Cancer Signs : कर्करोग हा एक गंभीर आजार आहे; वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. प्रत्येक असामान्य लक्षण कर्करोगाचाच संकेत असेल, असे नाही; परंतु असे असले तरीही एखादे लक्षण दीर्घकाळ टिकून राहिले असेल किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय दिसून आले, तर त्याबाबतची नक्कीच तपासणी करून घेतली पाहिजे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सोपे आणि अधिक प्रभावी ठरते. येथे आपण शरीरात दिसणारी सुरुवातीची धोक्याची लक्षणे आणि ती कशी ओळखावीत, याबद्दल माहिती जाणून घेऊयात. ही लक्षणे वेळेत ओळखणे आणि त्वरित उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर आवर्जून सांगतात.

कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वेगाने वजन कमी होणे

जर तुम्ही कोणताही व्यायाम न करता, वेगाने वजन कमी करू होऊ लगले. विशेषतः, वजनात ५ ते १० टक्क्यांची लक्षणीय घट झाली, तर ते फुप्फुस, पोट, स्वादुपिंड (पॅनक्रियाज) किंवा इतर प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

थकवा आणि अशक्तपणा

पुरेशी झोप घेऊनही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय शारीरिक अशक्तपणा वाटत असेल, तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.

दीर्घकाळ टिकणारा ताप

जर तुम्हाला काही दिवस किंवा आठवडे वारंवार ताप येत असेल आणि त्याचे कोणतेही स्पष्ट कारण समजत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका. विशेषतः रक्ताच्या कर्करोगाच्या (ब्लड कॅन्सर) बाबतीत असे घडू शकते.

गाठ तयार होणे

जर स्तन, मान, काखेचा भाग, वृषण किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात एखादी नवीन गाठ आढळली, तर तिची तपासणी नक्की करून घ्या. अशा प्रकारची गाठ अचानक निर्माण होणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

शौच किंवा लघवीतील बदल

दीर्घकाळ बद्धकोष्ठता, वारंवार अतिसार, शौच किंवा लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होणे किंवा लघवी करण्यास अडचण येणे या समस्या सामान्य नाहीत. ही लक्षणे मोठे आतडे, मूत्राशय किंवा पुरुषस्थ ग्रंथीशी संबंधित गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.

रक्तस्राव

खोकल्यातून रक्त पडणे, शौच किंवा लघवीतून रक्त येणे, महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव किंवा शरीराच्या कोणत्याही भागातून न समजण्याजोगा रक्तस्राव होणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

न बरी होणारी जखम किंवा तोंडातील व्रण

जर तोंडातील एखादा फोड, जिभेवरील जखम किंवा शरीरावरील कोणतीही जखम तीन आठवड्यांत बरी झाली नाही, तर ते तोंडाच्या कर्करोगासह इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला त्वरित कधी घ्यावा?

जर एखादे असामान्य लक्षण दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिले, त्याची तीव्रता वाढत गेली किंवा त्यासोबत वजन कमी होणे, रक्तस्राव, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा तीव्र वेदना यांसारखी लक्षणे दिसून आली, तर तुम्ही विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला