हिवाळा सुरू झाला की अनेकांना लघवीचे प्रमाण वाढल्यासारखे वाटते. विशेषतः रात्री झोपेतून दोन-तीन वेळा उठून बाथरूमला जावे लागल्याने झोपेचा खोळंबा होतो. दिवसा वारंवार लघवी होणे कसेबसे सहन होते; मात्र हीच समस्या रात्री सुरू राहिली तर मनात शंका निर्माण होते—हे थंडीचे नैसर्गिक परिणाम आहेत की किडनी अथवा मूत्राशयाशी संबंधित एखाद्या गंभीर आजाराची सुरुवात?

अपोलो रुग्णालयातीलमूत्ररोगतज्ज्ञ आणि पुरुषांचे आरोग्य ( न्युरोलॉजिस्ट व मेन्स हेल्थ) तज्ज्ञ डॉ. आशीष सवल यांच्या मते, हिवाळ्यात लघवी वाढणे बहुतांश वेळा आजार नसून शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. मात्र काही ठराविक लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

थंडीत लघवी का वाढते?

थंडी वाढली की शरीराचा थर्मोरेग्युलेटरी सिस्टिम (Thermoregulatory system) सक्रिय होतो. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्वचेखालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात (याला व्हॅसो-कन्स्ट्रिक्शन (Vasoconstriction)म्हणतात). त्यामुळे त्वचेऐवजी किडनी, यकृत व हृदयाकडे रक्तप्रवाह वाढतो. किडनीकडे अधिक रक्त गेल्याने ते अधिक प्रमाणात फिल्टर होते आणि परिणामी लघवीचे प्रमाण वाढते. वैद्यकीय भाषेत यालाच कोल्ड डाययुरेसिस म्हणतात.

याशिवाय हिवाळ्यात घाम जवळपास न येणे, रक्तदाबात थोडी वाढ होणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया—हे सगळे घटक लघवी वाढण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच थंड वातावरणात, पोहण्याच्या तलावात उतरल्यावर किंवा थंड पाण्याचा स्पर्श होताच लघवीची तीव्र जाणीव होते.

हे सामान्य आहे की आजार?

फक्त हिवाळ्यात लघवी वाढत असेल आणि त्यासह जळजळ, वेदना किंवा रक्त येत नसेल, तर बहुतांश प्रकरणांत ही स्थिती सामान्य मानली जाते. मात्र खालील लक्षणे कायमस्वरूपी दिसत असतील, तर ती आजाराची सूचना असू शकते—

रात्री तीन-चार वेळा नियमित उठावे लागणे
लघवी करताना जळजळ किंवा वेदना
लघवी थांबून थांबून होणे
लघवीत रक्त येणे
लघवीवर नियंत्रण न राहणे

अशा वेळी मूत्रसंस्थेचा संसर्ग, मधुमेह, प्रोस्टेटचा त्रास किंवा किडनीशी संबंधित समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चहा, कॉफी आणि मद्याचा परिणाम

हिवाळ्यात चहा, कॉफी आणि मद्याचे सेवन वाढते. ही सर्व पेये डाययुरेटिक असल्याने किडनीकडून लघवीचे प्रमाण अधिक वाढवतात. थंडी आणि या पेयांचा एकत्रित परिणाम लघवीची वारंवारता वाढवू शकतो.

कमी पाणी प्यायल्यावरही लघवी का लागते?

थंडीत अनेक जण पाणी कमी पितात. त्यामुळे लघवी दाट होते आणि मूत्राशयाच्या भिंतीला त्रास होतो. यामुळे लघवीची सतत जाणीव होत राहते, जरी प्रत्यक्ष प्रमाण कमी असले तरीही.

वयस्कांमध्ये समस्या जास्त का?

वाढत्या वयात मूत्राशयाच्या स्नायूंची ताकद कमी होते आणि त्याची क्षमता घटते. त्यात मधुमेह, प्रोस्टेटचा त्रास किंवा रक्तदाबाची औषधे सुरू असतील, तर हिवाळ्यात लघवी वाढणे अधिक जाणवते.

डॉक्टरांकडे कधी जावे?

थंडीबरोबर खालील लक्षणे दिसत असतील, तर तपासणी आवश्यक आहे—

लघवीत जळजळ किंवा रक्त
अचानक तीव्र प्रेशर
लघवी अडखळणे
नियंत्रण न राहणे

साधी युरिन तपासणी आणि अल्ट्रासाउंडद्वारे ही समस्या हवामानाशी संबंधित आहे की आजाराशी, हे स्पष्ट होते.

हिवाळ्यात मूत्राशय निरोगी ठेवण्यासाठी

शरीर उबदार ठेवा; थरांमध्ये कपडे घाला, पायांना मोजे वापरा
चहा, कॉफी व मद्याचे सेवन मर्यादित ठेवा
दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या
मधुमेह असल्यास साखरेचे नियंत्रण ठेवा
झोपण्यापूर्वी शौचास जाण्याची सवय ठेवा
हलका व्यायाम व चालणे सुरू ठेवा

निष्कर्ष

हिवाळ्यात वारंवार लघवी लागणे बहुतेक वेळा शरीराची नैसर्गिक व संरक्षणात्मक प्रतिक्रिया असते. मात्र लक्षणे तीव्र, कायमस्वरूपी किंवा वेदनादायक असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीर अनेकदा ऋतूंच्या माध्यमातून आतल्या बिघाडाचे संकेत देत असते—ते वेळेवर ओळखणे महत्त्वाचे आहे.