Weight Gain Diet Tips : “मी खूप खातो; पण तरीही माझे वजन वाढत नाही,” हे तुम्ही कधी ना कधी कोणाकडून ना कोणाकडून नक्कीच ऐकले असेल. दुबळेपणा ही एक अतिशय सामान्य समस्या आहे आणि त्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात. अशा परिस्थितीत वजन वाढविण्यासाठी लोक अनहेल्दी स्नॅकिंग (अयोग्य खाणं)देखील सुरू करतात. लोक त्यांच्या आहारात पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईझ आणि सर्व प्रकारचे अनारोग्यकारक पर्याय समाविष्ट करतात.

पण, तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की, हे खाल्ल्याने शरीरावर चरबी तर वाढते; पण ती अनारोग्यकारी चरबी असते. तुम्ही बाहेरून जरी तंदुरुस्त दिसत असाल तरी आतून चयापचय (मेटाबॉलिजम) कमजोर राहतो. अशा परिस्थितीत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करून सांगितले आहे की, दुबळेपणाच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी लोकांनी कोणत्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करावा.

डॉक्टर काय म्हणतात?

वेट गेन (वजन वाढवणे) म्हणजे शरीराला आवश्यकतेपेक्षा थोड्या जास्त ऊर्जेची गरज असणे; पण त्यासाठी जंक फूडचे सेवन करू नये. जंक फूड तुमचे स्नायूंचे वस्तुमान (मसल मास) वाढवत नाही; मात्र पोटाची चरबी वाढवते. त्याशिवाय जंक फूड खाल्ल्याने पोटाशी संबंधित इतर अनेक प्रकारच्या समस्यादेखील होऊ लागतात.

वजन वाढवण्यासाठी काय खावे?

गव्हाची लापशी : दुधात तयार केलेल्या गव्हाच्या लापशीमध्ये भरपूर प्रमाणात उष्मांक, आरोग्यदायी कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम व तंतू असतात, जे आरोग्यस्नेही पद्धतीने वजन आणि स्नायू वाढवण्यास मदत करतात. हा एक संतुलित आहार आहे, जो नाश्त्यासाठी सर्वोत्तम आहे आणि त्याचबरोबर हा आरोग्यदायी चरबी वाढवण्याचा एक परिपूर्ण पर्यायदेखील आहे.

केळी आणि पीनट बटर: या दोन्ही गोष्टी उष्मांक, आरोग्यदायी चरबी, प्रथिने, कर्बोदकांनी परिपूर्ण असतात, जे स्नायुबल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. केळीसोबत पीनट बटर एकत्र केल्याने आरोग्यदायी चरबी, प्रथिने आणि मॅग्नेशियम मिळते.

पनीर, दही, लस्सी आणि ग्रीक योगर्ट: वजन वाढवण्यासाठी पनीर हा एक उत्तम आहार मानला जातो. कारण- ते प्रथिने आणि आरोग्यदायी चरब दोन्ही पुरवते. उष्मांक वाढवण्यासाठी आरोग्यदायी चरबी हे आवश्यक असतात. दुसरीकडे, दही आणि ग्रीक योगर्ट पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. लस्सी आणि ताकदेखील पोटासाठी अत्यंत गुणकारी आहेत. त्यामुळे पोटाचे आजार दूर होण्यास मदत होते; मात्र दररोज गोड लस्सी पिणे टाळावे.