Myths & Facts About Warm Water : सकाळी गरम पाणी पिण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर असे अनेक दावे केले जात आहेत की, दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित होते आणि त्वचेचा रंगसुद्धा सुधारतो. तसेच गरम पाणी पिण्याने घसा खवखवणे, महिलांना मासिक पाळीच्या वेदना यांपासूनही आराम मिळतो. पण, या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे? गरम पाणी पिणे हा आणखी एक व्हायरल वेलनेस ट्रेंड आहे का? ही बाब संशोधनातून मिळालेल्या माहितीद्वारे समजून घेऊया…
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील क्वीन्सलँड विद्यापीठातील लॉरेन बॉल आणि सदर्न क्रॉस विद्यापीठातील एमिली बर्च म्हणतात की, कोमट पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित आहे; पण उकळलेले पाणी नाही. तज्ज्ञ म्हणतात की, गरम पाणी पिण्याचे फायदे त्याच्या गरम केलेल्या पाण्यामुळे मिळत नाहीत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास फायदा पाण्याच्या तापमानात नाही, तर तो सवयीत आणि शरीराला मिळणाऱ्या आरामात आहे.
तापमानापेक्षा हायड्रेशन महत्त्वाचे
पाणी गरम असो वा थंड, पाणी शरीरासाठी आवश्यक असतेच. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते, रक्ताभिसरण सुधारते. पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाचे कार्य, रक्तातील साखरेची पातळी सुधारते. एकूण आरोग्यच सुधारते. २०२५ च्या एका अभ्यासानुसार, दररोज पुरेसे पाणी न प्यायल्याने समस्या वाढू शकतात. आजपर्यंत थंड किंवा खोलीच्या तापमानाच्या पाण्यापेक्षा गरम पाणी जास्त फायदेशीर आहे हे सिद्ध करणारा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा आजवर आलेला नाही.
गरम पाणी वजन कमी करण्यात मदत करते?
गरम पाणी पिण्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते, असे कोणतेही संशोधन नाही. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, पाणी पिण्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अतिरिक्त अन्न सेवन करण्याची वा साखरयुक्त पेय पिण्याची इच्छा कमी होते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, पाण्याचे तापमान वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते याचा कोणताही विशिष्ट पुरावा नाही. एका लहान अभ्यासात असे आढळून आले आहे की, गरम पाणी आतड्यांसंबंधीचे पेरिस्टॅलिसिस किंचित वाढवू शकते, जे पचनास मदत करू शकते. पण, याचा अर्थ असा नाही की, त्यामुळे चरबी कमी होते.
घसा खवखवणे बरे होते?
तापमानाचा परिणाम येथे काही प्रमाणात सिद्ध झाला आहे. पाणी गरम असल्यामुळे खवखवण्याचा त्रास कमी होणे आणि चोंदलेले नाक खुले झाल्यामुळे श्वासोच्छ्वास मोकळेपणाने करता येणे यांसाठी मदत मिळू शकते. गरम पाण्याच्या उष्णता वा वाफेमुळे श्लेष्मा वा कफ सैल करण्यास आणि घशातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते. हा फायदा फक्त गरम पाण्यापुरता मर्यादित नाही. हर्बल टी, लिंबूपाणी किंवा इतर गरम पेयेदेखील त्यासाठी प्रभावी आहेत. गरम पाणी संसर्ग बरा करत नाही किंवा आजाराचा कालावधी कमी करत नाही; ते फक्त त्रासदायक लक्षणे दूर करण्यासाठी साह्यभूत ठरू शकते.
गरम पाण्याने त्वचा स्वच्छ होते?
गरम पाणी प्यायल्याने त्वचा स्वच्छ होते किंवा शरीर विषमुक्त होते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. परंतु, पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि कोरडेपणा नियंत्रित होतो हे खरे आहे. त्यामुळे पाणी थंड असो किंवा गरम तापमानाचा त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही. यकृत आणि मूत्रपिंडे शरीर विषमुक्त करण्यासाठी जबाबदार असतात आणि पाणी त्यांच्या कार्यात फक्त मदत करते.
मासिक पाळीच्या वेदना कमी होतात?
शरीराला मासिक पाळीदरम्यान बाहेरून उष्णता दिल्याने म्हणजेच गरम पाण्याच्या पिशवीचा शेक दिल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि त्यामुळे वेदना कमी होतात. पण, फक्त कोमट पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात याबाबतचा कोणताही ठोस पुरावा नाही. हे खरे आहे की, मासिक पाळीदरम्यान पुरेसे पाणी प्यायल्याने जळजळ कमी होते. चहा, ग्रीन टी, थायम टी प्रोस्टॅग्लॅंडिनची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. पण, फक्त कोमट पाणी मासिक पाळीच्या वेदना कमी करू शकत नाही.

