठेवायचे असतील, तर आपण ते पाकिटात, कपाटात किंवा बँकेत ठेवतो. मग सर्वसाधारणपणे असे असताना फ्रिजमध्ये पैसे का ठेवायचे आणि तसं केल्यानं काय साध्य होणार? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओद्वारे याच प्रश्नाचं भन्नाट उत्तर देण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या उत्तरासाठी फ्रिजमध्ये नोटा किंवा पैशांचा गठ्ठा ठेवायचा नसून, अगदी साध्या नाण्याचा वापर करायचा आहे. ही युक्ती नेमकी कशी करायची आणि घरी परतल्यानंतर त्या नाण्याकडे का पाहायचं, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही हा छोटासा प्रयोग करून पाहावासा वाटेल.

फ्रिजमध्ये नाणं ठेवायचं तरी कसं?

व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, यासाठी घरात सहज उपलब्ध असलेली एक छोटी वाटी किंवा कप घ्यायचा. त्यामध्ये पाणी भरून ती वाटी फ्रीजरमध्ये ठेवायची. काही वेळाने पाणी पूर्णपणे गोठून त्याचा बर्फ तयार होईल. आता या बर्फावर एक नाणं ठेवायचं आणि ती वाटी पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवायची. बस्स! एवढंच करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे घराबाहेर जाऊ शकता. फ्रिजमधील भाजीपाला, दूध किंवा इतर पदार्थ जसं ठेवता, तसंच हे नाणं ठेवायचं. मात्र, घरी परतल्यानंतर लगेच त्या छोट्याशा वाटीकडे एकदा लक्ष द्यायचं. कारण- पुढे दिसणारी नाण्याची स्थिती या संपूर्ण जुगाडाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

नाण्याची जागा बदलली तर?

समजा, तुम्ही काही तासांसाठी घराबाहेर गेला आहात. तुमच्या अनुपस्थितीत फ्रिज किंवा फ्रीजरमधील तापमानात बदल होऊन, ते वाढले, तर आधी गोठलेला बर्फ वितळण्यास सुरुवात होऊ शकते. त्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाल्यास ते पाणी पुन्हा गोठू शकते.

अशा वेळी सुरुवातीला बर्फाच्या वर ठेवलेलं नाणं त्याच जागेवर राहीलच, असं नाही. बर्फ वितळताना नाणं खाली सरकू शकतं आणि पुन्हा बर्फ तयार झाल्यानंतर ते त्या नव्या जागी अडकलेलं दिसू शकतं.

म्हणूनच घरी परतल्यानंतर नाणं वरच्या बाजूला आहे की खाली गेलेलं दिसतंय, हे पाहण्याची ही युक्ती व्हिडीओमध्ये सांगण्यात आली आहे.

मग याचा उपयोग नेमका कशासाठी?

तुमच्या गैरहजेरीत फ्रिज किंवा फ्रीजरमधील तापमानात मोठा बदल झाला होता का, याचा प्राथमिक अंदाज घेणं हा यामागचा साधा उद्देश आहे. विशेषत: घराबाहेर जाताना वीज गेली आणि काही वेळानं पुन्हा आली, तरी आपण घरी परतल्यावर ते लगेच लक्षात येईलच, असं नाही.

अशा वेळी नाण्याची स्थिती बदललेली दिसल्यास फ्रिजमध्ये तापमानात बदल झाला असण्याची शक्यता लक्षात घेऊन आतील पदार्थ पुन्हा एकदा तपासून पाहता येतात.

हा किचन जुगाड Pink’s Innovation या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रयोग सध्या चर्चेत आहे.

महत्त्वाची टीप

हा केवळ व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलेला घरगुती उपाय आहे. नाण्याची स्थिती पाहून एखादा खाद्यपदार्थ सुरक्षित आहे किंवा खराब झाला आहे, असा थेट निष्कर्ष काढू नका. वीज गेल्याचा संशय असल्यास फ्रिजमधील नाशवंत पदार्थांची स्वतंत्रपणे तपासणी करा. वास, रंग किंवा पोत बदललेला जाणवत असल्यास तो पदार्थ खाणे टाळणे अधिक सुरक्षित आहे.

म्हणूनच पुढच्या वेळी घराबाहेर जाताना फ्रिजमधील वस्तू वापरण्याच्या योग्यतेच्या आहेत की नाहीत याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीनं छोट्याशा नाण्याचा हा विशेष जुगाड करायला विसरू नका… कारण घरी परतल्यावर त्या नाण्याची जागा तुम्हाला काय सांगते, हे पाहणं रंजक ठरू शकतं

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)