लिंबूवर्गीय फळांमुळे लठ्ठपणावर मात

‘संत्री-लिंबू पैशापैशाला, शाळेतल्या मुली आल्या खेळायला..’

‘संत्री-लिंबू पैशापैशाला, शाळेतल्या मुली आल्या खेळायला..’ हे गाणे आपल्याला बालपणीच्या खेळांची आठवण करून देते. बालपणी खेळल्या जाणाऱ्या या छोटय़ा-छोटय़ा मैदानी खेळांमुळे आपले शरीर सुदृढ राहत असे आणि वजनही आटोक्यात ठेवण्याचे काम हे खेळ करीत. पण जसे आपण मोठे झालो, आपली जीवनशैली बदलली तसे लठ्ठपणाचे प्रमाण वाढीस लागले. या लठ्ठपणावरही संत्रा, लिंबू हेच उपाय आहेत. आम्ही खेळांविषयी बोलत नसून खरोखरच्या संत्रे व लिंबू या फळांबाबत बोलतोय. संत्रे आणि लिंबाचा आहारात समावेश केल्याने लठ्ठपणामुळे निर्माण होणारे आजार कमी होतात, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे.

लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री, लिंबू, मोसंबी या फळांमध्ये ‘अँटीऑक्सिडंट’ भरपूर प्रमाणात असतात. हे लठ्ठपणामुळे निर्माण होणारी विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकतात. त्यामुळे लठ्ठपणासोबत येणारे मधुमेह, हृदयविकार, जठरासंबंधित आजार दूर ठेवण्यास मदत होते. जेव्हा आपण जास्त स्निग्ध पदार्थ खातो, तेव्हा आपल्या शरीरातील स्निग्धता वाढते. ही स्निग्धता शरीरातील इतर पेशींना मारक ठरते. संत्रे आणि लिंबामधील अँटीऑक्सिडंटस् शरीरातील स्निग्धतेला कमी करतात. दरम्यान, शास्त्रज्ञांनी यामुळे लठ्ठपणा कमी होतो, असे कोणतेही विधान केलेले नाही. यामुळे फक्त लठ्ठपणाशी संबंधित आजार आटोक्यात राहतात, असे त्यांनी म्हटले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Weight loss through lime juice