Watermelon Seeds Benefits : उन्हाळ्यात अनेक फळे बाजारात उपलब्ध होतात. त्या फळांचा आहारात समावेश करुन तुम्हाला या ऋतूमध्ये स्वत:ला निरोगी ठेवता येते. उन्हाळ्यात आंबा, चिकू फळांबरोबर कलिंगड फळही मोठ्याप्रमाणात उपलब्ध होते. अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले कलिंगड उन्हाळ्यात शरीरास पाण्याचा पुरवठा तर करतेच शिवाय आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांपासूनही दूर ठेवते. मानसिक आरोग्यासाठीही कलिंगड खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, केवळ कलिंगडचं नाही तर त्याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे कलिंगडातील बिया खाऊन फेकण्यापूर्वी त्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.
१) प्रजनन क्षमतेसंबंधित समस्यांवर प्रभावी
कलिंगडातील बिया पुरुषांसाठी एका वरदानापेक्षा कमी नाहीत. याच्या वापराने प्रजनन क्षमतेसंबंधित समस्यांपासून खूप आराम मिळतो. कलिंगडातील बिया खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या तर वाढतेच पण प्रजनन क्षमताही सुधारते. याशिवाय झिंक शुक्राणूंची गुणवत्ताही वाढण्यास मदत होते.
२) ह्रदय निरोगी राहते
कलिंगडाच्या बिया ह्रदयासाठीही खूप फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड ह्रदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.
३) पचन संस्था सुधारते
जर तुम्ही कलिंगडाच्या बियांचे सेवन केले तर तुमच्या पचनसंस्थेलाही त्याचा खूप फायदा होतो. जर तुम्हाला पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर कलिंगडाच्या बियांचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
४) वजन कमी करण्यास प्रभावी
जर तुम्हाला तुमचे वजन सहज कमी करायचे असेल तर त्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयोगी पडतात. कारण या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
५) हाडे मजबूत होतात
हाडांच्या मजबूतीसाठीही कलिंगडाच्या बिया खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले ओमेगा ३, फॅटी अॅसिड, प्रथिने, झिंक, फोलेट, पोटॅशियम, कॉपर हे नॅच्युरल मल्टीव्हिटामिन्ससारखे काम करतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
६) त्वचेचे आरोग्य सुधारते
कलिंगडाच्या बिया केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. या बिया बारीक करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते शिवाय ब्लॅकहेड्सही दूर होतात. तसेच चेहऱ्यावर एक ग्लो येतो.