शहरांमधल्या वायुप्रदूषणामुळे श्वसनविकार, घशाचे संसर्ग व ॲलर्जीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांमध्ये याचा अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे. धुरकट वातावरण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे ठरत आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, घशात खवखव, दमा, ब्राँकॉयटिस आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यांत वाढली आहे. डॉ. सुलैमन लढानी, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, सैफी हॉस्पिटल यांच्या मते, सध्या आजूबाजूला वाढलेला खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास ही केवळ योगायोगाने दिसणारी लक्षणे नाहीत. तर बदलणारे हवामान आणि सातत्याने खालावत चाललेली हवेची गुणवत्ता (AQI) यांचा थेट आणि धोकादायक परिणाम आहे. विशेषतः शहरी भारतात, ऋतुबदलाच्या काळात तापमानातील चढ-उतार आणि प्रदूषणाची वाढलेली पातळी यांचा संयुक्त परिणाम खालच्या श्वसनमार्गाच्या संसर्गांना (LRTIs) मोठ्या प्रमाणात चालना देत आहे.
ही बाब केवळ निरीक्षणापुरती मर्यादित नसून, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि क्लिनिकलीही स्पष्टपणे दिसून येते. अचानक बदलणारे तापमान आणि आर्द्रतेतील अस्थिरता फुप्फुसांच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला कमकुवत करतात. त्याचबरोबर PM2.5 आणि PM10 सारखे सूक्ष्म धूलिकण श्वसनमार्गांना हानी पोहोचवून प्रतिकारशक्ती कमी करतात. परिणामी, विषाणू आणि जीवाणूजन्य संसर्गांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. त्याशिवाय प्रदूषणामुळे दीर्घकालीन जळजळ निर्माण होते. तसेच प्रदूषणाचा शरीराच्या एकूण प्रतिकारशक्तीवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे ब्राँकॉयटिस, न्यूमोनिया आणि आधीपासून असलेल्या फुप्फुसांच्या आजारांचे तीव्र झटके (flare-ups) अधिक प्रमाणात आढळतात.
विशेषतः काही गट अधिक धोक्यात आहेत
पाच वर्षांखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, COPD, हृदयरोग किंवा मधुमेह असलेले रुग्ण, तसेच अस्थमा किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती.
ही लक्षणे वेळेवर ओळखा
लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा किंवा ताण, श्वास घेताना घरघर, तसेच ताप ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत. श्वास घेण्यास तीव्र अडथळा, ओठ किंवा नखांचा रंग बदलणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. प्रदूषित वातावरणात ही लक्षणे दुर्लक्षित केल्यास परिस्थिती झपाट्याने बिघडू शकते.
प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात. प्रदूषणाची पातळी जास्त असताना बाहेर जाणे टाळा आणि नियमितपणे AQI तपासा. बाहेर पडताना योग्य प्रकारे बसणारा N95 मास्क वापरा आणि जड शारीरिक हालचाली टाळा. घरात स्वच्छ हवा राखण्यासाठी HEPA फिल्टर असलेले एअर प्युरिफायर वापरा, धूम्रपान टाळा तसेच धूप किंवा एरोसोलचा वापर कमी करा. पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि इन्फ्लुएन्झा तसेच न्यूमोकॉकल लसीकरण अद्ययावत ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ हवा पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसली तरी सजगता, योग्य काळजी आणि वेळेवर उपाययोजना यांमुळे फुप्फुसांवरील दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.
