तोंडाचा कर्करोग ही भारतातील एक मुख्य समस्या आहे. याचे कारण म्हणजे भारतात तंबाखू, गुटखा खाण्याचे तसेच धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन मोठ्या प्रमाणात आढळते. या सवयींमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण ३० पटींनी वाढते. कर्करोग हे ऐकायला गंभीर वाटत असले तरीही हा आजार एका दिवसात होत नाही तर त्याची पूर्वलक्षणे बरीच आधीपासून दिसतात. या लक्षणांची माहिती असणे, त्याक़डे वेळीच लक्ष देणे आणि लक्षणे आढळल्यास त्यावर योग्य ते उपचार घेणे गरजेचे असते. हा आजार सुरुवातीच्या काळात वेदनारहीत असतो. त्यामुळे तो लक्षात येणे काहीसे कठिण असते. मात्र योग्य प्रकारे लक्ष दिल्यास या आजारापासून सुरक्षा करता येते. या आजाराचे वेळेत निदान झाले तर रुग्ण बचावण्याची शक्यता ६० ते ८० टक्क्यांनी वाढते.
कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे-
यातील अनेक लक्षणे ही कर्करोग नसताना किंवा पूर्वसूचना म्हणून आढळू शकतात. यातील काही लक्षणे असल्यास घाबरुन न जाता योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वतःच निदान न करता तज्ज्ञांना दाखविणे केव्हाही चांगले.
१. तोंडातील पांढरा चट्टा
२. तोंडातील लाल चट्टा
३. तोंडाची आग होणे
४. न भरुन येणारी जखम
५. कोणतेही कारण नसताना अचानक दात हलणे
६. जीभेवरील जखम
७. तोंडात पट्टे तार होऊन तोंड उघडायला त्रास होणे
८. गिळताना वारंवार त्रास होणे
९. तंबाखू, पान, सुपारी ठेवण्याच्या ठिकाणी चट्टा पडणे, आग होणे
१०. तोंड उघडता न येणे, मानेपाशी गाठी येणे आणि त्यांना सुज येणे.
यातील जास्तीत जास्त लक्षणे दिर्घकाळ असतील तर तातडीने मुखरोगनिदानतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तोंडाची काही लक्षणे कर्करोगाची नसली तरी काही होण्यापूर्वीच काळजी घेतलेली केव्हाही चांगली. तसेच व्यसने न करणे हे कर्करोग होऊ नये म्हणून उपयोगाचे असते.
डॉ. प्रियांका साखवळकर, तोंडाचे विकारतज्ज्ञ
diagnosisfirst@gmail.com