नवरा नवरीचा फोटो काढता काढता फोटोग्राफर थेट स्विमिंग पूलमध्ये! व्हिडीओ तुफान व्हायरल

लग्नसमारंभातील सगळे सुंदर क्षण टिपण्याच्या प्रयत्नात गुंग असलेल्या फोटोग्राफर्सच्या वाट्याला काही वेळा असे गंमतीदार प्रसंगही येऊ शकतात.

wedding photographer falls into swimming pool Video viral gst 97
एका लग्नातील फोटोग्राफर थेट तिथल्या स्विमिंग पूलमध्ये पडला आणि हा क्षणसुद्धा कॅमेरात कैद झाला. (Photo : AperinaStudios/Instagram)
फोटोग्राफरशिवाय लग्नसमारंभ? म्हणजे जवळपास अशक्यच गोष्ट. नवनव्या क्रिएटिव्ह कल्पनांसह लग्नसमारंभातील सगळे सुंदर क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर तर हवाच! फोटोग्राफर्स देखील पूर्णवेळ अगदी याच प्रयत्नात अगदी गुंग असतात. पण यामुळे काही गंमतीदार प्रसंगही त्यांच्या वाट्याला येऊ शकतात. नुकताच एका लग्नसमारंभात एक किस्सा घडला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे. एका लग्नातील फोटोग्राफर चुकून थेट तिथल्या स्विमिंग पूलमध्ये पडला आणि हा क्षणसुद्धा कॅमेरात कैद झाला. या प्रसंगाच्या २ छोट्या क्लिप सध्या प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एपेरिना स्टुडिओजने या प्रसंगाच्या दोन क्लिप्स इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.

सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या क्लिपमध्ये दिसत आहे कि, या लग्नसोहळ्याचं आयोजन एका भव्य व्हिलामध्ये करण्यात आलं होतं. पारंपारिक पोशाख घातलेले वर आणि वधू या व्हिलामधून बाहेर पडले आणि तलावाच्या दिशेने निघाले. हाचं क्षण रेकॉर्ड करण्यासाठी तलावाजवळ उभे असलेले सर्व फोटोग्राफर्स कॅमेऱ्यावर हा संपूर्ण शॉट घेताना मागे मागे गेले. असंच मागे जाता जाता त्यापैकी एक फोटोग्राफर मात्र थेट पाठीच असलेल्या स्विमिंगपुलमध्ये पडला. पण विशेष म्हणजे लगेचच त्याने वर येऊन स्वतःला सावरलं. दरम्यान, तिथे उपस्थितांमध्ये साहजिकच खसखस पिकली आणि इन्टाग्रामवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

वधू-वराची भन्नाट रिअ‍ॅक्शन

अपेरिना स्टुडिओने याच प्रसंगाची आणखी एक स्लो-मोशन व्हिडीओ क्लिप पोस्ट केली. ही क्लिप तर अगदी जवळून शूट केलेली आणि स्पष्ट आहे. ज्यामध्ये फोटोग्राफरचं पाण्यात पडणं आणि वधू-वरची त्यावरची आधी आणि नंतरची भन्नाट रिअ‍ॅक्शन अगदी स्पष्ट रेकॉर्ड झाली आहे. दरम्यान, या दोन्ही क्लिप्स इंस्टाग्रामवर प्रचंड  व्हायरल झाल्या आहेत. अनेक युझर्सनी या पोस्टच्या कॉमेंट्स सेक्शनमध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

जिंकली मनं

काहीजण या व्हायरल व्हिडीओवर नुसतेच हसले आहेत. तर काहींनी त्या फोटोग्राफरचं कौतुक केलं आहे. आपल्या शॉटकडे पूर्ण लक्ष असल्याने चुकून तो पाण्यात पडला हे खरं. मात्र तितक्याच वेगाने त्याने स्वतःला सावरलं, याबद्दल युझर्सनी त्याचं कौतुक केलं आहे. याचसोबत, या दुसऱ्या क्लिपमध्ये वधू-वरची या संपूर्ण प्रसंगावरची प्रतिक्रिया अत्यंत सुंदर आणि नेमक्या रीतीने टिपल्याबाबत देखील अनेकांनी प्रशंसा केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wedding photographer falls into swimming pool video viral gst