Stroke Symptoms In Men : पूर्वी अर्धांगवायू (स्ट्रोक) हा प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींना होणारा आजार मानला जात असे; परंतु आता ३५ ते ५० वयोगटातील पुरुषांमध्ये याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कार्यालयातील दीर्घकाळ बसून करावे लागणारे काम, तणावपूर्ण जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारखे घटक पुरुषांमधील अर्धांगवायूचा धोका वाढवत आहेत. जर अर्धांगवायूची सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखली गेली, तर त्यावर त्वरित उपचार सुरू करता येतात. भारतातील तरुण आणि मध्यमवयीन पुरुषांमध्ये ‘स्ट्रोक’च्या (मेंदूच्या रक्तवाहिनीशी संबंधित विकार) घटनांमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीकडे लक्ष वेधले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया की, स्ट्रोकचा धोका कसा वाढतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती ते…
पुरुषांमध्ये पक्षाघाताचा (स्ट्रोकचा) धोका का वाढतोय?
उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे
उच्च रक्तदाब हे पक्षाघाताचे मुख्य कारण आहे. अनेक पुरुष नियमितपणे रक्तदाब तपासत नाहीत किंवा वेळेवर औषधे घेत नाहीत. दीर्घकाळ अनियंत्रित राहिलेल्या उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
धूम्रपान आणि तंबाखू
सिगारेट आणि तंबाखूमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात (म्हणजेच त्या आकुंचन पावतात) आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. परिणामी, स्ट्रोकचा पक्षाघात ही शरीराची हालचाल न होण्याइतपत झालेली अवस्था; तर ब्रेन स्ट्रोक हे पक्षाघाताचे सर्वांत प्रमुख कारण धोकाही वाढतो.
तणाव
तणाव, अनियमित दिनचर्या, कामाचा दबाव, अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण यांमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदय व मेंदू या दोघांवरही विपरीत परिणाम होतो.
मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल
मधुमेहामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा बाधित होतो आणि ‘स्ट्रोक’चा (मेंदूच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊन होणारा झटका) धोका वाढतो.
शारीरिक हालचालींचा अभाव
दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे, व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा यांसारख्या शारीरिक हालचालींच्या अभावामुळेही ‘स्ट्रोक’चा धोका संभवतो.
‘स्ट्रोक’ची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत?
स्ट्रोकची लक्षणे अचानक दिसून येतात. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो
- चेहऱ्याची एक बाजू खाली झुकणे किंवा लटकणे
- हातामध्ये किंवा पायामध्ये अशक्तपणा किंवा बधीरपणा जाणवणे
- बोलताना किंवा शब्द समजून घेताना अडचण येणे
- अचानक दृष्टी अंधुक होणे किंवा एका डोळ्याची दृष्टी जाणे
- चालताना तोल जाणे किंवा चक्कर येणे, तसेच कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक आणि तीव्र डोकेदुखी होणे
यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, रुग्णाला त्वरित रुग्णालयात नेले पाहिजे. स्ट्रोकच्या उपचारांसाठी सुरुवातीचे ४.५ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्या कालावधीत वैद्यकीय उपचार मिळाल्यास मेंदूचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.
कोणत्या पुरुषांनी विशेष काळजी घेणे आवश्यक?
४० वर्षांवरील ज्या पुरुषांना उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा लठ्ठपणाचा त्रास आहे, त्यांना ‘स्ट्रोक’चा (मेंदूच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊन येणारा झटका) धोका असतो. त्याव्यतिरिक्त तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान करणारे, ज्यांच्या कुटुंबात स्ट्रोकचा इतिहास आहे किंवा ज्यांना हृदयाचे ठोके अनियमित असण्याचा त्रास आहे, त्यांनाही हा धोका असतो.
