Weight Loss Trend On Social Media: सोशल मीडियावर सध्या वेगाने वजन कमी करण्याच्या टिप्सचा पूर आलेला दिसत आहे. एका प्रसिद्ध फिटनेस इन्फ्लुएन्सरने ‘१५ दिवसांत १५ किलो वजन कमी करण्याचे १५ नियम’ सांगणारी एक यादी व्हायरल केली आहे. यामध्ये सकाळी जिऱ्याचं पाणी पिणे, सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यानच जेवणे, मैदा आणि साखर बंद करणे आणि आठवड्यातून एकदा ‘डिटॉक्स डे’ पाळणे अशा नियमांचा समावेश आहे. मात्र हे दावे किती खरे आणि सुरक्षित आहेत? ‘अॅस्टर आरव्ही हॉस्पिटल’मधील वरिष्ठ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अदिती प्रसाद आपटे यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यावर प्रकाश टाकला आहे.

खरोखरच ५० दिवसांत १५ किलो वजन कमी होऊ शकते का?

तज्ज्ञांच्या मते याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे आहे. अदिती आपटे सांगतात की, “५० दिवसांत १५ किलो वजन कमी करणे हे वास्तववादी आणि शाश्वत उद्दिष्ट नाही. अशा प्रकारे वजन कमी केल्यास शरीरातील केवळ पाण्याचे वजन (Water weight) कमी होते, चरबी (Fat) कमी होत नाही.”

कॅलरीजमध्ये अचानक मोठी कपात केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. “अत्यंत कमी कॅलरीज घेतल्यास पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते आणि स्नायूंचे नुकसान (Muscle loss) होऊ शकते. यामुळे थकवा, चिडचिड आणि रोगप्रतिकारक शक्ती अचानक कमी होण्याचा धोका असतो,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

अतिरेकी डाएट दीर्घकाळ का टिकत नाही?

अनेक नियम केवळ अन्नावर लक्ष केंद्रित करतात, मात्र शरीराच्या नैसर्गिक चक्राकडे (Circadian Rhythm) दुर्लक्ष करतात.

आपटे स्पष्ट करतात की, “वजन कमी करण्यासाठी वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमचे हार्मोन्स आणि पचनसंस्था सुदृढ राहते. केवळ आहार बदलून चालत नाही, तर तुमची झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंटही तितकेच महत्त्वाचे आहे.”

डिटॉक्स ड्रिंक्स आणि ‘क्विक फिक्सेस’चे वास्तव

जिऱ्याचं पाणी, आवळा शॉट्स किंवा आठवड्यातून एकदा केला जाणारा डिटॉक्स – हे उपाय जादूची काठी नाहीत. तज्ज्ञांच्या मते, “डिटॉक्स वॉटर केवळ तुमची पचनशक्ती आणि चयापचय क्रिया (Metabolism) सुधारण्यास मदत करते. मात्र केवळ याच्या जोरावर वजन कमी होऊ शकत नाही.” तसेच चहा बंद करणे किंवा कार्बोहायड्रेट सायकलिंग यांसारख्या गोष्टी चांगल्या सवयी असू शकतात, पण त्या थेट फॅट बर्न करण्यास मदत करत नाहीत.

हे नियम पूर्णपणे निरुपयोगी आहेत का?

भाज्यांचे प्रमाण वाढवणे, प्रथिनांचा (Protein) समावेश करणे, तेलावर नियंत्रण मिळवणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे या सवयी नक्कीच चांगल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, “प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. एखादा ‘जेनेरिक’ डाएट प्लॅन सर्वांनाच लागू होईल असे नाही. तुमच्या शरीराची पचनक्षमता आणि प्रतिसाद वेगवेगळा असतो, त्यामुळे वैयक्तिक सल्ला (Personalized plan) जास्त महत्त्वाचा ठरतो.”

वजन कमी करण्याचा योग्य मार्ग कोणता?

आरोग्यदायी वेग: आठवड्याला ५०० ग्रॅम ते १ किलो वजन कमी करणे हे सुरक्षित मानले जाते.

फक्त आहार पुरेसा नाही: केवळ आहार बदलून चालणार नाही. नियमित शारीरिक हालचाल आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन वजन कमी करण्याच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचे आहे.

व्हायरल होणारे नियम केवळ मार्गदर्शक असू शकतात, मात्र त्यातून चमत्काराची अपेक्षा करणे चुकीचे आहे. शाश्वत वजन कमी करण्यासाठी शॉर्टकटऐवजी जीवनशैलीत सातत्यपूर्ण बदल करणे गरजेचे आहे.