Vitamin B12 Deficiency Causes: व्हिटॅमिन B12 ची कमतरता म्हटलं की सर्वात आधी शाकाहारी लोकांचा विचार केला जातो. मांसाहार न करणाऱ्या व्यक्तींमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता अधिक आढळते, असं अनेकांना वाटतं. मात्र, तुम्ही मांसाहार करत असाल तरी शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होऊ शकते! यामागे केवळ आहारच नाही, तर काही औषधं, पोटाचे विकार आणि वाढतं वय अशी अनेक कारणं असू शकतात. तज्ज्ञांनी व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमागील काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत. त्यामुळे केवळ शाकाहारी लोकांनाच नव्हे, तर मांसाहार करणाऱ्यांनीही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.
शरीरासाठी व्हिटॅमिन B12 का महत्त्वाचं आहे?
व्हिटॅमिन B12 हे शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असलेलं जीवनसत्त्व आहे. लाल रक्तपेशी तयार करणं, मज्जासंस्थेचं आरोग्य टिकवणं आणि DNA निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. शरीरात याची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, अशक्तपणा, हात-पायांना मुंग्या येणं, स्मरणशक्तीवर परिणाम होणं अशा समस्या उद्भवू शकतात. विशेष म्हणजे, B12 ची कमतरता होण्यामागे केवळ आहार कारणीभूत नसतो. जाणून घेऊया अशी ५ कारणं…
१. अन्नपदार्थ जास्त शिजवण्याची सवय
तुम्ही जेवण बनवताना अन्नपदार्थ गरजेपेक्षा जास्त शिजवत असाल, तर त्यातील काही पोषक घटकांचं प्रमाण कमी होऊ शकतं. व्हिटॅमिन B12 हे उष्णतेमुळे प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ किंवा अतिप्रमाणात शिजवल्यास त्यातील B12 चं प्रमाण कमी होऊ शकतं. शक्यतो योग्य तापमानावर आणि गरजेपुरतंच अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा.
२. काही औषधांचं दीर्घकाळ सेवन
तुम्ही नियमित औषधं घेत असाल, तर त्याचाही व्हिटॅमिन B12 च्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः मधुमेहासाठी वापरलं जाणारं मेटफॉर्मिन आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी दिली जाणारी काही औषधं दीर्घकाळ घेतल्यास B12 चं शोषण कमी होण्याची शक्यता असते. प्रोटॉन पंप इनहिबिटर्स (PPI) या प्रकारातील औषधांचाही यात समावेश होतो. त्यामुळे अशी औषधं दीर्घकाळ घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी B12 ची तपासणी करून घ्यावी. स्वतःहून औषधं बंद करू नयेत.
३. पर्निशियस अॅनिमिया (Pernicious Anemia)
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमागे पर्निशियस अॅनिमिया हेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पोटातील पेशींवर किंवा व्हिटॅमिन B12 च्या शोषणासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर हल्ला करते. व्हिटॅमिन B12 शरीरात योग्य प्रकारे शोषलं जाण्यासाठी ‘इंट्रिन्सिक फॅक्टर’ नावाचं प्रोटीन आवश्यक असतं. मात्र, पर्निशियस अॅनिमियामध्ये या प्रोटीनची निर्मिती किंवा त्याचं कार्य प्रभावित होतं. परिणामी, आहारातून पुरेसं B12 मिळत असूनही शरीराला त्याचा योग्य उपयोग करता येत नाही.
४. पोटाशी संबंधित आजार
तुमच्या पोटाचं आरोग्यही व्हिटॅमिन B12 च्या पातळीवर परिणाम करू शकतं. आपण जे अन्न खातो, त्यातून B12 वेगळं होण्यासाठी पोटातील आम्लाची मदत होते. त्यानंतर शरीराला या जीवनसत्त्वाचं शोषण करता येतं. मात्र, पोटातील आम्लाचं प्रमाण कमी असल्यास किंवा पचनसंस्थेशी संबंधित काही आजार असल्यास B12 चं शोषण व्यवस्थित होत नाही. अॅट्रॉफिक गॅस्ट्रायटिस (Atrophic Gastritis) यांसारख्या समस्यांमुळेही B12 ची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे वारंवार पोटाच्या तक्रारी जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
५. वाढतं वय
वाढत्या वयानुसार शरीराच्या कार्यपद्धतीत अनेक बदल होतात. त्याचा परिणाम अन्नातील पोषक घटकांचं शोषण होण्यावरही होऊ शकतो. विशेषतः वय वाढल्यामुळे काही व्यक्तींमध्ये पोटातील आम्लाचं प्रमाण कमी होतं. परिणामी, अन्नातून मिळणारं व्हिटॅमिन B12 शरीराला शोषून घेणं कठीण होऊ शकतं.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये B12 च्या कमतरतेचा धोका वाढू शकतो. वय वाढत असताना थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास केवळ वाढत्या वयाचा परिणाम समजून दुर्लक्ष करू नये.
B12 ची कमतरता आहे का, हे कसं ओळखाल?
- सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
- हात-पायांना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे
- चक्कर येणे
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे
- स्मरणशक्तीवर परिणाम होणे
ही लक्षणं इतर आरोग्य समस्यांमुळेही दिसू शकतात. त्यामुळे केवळ लक्षणांवरून B12 ची कमतरता असल्याचं निश्चित करता येत नाही. रक्त तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य निदान करता येतं. गरजेनुसार उपचार किंवा B12 सप्लिमेंट्स घेणं महत्त्वाचं आहे.
