पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींमध्ये बद्धकोष्ठता ही अतिशय सामान्य समस्या मानली जाते. आठवड्यात तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे, मल कडक होणे किंवा शौचाच्या वेळी वेदना होणे—ही बद्धकोष्ठतेची सामान्य लक्षणे मानली जातात. बहुतेक वेळा आहार, पाण्याचे प्रमाण आणि जीवनशैलीत बदल केल्यास ही समस्या नियंत्रणात येते. मात्र काही वेळा हीच समस्या गंभीर रूप धारण करू शकते. अशा वेळी शरीर देत असलेले काही इशारे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.
बद्धकोष्ठता गंभीर कधी ठरते? (When does constipation become serious?)
तज्ज्ञांच्या मते, काही दिवसांपर्यंत मलविसर्जन न होणे किंवा शौचास जाण्यात सतत अडचण येणे हे गंभीर बद्धकोष्ठतेचे संकेत असू शकतात. पोटात सतत वेदना होणे, घरगुती उपाय करूनही आराम न मिळणे किंवा अनेक दिवस मलविसर्जन न होणे याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
सामान्यतः दररोज शौचाची सवय असलेल्या व्यक्तीला तीन ते पाच दिवस मलविसर्जन न झाल्यास तो इशारा मानला जातो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. काही रुग्णांमध्ये उलट्या होणे, मल खूप कडक होऊन अडकून बसणे, गुदद्वारातून रक्त येणे किंवा वायूही न होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गुंतागुंत (Possible complications of severe constipation)
दीर्घकाळ उपचार न केल्यास बद्धकोष्ठतेमुळे काही गंभीर गुंतागुंत उद्भवू शकतात. कडक मल आत अडकून राहणे (फीकल इम्पॅक्शन), मूळव्याध (हॅमोरॉइड्स), गुदद्वाराला भेगा पडणे (अॅनल फिशर) किंवा गुदाशय बाहेर येणे (रेक्टल प्रोलॅप्स) यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होणे किंवा तीव्र पोटदुखी होणे अशी परिस्थिती उद्भवू शकते, ज्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासते.
कोणती लक्षणे धोक्याची घंटा ठरतात? (Warning signs that should not be ignored)
बद्धकोष्ठतेसोबत काही लक्षणे दिसल्यास ती धोक्याची घंटा मानली जाते. शौचासोबत रक्त येणे किंवा काळसर, चिकट मल होणे, सतत उलट्या होणे, अचानक तीव्र पोटदुखी सुरू होणे, कारण नसताना वजन कमी होणे किंवा ताप व पोटात तीव्र आकडी येणे—ही सर्व लक्षणे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. अशा वेळी तातडीने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरते.
बद्धकोष्ठतेपासून बचाव कसा कराल? (How to prevent constipation)
बद्धकोष्ठतेपासून बचाव करण्यासाठी संतुलित आणि तंतुमय आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि शौचाची सवय नियमित ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र समस्या वारंवार होत असल्यास किंवा लक्षणे गंभीर होत असल्यास ती दुर्लक्षित न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार केल्यास संभाव्य गुंतागुंत टाळता येते आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.
सूचना: ही माहिती सार्वजनिक स्रोत आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतीही नवीन उपचारपद्धती किंवा आरोग्यविषयक सवय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
