5 Foods to Improve Your gut health : आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. काही रोजच्या आहारातील पदार्थ पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, आंबवलेले पदार्थ, भरपूर फायबर असलेल्या डाळी-कडधान्ये आणि काही फळे यांचा आहारात समावेश केल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हे परिचित आणि पौष्टिक पदार्थ ‘गट-फ्रेंडली’ आहाराचा भाग बनू शकतात.

हार्वर्ड, स्टॅनफर्ड आणि एम्स (AIIMS) येथे प्रशिक्षण घेतलेले बोर्ड-प्रमाणित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ञ) डॉक्टर सौरभ सेठी यांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये चांगल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी शिफारस केलेल्या पाच पदार्थांबद्दल सांगितले आहे. त्यांच्या यादीत दही, आंबवलेले पदार्थ, कच्ची केळी, पपई आणि फायबरयुक्त कडधान्ये यांचा समावेश आहे आणि यातील प्रत्येक पदार्थ आतड्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो.

१. दुग्धजन्य पदार्थ

दही आणि ताक या नैसर्गिकरित्या आंबवलेल्या पदार्थांमध्ये फायदेशीर जीवाणू असतात जे आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या विविधतेला (गट मायक्रोबायोम डायव्हर्सिटी) मदत करू शकतात. यामुळे छातीत जळजळ आणि पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्या कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.

२. आंबवलेले पदार्थ

आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे पदार्थातील काही स्टार्च अंशतः तुटतात. त्यामुळे त्यातील काही पोषक घटक शरीराला अधिक सहज उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. तसेच, ही प्रक्रिया आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांसाठीही फायदेशीर ठरू शकते. थोडक्यात, आंबवलेले पदार्थ काही पोषक घटक शरीराला मिळण्याची प्रक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. ज्यासाठी तुम्ही किमची, सॉकरक्रॉट, कांजी आणि इडली यांसारखे पदार्थ खाऊ शकतात.

३. कच्ची केळी

पूर्ण पिकलेल्या केळ्यांच्या तुलनेत कच्या केळ्यांमध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो, जो मोठ्या आतड्यातील फायदेशीर जीवाणूंसाठी इंधन म्हणून काम करतो.ही प्रक्रिया ब्युटिरेटसारखे शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड तयार करण्यास मदत करू शकते, जे मोठ्या आतड्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

४. पपई

पपईमध्ये पॅपेन नावाचे एन्झाइम असते, प्रथिनांच्या पचनास मदत करू शकते आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास साहाय्य करते. तसेच हे फळ बद्धकोष्ठतेवर सुद्धा उपयुक्त ठरू शकते.

५. कडधान्ये

शेवटचा प्रकार म्हणजे तंतुमय पदार्थांनी समृद्ध कडधान्ये, ज्यामध्ये हरभरा, मसूर आणि बीन्स यांचा समावेश होतो. हे पदार्थ प्रीबायोटिक्स म्हणून काम करतात आणि शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड तयार करणाऱ्या जीवाणूंना पोषण देतात. हे जीवाणू, आतड्यांच्या संरक्षक कवचाच्या कार्याला साहाय्य करतात.