Spinach Juice Benefits: हिवाळ्यात पालकाचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी, के फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. ही सर्व तत्वं एकत्र येऊन हाडं मजबूत ठेवतात, रक्तातील कमतरता दूर करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. बहुतेक लोक विविध भाज्यांमध्ये पालकाचे सेवन करतात, त्यामुळेच पालक या भाजीला “पोषक तत्वांचं पॉवरहाऊस” म्हणतात. तथापि, तुम्ही पालकचा रसदेखील पिऊ शकता.
तज्ज्ञ काय म्हणतात?
साओल हार्ट सेंटर जनरल फिजिशियन डॉ. विमल उजरमांच्या मते पालक एक सुपरफूड आहे, जे हाडांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. पालकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. त्याचे सेवन केल्याने पचनदेखील सुधारते.
पालकाचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ कप ताज्या पालकाची पाने
- अर्धा कप पाणी
- १ चमचा लिंबाचा रस
- अर्धा आल्याचा तुकडा
पालकाचा रस कसा बनवायचा?
- पालकाचा रस बनवण्यासाठी सर्वात आधी पालक साफ करून त्याची पाने स्वच्छा धुवून घ्या.
- त्यानंतर पालकाची पाने बारीक करून मिक्सरच्या भांड्यात टाका; त्यात पाणी, लिंबाचा रस आणि आलं घालून त्याचा रस बनवून घ्या.
- आता रस गाळणीतून गाळून घ्यावा आणि त्यात थोडे मीठ घालून त्याचे सेवन करा.
- तथापि, पालकाचा रस नेहमीच मर्यादित प्रमाणात सेवन करावा. याबद्दल तुम्ही डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकता.
पालकाचे सेवन महिलांसाठी अधिक फायदेशीर
ॲनिमियाची समस्या सोडवते : स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता आणि रक्ताशी संबंधित समस्या खूप सामान्य आहेत. पालकाच्या पानांमध्ये लोह असते, जे ॲनिमियासारख्या लोहाच्या कमतरतेच्या समस्येपासून आराम देते. गर्भवती महिलांसाठीही हे फायदेशीर आहे.
हाडांसाठी : तुम्ही पालक खाऊन तुमच्या हाडांच्या आरोग्याची काळजीदेखील घेऊ शकता. यातील व्हिटॅमिन के आपल्या हाडांसाठी चांगले असते. हे कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते, जे हाडांच्या आजारांपासून संरक्षण करते, म्हणून त्याचे सेवन जरूर करा.
पचनासाठी : वाढत्या वयाबरोबर आपली पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. पालकामध्ये आढळणारे फायबर आपले पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवते.
त्वचेसाठी : पालकामध्ये जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, जे आपली त्वचा निरोगी ठेवतात. हे कोलेजनचे उत्पादन वाढवते, जेणेकरून त्वचा निस्तेज होत नाही आणि तरुण राहते. पालक खाल्ल्याने तुमच्या त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव दिसून येत नाही.
रोगप्रतिकारशक्ती : पालक खाल्ल्याने रोगांशी लढण्यास मदत होईल. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, जी आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालकाचा आहारात समावेश करा.
