थायरॉईड ग्रंथी ही मानेमध्ये असलेली लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी शरीरातील हार्मोन्स तयार करून चयापचय (मेटाबॉलिझम) नियंत्रित करते. विशेषतः पॅपिलरी थायरॉईड कार्सिनोमा हा थायरॉईड कर्करोगाचा प्रकार जगभरात वेगाने वाढताना दिसत आहे. किरणोत्सर्गाचा संपर्क, कुटुंबातील इतिहास आणि काही आनुवंशिक बदल हे या कर्करोगाचे महत्त्वाचे जोखीम घटक मानले जातात. मात्र, आता संशोधक जीवनशैली आणि पोषणाशी संबंधित घटकांकडेही लक्ष देत आहेत, जे या आजारावर प्रभाव टाकू शकतात. या संदर्भात सीनियर कन्सल्टंट – हेड अँड नेक ऑन्कोलॉजी, HCG कॅन्सर सेंटर, बोरिवली येथील डॉ. यश माथूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
व्हिटॅमिन D पेशींची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्तीवर कसा परिणाम करतो?
ड जीवनसत्त्व हे पारंपरिक जीवनसत्त्वापेक्षा अधिक हार्मोनसारखे कार्य करते. शरीरात सक्रिय झाल्यानंतर ते रोगप्रतिकारक शक्ती, दाह (इन्फ्लेमेशन) आणि पेशींची वाढ नियंत्रित करण्यास मदत करते. ही जैविक प्रक्रिया असामान्य पेशींची वाढ रोखण्यासाठी महत्त्वाच्या असते. प्रयोगशाळेतील काही अभ्यासांमध्ये ड जीवनसत्त्व पेशींचे विभाजन नियंत्रित करणे, नियोजित पेशीमृत्यू (अपोप्टोसिस) वाढवणे आणि ट्युमरची वाढ रोखणे यांमध्ये मदत करू शकते, असे आढळून आले आहे.
व्हिटॅमिन D आणि थायरॉईड कर्करोगाबाबत संशोधन काय सांगते?
काही निरीक्षणात्मक अभ्यासांमध्ये ड जीवनसत्त्वाची पातळी आणि थायरॉईड कर्करोगाच्या जोखमीतील संबंधाचा अभ्यास करण्यात आला आहे. काही निष्कर्षांनुसार थायरॉईड कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाची पातळी निरोगी व्यक्तींपेक्षा कमी आढळते. अनेक अभ्यासांच्या विश्लेषणातून असेही दिसून आले आहे की, रक्तातील ड जीवनसत्त्वाची कमी पातळी थायरॉईड कर्करोग होण्याच्या शक्यतेशी काही प्रमाणात संबंधित असू शकते.
… तरीही संशोधनातील निष्कर्ष एकसारखे का नाहीत?
या विषयावरचे वैज्ञानिक पुरावे अद्याप निश्चित किंवा ठोस नाहीत. काही संशोधनांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आणि थायरॉईड कर्करोग यांच्यात स्पष्ट संबंध आढळलेला नाही. काही अभ्यासांमध्ये निरुपद्रवी थायरॉईड गाठी असलेल्या रुग्णांमध्ये आणि थायरॉईड कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाच्या पातळीत फारसा फरक दिसून आलेला नाही.
या मिश्र निष्कर्षांमागील एक कारण म्हणजे ड जीवनसत्त्वाची पातळी सूर्यप्रकाशाचा संपर्क, आहार, स्थूलता, वय अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. त्याशिवाय ड जीवनसत्त्वाची कमतरता जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते, विशेषतः ज्या भागांमध्ये सूर्यप्रकाश कमी मिळतो किंवा लोक जास्त वेळ घरामध्ये घालवतात. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता थेट कर्करोगाला कारणीभूत आहे की इतर जोखीम घटकांशी संबंधित आहे, हे निश्चित सांगणे कठीण ठरते.
ड जीवनसत्त्वाची कमतरता – एक व्यापक आरोग्य समस्या
या अनिश्चिततेनंतरही शरीरात पुरेशी ड जीवनसत्त्वाची पातळी राखणे एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ड जीवनसत्त्वाची कमी पातळी, हाडांचे आजार, रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाड, चयापचय विकार आणि इतर अनेक दीर्घकालीन आजारांशी संबंधित असल्याचे आढळले आहे. कर्करोग क्षेत्रातही ड जीवनसत्त्वाचा अभ्यास केवळ कर्करोग प्रतिबंधासाठीच नव्हे, तर ट्युमरची वाढ आणि रुग्णांच्या उपचार परिणामांवर होणाऱ्या प्रभावासाठीही केला जात आहे.
एकूण आरोग्यासाठी व्हिटॅमिन D पातळी कशी राखावी?
थायरॉईड आरोग्याबाबत काळजी वाटत असल्यास संतुलित दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक असल्यास थायरॉईड तपासणी, संतुलित आहार आणि पुरेसा सूर्यप्रकाश यांचा समावेश होतो. फॅटी फिश, अंड्याचा पिवळा बलक, फोर्टिफाइड दुग्धजन्य पदार्थ आणि मशरूम यांसारख्या अन्नपदार्थांमुळे ड जीवनसत्त्व मिळण्यास मदत होते. ड जीवनसत्त्वाची कमी पातळी थायरॉईड कर्करोगाशी संबंधित असू शकते का, याचा अजूनही अभ्यास सुरू आहे. मात्र, सध्याचे पुरावे त्याला थेट कारण म्हणून सिद्ध करत नाहीत. या संबंधाबद्दल अधिक स्पष्ट निष्कर्ष काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. तोपर्यंत ड जीवनसत्त्वाची योग्य पातळी राखणे हे एकूण आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंधासाठी व्यापक आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.
