Drinking Water In Copper Vessel: तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी खूप गुणकारी मानले जाते. आयुर्वेदातही या पाण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भारतात तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची एक जुनी परंपरा आहे. पूर्वी स्टीलची भांडी कमी प्रमाणात वापरली जायची. कारण- आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी शरीर शुद्ध करते. इतकेच नाही, तर ही भांडी अनेक आजार टाळण्यासही मदत करतात, असे मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर अयोग्य पद्धतीने वापर केला, तर ही फायदेशीर सवय हानिकारक आणि कधी कधी जीवघेणीसुद्धा ठरू शकते? जर तुम्ही तांब्याची भांडी वापरत असाल, तर तांब्याच्या भांड्यातील पाणी केव्हा हानिकारक ठरू शकते आणि कोणती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवे.

तांब्याच्या भांड्यातले पाणी विषारी केव्हा बनते?

तांब्याच्या भांड्यातले पाणी वापरणे फायदेशीर मानले जाते; परंतु त्या भांड्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही नक्कीच आजारी पडू शकता. त्यामुळे, तांब्याची भांडी नियमित अंतराने स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त प्यायल्यास लक्षणे

  • उलट्या किंवा मळमळ
  • पोटदुखी
  • चक्कर येणे
  • गंभीर प्रकरणांमध्ये यकृताचे नुकसान

तांब्याची भांडी वापरणे कोणी टाळावे?

  • यकृत रोग असलेले
  • मूत्रपिंडाचे रुग्ण
  • लहान मुलं

कोणत्या परिस्थितीत नुकसान होऊ शकते?

  • तांब्यामध्ये असलेला घटक शरीरासाठी आवश्यक असतो; परंतु त्याचे अतिरिक्त प्रमाण तांब्याच्या विषबाधेला कारणीभूत ठरू शकते. जर एखादी व्यक्ती दिवसभर फक्त तांब्याच्या भांड्यातून पाणी पीत असेल, तर त्यामुळे शरीरातील तांबे धातूचे प्रमाण वाढू शकते.
  • तुम्ही पाणी जास्त काळ साठवून ठेवल्यास ही समस्या उदभवू शकते. तांब्याच्या भांड्यात पाणी आठ तासांपर्यंत साठवणे फायदेशीर मानले जाते; परंतु ते २४ तास किंवा त्याहून अधिक काळ साठवल्यास पाण्यातील तांब्याचे प्रमाण वाढू शकते.
  • तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास, त्याची तांब्याशी रासायनिक अभिक्रिया होऊन, तो पदार्थ विषारी बनू शकतो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये लिंबूपाणी किंवा कोणतेही आंबट पदार्थ ठेवणे टाळा.
  • तांब्याच्या भांड्यांवर कालांतराने एक थर जमा होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे तांब्याची भांडी आठवड्यातून तीन वेळा लिंबू आणि मीठ लावून स्वच्छ करावीत.

दैनंदिन जीवनात कोणता ग्लास वापरावा?

आधुनिक काळात सर्वाधिक वापरात असलेला पर्याय म्हणजे स्टील. तो टिकाऊ, न गंजणारा आणि कोणत्याही पेयासाठी सुरक्षित आहे. पाण्याच्या गुणधर्मात तो कोणताही बदल करत नाही. त्यामुळे रोजच्या वापरासाठी स्टीलची भांडी वापरणे सर्वांत सुरक्षित मानले जाते. पितळेच्या वस्तू तुम्ही अधूनमधून वापरू शकता. उन्हाळ्यात थंडावा हवा असल्यास चांदी किंवा मातीचा ग्लास निवडू शकता.