Lung Cancer Stage 1 : दरवर्षी १ ऑगस्ट रोजी ‘जागतिक फुप्फुसाचा कर्करोग दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश फुप्फुसाच्या कर्करोगाबाबत जागतिक स्तरावर जनजागृती करणे हा आहे. जर फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान वेळेवर झाले नाही, तर गाठ (ट्यूमर) वाढत राहते आणि ती जीवघेणी ठरू शकते; म्हणूनच याची लक्षणे लवकर ओळखणे आणि त्वरित उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे आपण या आजाराची पहिली अवस्था आणि त्याआधी दुर्लक्ष न करण्याजोग्या शरीरात दिसणाऱ्या संभाव्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया…
फुप्फुसाच्या कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यातील लक्षणे
श्वास घेण्यास त्रास होणे – अगदी थोडीशी शारीरिक हालचाल करताना किंवा कामे करतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वसनमार्गात द्रव पदार्थ साचल्यामुळे असे घडते.
छाती आणि हाडांमध्ये वेदना – छाती, पाठ आणि खांद्यांमध्ये वेदना जाणवू शकतात. जेव्हा फुप्फुसाचा कर्करोग हाडांपर्यंत पसरतो, तेव्हा असे घडते.
खोकला – अनेक आठवडे न थांबणारा सततचा खोकला हे फुप्फुसांच्या बिघाडाचे लक्षण असू शकते. फुप्फुसांचा कर्करोग (lungs cancer) झाल्यास फुप्फुसे योग्य प्रकारे काम न करण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.
आवाजात बदल – फुप्फुसांच्या कर्करोगामुळे आवाजात बदल होऊ शकतो. त्या व्यक्तीचा आवाज अधिक खोल किंवा घोगरा वाटू शकतो. जरी सामान्य सर्दीमुळेही असे होऊ शकत असले तरीही ही समस्या अनेक आठवडे टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
भूक, वजनातील बदलांसह थकवा – जर तुम्हाला भूक लागत नसेल, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वेगाने वजन कमी होत असेल आणि सतत थकवा जाणवत असेल, तर ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका कोणाला जास्त?
धूम्रपान करणाऱ्यांना फुप्फुसांच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो.
दुसऱ्यांच्या धूम्रपानाच्या संपर्कात आलेल्या लोकांना फुप्फुसांचा कर्करोग होऊ शकतो.
रेडॉन, युरेनियम, डिझेल, सिलिका, कोळशाची उत्पादने आणि विषारी पदार्थ यांसारख्या हानिकारक पदार्थांच्या संपर्कात आल्याने फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला फुप्फुसांचा कर्करोग झाला असेल, तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीलाही तो होऊ शकतो.
फुप्फुसांच्या कर्करोगाचे टप्पे कोणते?
टप्पा ० – फुप्फुसाच्या कर्करोगाच्या या टप्प्यावर फुप्फुसांच्या अस्तरामध्ये असामान्य पेशींची वाढ होऊ लागते.
टप्पा १ – त्यामध्ये गाठ (ट्यूमर) ३ सेंटीमीटरपेक्षा लहान असते आणि ती अजून फुप्फुसांच्या बाहेर पसरलेली नसते.
टप्पा २ – या टप्प्यावर, गाठीचा आकार तीन ते सात सेंटीमीटरदरम्यान असतो आणि ती जवळच्या लसिका ग्रंथी (lymph nodes), विविध संरचना व उतींपर्यंत (tissues) पसरते; मात्र ती इतर अवयवांपर्यंत किंवा दुसऱ्या फुप्फुसापर्यंत अजून पसरलेली नसते.
टप्पा ३ – गाठीचा आकार ५ सेंटीमीटरपेक्षा मोठा होतो किंवा ती आसपासच्या लसिका ग्रंथी (lymph nodes), संरचना आणि अवयवांपर्यंत पसरते.
टप्पा ४ – या टप्प्यावर, कर्करोग दुसऱ्या फुप्फुसात व हृदयाभोवतीच्या द्रवामध्ये आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो.
