Dental floss vs water flosser Which is better : दिवसातून दोनदा ब्रश करूनही दातांमध्ये घाण साचते का? तुम्हाला प्रश्न पडतो का की, नियमित दात घासूनही ही समस्या का होते? काळजी करू नका. याचे कारण म्हणजे टूथब्रशने दातांमधील बारीक जागा पूर्णपणे स्वच्छ करणे शक्य नसते. त्यामुळे दातांच्या फटींमध्ये अन्नाचे छोटे कण आणि घाण अडकून राहू शकते.

अशा परिस्थितीत, डेंटल फ्लॉस आणि वॉटर फ्लॉसर वापरले जाऊ शकतात. पण यापैकी कोणती पद्धत सगळ्यात चांगली आहे? धाग्याने फ्लॉसिंग करण्यापेक्षा पाण्याच्या प्रवाहाने दात स्वच्छ करणे अधिक चांगले आहे का? याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने कॉस्मेटिक दंतवैद्य डॉक्टर निशा ठक्कर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या दोन्हींचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत.

डेंटल फ्लॉस म्हणजे काय आणि ही पद्धत कशी काम करते?

डेंटल फ्लॉस हा एक पातळ धागा आहे जो दातांमध्ये अडकलेली घाण आणि प्लाक काढून टाकण्यास मदत करतो. प्लाक हा बॅक्टेरियाचा एक चिकट थर असतो जो दातांवर जमा होऊ शकतो. जर तो वेळेवर स्वच्छ केला नाही, तर त्यामुळे हिरड्यांच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

डेंटल फ्लॉसचे फायदे

प्लाक काढण्यास मदत – फ्लॉस दातांमधील प्लाक घासून तो काढून टाकण्यास मदत करतो. यामुळे हिरड्यांच्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

कमी किंमत – कोणत्याही यंत्राची किंवा विजेची आवश्यकता नसते आणि सहज उपलब्ध होते.

स्वछता – फ्लॉसिंगमुळे तुम्हाला गरजेनुसार दातांमधील फटी आणि दातांच्या कडा स्वच्छ करता येतात.

डेंटल फ्लॉस वापरताना अडचण आल्यास काय करावे?

काही लोकांना डेंटल फ्लॉस वापरणे अवघड वाटते. कधीकधी धागा दातांमध्ये अडकतो किंवा तो व्यवस्थित धरण्यात अडचण येते. त्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी फॉलो करू शकता.

फ्लॉस दातांमध्ये अडकणे – जर फ्लॉस दातांमध्ये सहजपणे सरकत नसेल. तर तुम्ही वॅक्स्ड फ्लॉस वापरू शकता. तो दातांमध्ये सहजपणे सरकतो.

वापरण्यात अडचण – जर तुम्हाला बोटांनी फ्लॉस धरण्यात आणि हलवण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही फ्लॉस होल्डर वापरू शकता. त्याचा धागा एका लहान हँडलला जोडलेला असतो, ज्यामुळे तो वापरण्यास सोपा होतो.

इतर पर्याय – जर तुम्हाला डेंटल फ्लॉस वापरणे अवघड वाटत असेल. तर तुम्ही इंटरडेंटल ब्रश, डेंटल पिक किंवा दातांमधील फटी स्वच्छ करण्यासाठी बनवलेली एक विशेष काडी वापरू शकता.

आता, वॉटर फ्लॉसर म्हणजे काय जाणून घेऊया…

वॉटर फ्लॉसर, ज्याला ओरल इरिगेटर असेही म्हणतात, हे एक असे उपकरण आहे जे पाण्याचा प्रवाह सोडते. हा प्रवाह दातांमध्ये अडकलेले अन्नाचे लहान कण आणि इतर घाण काढून टाकण्यास मदत करतो.

वॉटर फ्लॉसरचे फायदे

अन्न काढण्यास मदत – दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण पाण्याच्या प्रवाहाने सहजपणे काढता येतात.

प्लाक काढण्यास मदत – वॉटर फ्लॉसरमधून वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे दातांवर साचलेला प्लाक काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. मात्र, डेंटल फ्लॉसप्रमाणे हा प्लाक घासून काढत नाही.

वापरण्यास सोपे – ज्यांना हाताने फ्लॉस करणे अवघड वाटते. त्यांच्यासाठी वॉटर फ्लॉसर एक चांगला पर्याय असू शकतो. ज्यांना ब्रेसेस किंवा इम्प्लांट्स आहेत त्यांच्यासाठीही हे उपयुक्त ठरू शकते.

वॉटर फ्लॉसर वापरण्याचे तोटे

पाण्याची धार दातांमधील प्रत्येक लहान जागेपर्यंत डेंटल फ्लॉसप्रमाणे पूर्णपणे पोहोचत नाही.

तुम्ही तुमचा वॉटर फ्लॉसर दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नका. यामुळे जिवाणू पसरण्याचा धोका वाढू शकतो.

सुरुवातीला खरेदी करण्यासाठी जास्त खर्च येऊ शकतो. या उपकरणाची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे देखील आवश्यक आहे.

डेंटल फ्लॉस की वॉटर फ्लॉसर, यापैकी काय चांगले आहे?

डॉक्टर सांगतात की, दोन्ही पद्धतींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. सर्वोत्तम पद्धत तीच आहे जी तुम्ही नियमितपणे आणि योग्यरित्या वापरू शकता.

जर तुम्हाला डेंटल फ्लॉस वापरणे सोपे वाटत असेल आणि त्यामुळे कोणताही त्रास होत नसेल, तर तो बदलण्याची गरज नाही. मात्र, डेंटल फ्लॉस वापरणे कठीण वाटत असेल किंवा दातांना ब्रेसेस अथवा इम्प्लांट्स बसवले असतील, तर वॉटर फ्लॉसर हा चांगला पर्याय ठरू शकतो.

महत्त्वाची टीप: दातांमधील जागा स्वच्छ ठेवणे हे दररोज ब्रश करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या दातांची स्थिती आणि गरज लक्षात घेऊन डेंटल फ्लॉस की वॉटर फ्लॉसर, यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, हे ठरवण्यासाठी दंतवैद्यांचा सल्ला घ्या.