Akhrot benefits: अक्रोडमध्ये आरोग्यदायी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात; ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की ३० दिवस अक्रोड खाल्ल्याने काय होते? महिनाभर अक्रोड खाल्ल्याचा हृदय, मेंदू आणि शरीरावर कसा परिणाम होतो आणि शरीराला कोणते विशिष्ट फायदे मिळतात? चला जाणून घेऊयात.
ड्रायफ्रूट्समधील अक्रोडला ब्रेन फूडही म्हणतात. अक्रोड आरोग्यासाठी वरदान मानले जातात. अक्रोड खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. खासकरून मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड खूप फायदेशीर मानले जातात. रोज मूठभर अक्रोड खाल्ले तर शरीरात अनेक सकारात्मक बदल बघायला मिळतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदे
दररोज अक्रोड खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो. अक्रोडमध्ये दाह आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे उत्तम आरोग्यास चालना मिळते.
पचनसंस्था निरोगी ठेवते
अक्रोडमध्ये पॉलिफेनॉल्स असतात, ज्यांचे पचनमार्गातील सूक्ष्मजीवांद्वारे चयापचय होते; त्यामुळे अक्रोडाचे सेवन पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
स्मरणशक्ती सुधारते
अक्रोड खाल्ल्याने मिळणारे ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. स्मरणशक्ती चांगली राखण्यासोबतच अक्रोडाचे सेवन ‘फ्री रॅडिकल्स’मुळे होणाऱ्या नुकसानापासून मेंदूचे रक्षण करण्यासही मदत करते.
तणाव कमी करते
अक्रोड खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, त्यामध्ये मज्जासंस्थेला पूरक ठरणारे घटक जसे की मेलाटोनिन, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि पॉलिफेनॉल्स असतात; जे मानसिक आरोग्यास मदत करतात. यामुळे तणाव कमी होण्यासही मदत होते.
वजन कमी करण्यास मदत करते
नाश्ता किंवा स्नॅक म्हणून अक्रोड खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच, ते भूक नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.
रक्तदाब कमी करू शकते
अक्रोड रक्तदाब कमी करण्यासाठीही गुणकारी ठरू शकतात. परिणामी, रक्तदाब कमी होण्यासोबतच हृदयाचे आरोग्यही जपले जाते.
एका दिवसात किती अक्रोड खावेत?
दररोज २ ते ३ अक्रोड खाणे आवश्यक आहे. मात्र, जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
