अक्रोडने परिपूर्ण आहार असल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते आणि शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊ शकते, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे.
असंपृक्त मेद असलेला आहार शरीरास उपयुक्त असतो आणि त्यात अक्रोड व ऑलिव्ह तेलाचा समावेश होतो. कमी मेदाच्या आहाराने जो परिणाम होतो, तोच यात साध्य होतो. अक्रोडचा समावेश असलेला आहार हा बहुअसंपृक्त मेदाशी संबंधित असतो आणि त्याचा हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, परिणामी वजनही कमी होते, असे सँडियागो येथील कॅलिफोíनया विद्यापीठातील शेरील रॉक यांचे मत आहे. यापूर्वीही अक्रोडवर बरेच संशोधन झाले असून रोज अक्रोड सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारून वजन घटते, असेच दिसून आले आहे. आताच्या प्रयोगात २४५ जास्त वजनाच्या व्यक्तींवर चांगला परिणाम दिसून आला आहे. हे सर्व जण २२ ते ७२ वयोगटातील आहेत. एक वर्षांत त्यांच्या वजनांत घट दिसून आली. कमी मेदाम्ले व जास्त कबरेदकांचा आहार, कमी कबरेदक आहार, उच्च मेद आहार व अक्रोडयुक्त आहार, उच्च मेद व कमी कबरेदक आहार वेगवेगळ्या व्यक्तींच्या गटांना देण्यात आले असता अक्रोडयुक्त आहाराने वजन दिवसाला १.५ औसांनी कमी झालेले दिसले.
सहा महिन्यांत आठ टक्के वजन कमी झाले. इन्शुलिन प्रतिकारक रुग्णांमध्येही हा परिणाम दिसला. एलडीएल कोलेस्टेरॉलही कमी झाले व एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल वाढले. एक औंस वजनाच्या अक्रोडमध्ये १३ ग्रॅम बहुअसंपृक्त मेद असतो, त्यात अल्फालिनोलेइक आम्ल व ओमेगा ३ मेदाम्लांचा समावेश असतो.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)