Clean Water Tank Naturally: पावसाळा सुरू झाला की, घरातील पाण्याच्या टाकीकडे विशेष लक्ष देणं आवश्यक ठरतं. या दिवसांत टाकीत शेवाळ, चिखल, धूळ आणि सूक्ष्मजंतू साचण्याची शक्यता वाढते. अशा टाकीतील पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर किमान एकदा तरी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

मात्र, टाकी स्वच्छ करणं हे अनेकांना कंटाळवाणं आणि कष्टाचं काम वाटतं. टाकीत उतरावं लागतं, भिंती घासाव्या लागतात आणि बराच वेळ खर्च होतो. पण एका यूट्यूबरने अशी एक सोपी युक्ती सांगितली आहे की, ज्यामुळे टाकीत न उतरता आणि आतून ती घासताही टाकी स्वच्छ होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

या ट्रिकसाठी बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या एका स्वस्त पांढऱ्या पावडरचा वापर केला जातो. ही पावडर इतर एका घरगुती वस्तूसोबत मिसळून तयार केलेलं द्रावण टाकीत टाकायचं असतं. हे द्रावण टाकीच्या भिंतींवर आणि तळाशी साचलेलं शेवाळ, बुरशी आणि घाण सैल करण्यास मदत करतं, त्यामुळे नंतर जास्त घासण्याची गरज राहत नाही, असा दावा करण्यात आला आहे.

असं तयार करा द्रावण

सर्वप्रथम एका बादलीत किंवा डब्यात पाणी घ्या. त्यात एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळा. त्यानंतर दोन मोठे चमचे ब्लीचिंग पावडर टाकून द्रावण नीट हलवा. पावडर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते मिसळत राहा. हे द्रावण तयार करताना तीव्र वास येऊ शकतो, त्यामुळे मास्क आणि हातमोजे वापरणं अधिक सुरक्षित ठरेल.

टाकीत कसं वापरायचं?

सर्वप्रथम टाकीतील शक्य तितकं पाणी वापरून टाका किंवा बाहेर काढा. टाकी अर्ध्यापेक्षा जास्त रिकामी झाल्यावर तयार केलेलं द्रावण त्यात ओता. त्यानंतर टाकी सुमारे ३० मिनिटे तशीच राहू द्या. या काळात द्रावण टाकीच्या आतील पृष्ठभागावर काम करू लागते.

अर्धा तास झाल्यानंतर जिथपर्यंत सहज हात पोहोचेल, त्या भागावर मऊ कापड किंवा हलक्या ब्रशने फक्त एकदा पुसून घ्या. त्यानंतर टाकीतील सर्व पाणी पूर्णपणे बाहेर काढा.

शेवटची महत्त्वाची पायरी विसरू नका

टाकी रिकामी केल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने एकदा पूर्ण भरून धुवा आणि ते पाणीही बाहेर सोडा. त्यानंतरच टाकीतील पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरा. त्यामुळे टाकीत उरलेले रसायनांचे अंशही निघून जातील.

स्वच्छता करताना या गोष्टी लक्षात ठेवा

टाकी स्वच्छ करताना झाकण उघडं ठेवा, जेणेकरून तयार होणारा वास आणि वायू बाहेर पडेल. द्रावण तयार करताना हातमोजे, मास्क आणि शक्य असल्यास डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे वापरा. टाकीतील घाणेरडं पाणी घरातील वापराच्या पाइपलाईनमध्ये जाऊ देऊ नका.

(टीप : या लेखातील माहिती यूट्यूबवरील एका व्हिडीओमध्ये सांगितलेल्या पद्धतीवर आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. हा उपाय वापरण्यापूर्वी आवश्यक ती काळजी घ्या. कोणतेही रसायन वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे.)