Viral Kitchen Hack : सोशल मीडियावर रोज नवनवीन कुकिंग हॅक्स व्हायरल होत असतात. यातील काही किचन हॅक्स खरोखरच उपयुक्त असतात, सध्या असाच एक कुकिंग हॅक चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तळण्यापूर्वी तेलात आल्याचा तुकडा टाकला जातोय. अनेक इन्फ्लुएंसर्स पूरी, भजी किंवा कोणतेही पदार्थ तळताना तेलात आल्याचा एक छोटा तुकडा टाकताना दिसत आहेत. नक्की हा हॅक काय काम करतो, ते जाणून घेऊया.
तळताना तेलात आलं का टाकले जातेय?
पूऱ्या, फ्राईज, पापड किंवा भजी तळताना लोक आल्याचा एक छोटा तुकडा गरम तेलात टाकत आहेत आणि संपूर्ण तळण संपेपर्यंत तो तुकडा तेलातच ठेवतात.
तेल काळे होण्यापासून वाचवते: व्हायरल व्हिडीओमधील दाव्यानुसार, जेव्हा आपण तेलात काहीही तळतो, तेव्हा अन्नाचे बारीक कण तेलातच उरतात. सतत तळल्यामुळे हे कण जळतात आणि काळे पडतात. नंतर हे जळालेले कण पूरी किंवा भजीला चिकटतात, ज्यामुळे पदार्थाचे टेक्चर बिघडते. आल्याचा तुकडा टाकल्यामुळे तेल काळे पडत नाही आणि तळलेल्या पदार्थांचा रंगही खराब होत नाही.

तेलातील दुर्गंधी किंवा वास दूर करतो: एकाच तेलात वारंवार तळल्याने त्या पदार्थांचा वास तेलात उतरतो, ज्यामुळे ते तेल पुन्हा वापरण्यायोग्य राहत नाही. मात्र तेलात आले टाकल्यास ते अन्नाचा वास शोषून घेते (न्यूट्रलाइज करते). यामुळे तेल स्वच्छ राहते आणि दुसऱ्यांदा वापरताना त्यातून पूर्वी तळलेल्या पदार्थाचा वास येत नाही.
हा हॅक खरोखरच काम करतो का?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक हॅकवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे कोणताही हॅक वापरण्यापूर्वी तो स्वतः अनुभवून पाहणे योग्य ठरते. आल्याचा हा हॅक ट्राय करायचा की नाही, हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे.
