Warning signs of Unhealthy Gut: आपण दररोज जे अन्न खातो, त्याचा परिणाम केवळ पोटावरच नाही, तर संपूर्ण शरीरावर होत असतो. आपल्या आतड्यांमध्ये कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. त्यातील अनेक सूक्ष्मजीव पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मात्र, सतत जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न किंवा अस्वच्छ अन्नपदार्थ खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते. काही वेळा आतड्यांमध्ये परजीवी किड्यांचाही संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला ही समस्या साधी वाटली तरी दुर्लक्ष केल्यास ती गंभीर स्वरूप धारण करू शकते.
विशेष म्हणजे शौचाच्या सवयींमध्ये होणारे काही बदल हे आतड्यांमध्ये किडे झाल्याचे संकेत असू शकतात. हे संकेत वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. कोणती आहेत ही लक्षणे, ते जाणून घेऊया.
१. गॅस सोडताना तीव्र वेदना होणे
वारंवार गॅस होणे ही सामान्य बाब असली तरी गॅस सोडताना तीव्र वेदना होत असतील, पोटात कळा येत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आतड्यांमध्ये परजीवी किड्यांचा संसर्ग झाल्यास अशी लक्षणे दिसू शकतात. ही समस्या सतत जाणवत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
२. सतत अॅसिडिटी, उलट्या किंवा छातीत जळजळ
काहीही खाल्ल्यानंतर वारंवार अॅसिडिटी होणे, उलटी होणे, छातीत जळजळ जाणवणे किंवा अन्न घशात अडकल्यासारखे वाटणे हीही चिंतेची बाब असू शकते. पचनसंस्थेतील बिघाड किंवा आतड्यांतील परजीवी यांमुळे अशी लक्षणे दिसू शकतात. ही समस्या वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
३. सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब
आतड्यांचे आरोग्य बिघडल्यावर सर्वांत आधी शौचाच्या सवयी बदलतात. काहींना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, तर काहींना जुलाब होतात. प्रक्रिया केलेले अन्न अधिक प्रमाणात खाल्ल्यास ही समस्या वाढू शकते. औषधोपचार करूनही आठवडाभर त्रास कमी होत नसेल, तर त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे.
४. सतत फुगलेले पोट
जेवणानंतर थोडा वेळ पोट फुगणे सामान्य असू शकते. मात्र, दिवसभर पोट फुगलेले राहणे, पोटात ताण जाणवणे किंवा अस्वस्थता वाटणे ही आतड्यांतील समस्येची सूचना असू शकते. आतड्यांमध्ये किड्यांचा संसर्ग झाल्यासही असे होऊ शकते. त्यामुळे ही लक्षणे सतत जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. पौष्टिक आहार घेत असूनही शरीराला फायदा न होणे
आपण संतुलित आणि पौष्टिक आहार घेत असाल आणि तरीही शरीरात अशक्तपणा जाणवत असेल, वजन कमी होत असेल किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता जाणवत असेल, तर त्यामागे आतड्यांचे आरोग्य कारणीभूत असू शकते. काही परजीवी किडे शरीरातील पोषक घटक स्वतः शोषून घेतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि विविध तक्रारी सुरू होतात.
दुर्लक्ष करू नका
शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे, पोटाशी संबंधित त्रास वारंवार जाणवणे किंवा वरीलपैकी कोणतीही लक्षणे सातत्याने दिसत असतील, तर स्वतःहून औषधे घेण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. योग्य तपासणी आणि उपचारांमुळे समस्या लवकर नियंत्रणात येऊ शकते. तसेच स्वच्छ अन्न, पुरेसे पाणी, तंतुमय आहार आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
(टीप : ही माहिती सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणतीही लक्षणे सतत जाणवत असल्यास स्वतः उपचार न करता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
