Beat the heat with these desi hacks : उन्हाळा आता फक्त एक ऋतू राहिलेला नाही. तर प्रत्येकाच्या घराबाहेर न पडण्याचे कारण ठरतो आहे. अनेक भागांत तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्यामुळे, १० मिनिटांसाठी सुद्धा घराबाहेर पडणे त्रासदायक वाटते आहे. पंख्यातून फक्त गरम हवा येते तर कुलर थोड्या वेळापुरताच आराम देतात. पण, दिवसभर अनेकांना थकवा, उकाडा आणि अशक्तपणा जाणवतो. घरात थंडावा देणारी उपकरणे येण्यापूर्वी, लोक शरीराला नैसर्गिकरित्या थंड करण्यासाठी काही साध्या पद्धतींवर अवलंबून होते. त्यामुळे कदाचित म्हणूनच जुन्या पद्धतीचे उपायांचा पुन्हा वापर केला जाऊ लागला आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी नुकतेच २६ मे रोजी शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे…

ऋजुता दिवेकर यांनी सुचवलेले उन्हाळ्यातील पारंपरिक भारतीय उपाय…

कडाक्याच्या उन्हात शरीराला थंड ठेवण्यासाठी तीन साध्या गोष्टी मदत करू शकतात. यामध्ये पिण्याच्या पाण्यात वाळ्याची मुळे घालणे, हातांना मेंदी लावणे आणि उन्हाळ्यात नियमितपणे मसालेदार ताक पिणे यांचा समावेश होतो…

१. पिण्याच्या पाण्यात वळा किंवा व्हेटिव्हरची मुळे

ऋतुजा यांनी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात दोन-तीन वळ म्हणजेच व्हेटिव्हरची मुळे, घालण्याचा सल्ला दिला. यामुळे पाण्याला नैसर्गिकरित्या गोडवा आणि थंडावा मिळतो. हीच मुळे तीन दिवसांपर्यंत अंघोळीच्या पाण्यात घालून पुन्हा वापरता येतात. याला भारताचे ‘इन्फ्युज्ड वॉटर’ (सुगंधी पाणी) असे म्हणतात. कारण – उन्हाळ्यात अनेक लोकांना साधे पाणी पुरेसे पिण्यास त्रास होतो. तेव्हा वाळ्याची मुळे टाकलेले पाणी योग्य ठरते.

ज्या लोकांना मुरुमे किंवा कोंड्याचा त्रास आहे, त्यांना वळ्याची मुळे वापरल्याने फायदा होऊ शकतो. पण, ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांनी याचे सेवन टाळावे.पूर्वीच्या काळी, भारतीयांकडून वापरले जाणारे हातातील पंखे देखील वळ्यापासून बनवले जायचे. उत्तर भारतात उन्हाळ्यात खूप उष्णता असते, त्यामुळे तिथे “कूलिंग पडदे” किंवा “कूलरमध्ये ठेवलेली गवताची जाळी” वापरली जाते. हे पडदे आणि कूलरमध्ये वापरली जाणारी गवताची चटई ही बहुतेक वेळा वाळा (वेटिव्हर) मुळांपासून बनवलेली असते. यामुळे नैसर्गिकरित्या घर थंड राहते आणि हवेत एक छान सुगंधही पसरतो.

२. हातांवर मेंदी

हातावर मेंदी काढणे ही एक जुनी भारतीय पद्धत आहे, जी पूर्वी अनेक लोक रोजच्या आयुष्यात वापरत असत. पण, काळानुसार ती हळूहळू कमी झाली. पण, आता फक्त एखाद्या कार्यक्रमानिमित्त ती आवर्जून हातावर काढली जाते. मेंदी केवळ शरीराला नैसर्गिकरित्या थंडावाच देत नाही, तर उन्हाळ्याच्या या धावपळीच्या दिवसांमध्ये मानसिकदृष्ट्या शांतता द्यायलाही मदत करते..

३. मसालेदार ताक किंवा छास

उन्हाळ्यातील एक अत्यंत आवश्यक पेय आहे, ज्याचे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करावे. ताकामध्ये आढळणाऱ्या ‘व्हे’ (whey) या घटकामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२ असतात. पेय प्रीबायोटिक, प्रोबायोटिक आणि पोस्टबायोटिक म्हणूनही कार्य करते. पण, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, निर्जलीकरण (dehydration) आणि तीव्र उष्णतेमुळे निर्माण झालेला ‘इलेक्ट्रोलाईट असंतुलन’ (electrolyte imbalance) सुधारण्याची क्षमता. जर तुम्ही ताकामध्ये थोडे मीठ, थोडा हिंग आणि थोडी जिरेपूड मिसळून त्याचे जेवणाबरोबर सेवन केले तर पचनही सुलभ होते. भूक मंदावणे (भूक न लागणे) ही समस्या उद्भवत नाही; पोट हलके वाटते आणि त्वचेवर तजेलपणा येतो.

त्यामुळे हे तिन्ही उपाय घरी अंमलात आणण्याइतके सोपे आहेत आणि कडक उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांना निर्जलीकरण तसेच एकूणच आरोग्याचे व्यवस्थापन नैसर्गिकरित्या करण्यास मदत करू शकतात. व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीत छोटे बदल करू शकत असल्या तरी, कार आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी (policymakers) देखील घरे आणि शहरांचे तीव्र उष्णतेपासून संरक्षण करण्यावर अधिक गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.