Health Benefits of Jackfruit : उन्हाळ्यात विशिष्ट फळांबरोबर भाज्याही उपलब्ध होतात. यात असं एक फळं आहे, ज्याची पिकण्याआधी भाजीदेखील करून खाल्ली जाते, ते म्हणजे फणस. फणसाला उन्हाळी भाजी म्हणूनही ओळखले जाते. काही लोक त्याला शाकाहारी मांस म्हणतात. मटण, चिकनशी तुलना केल्या जाणाऱ्या या भाजीचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते.
कच्च्या फणसाला स्वत:ची फारशी चव नसते, पण भाजी बनवल्यावर त्यात मसाल्यांचा सुगंध आणि स्वाद सहजपणे उतरतो. अगदी चिकनसारखी त्याची चव लागते, त्यामुळे त्याला शाकाहारी मांस म्हणून ओळखले जाते. या उन्हाळी भाजीचे शरीरास कोणकोणते फायदे मिळतात जाणून घेऊ…
फणसातील पोषक तत्त्वे
फणसामध्ये भरपूर फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भाजीत फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ती वजन कमी करण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.
शरीरात पाण्याचे प्रमाण स्थिर ठेवते
पिकलेल्या फणसात पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे उन्हाळ्यात ते खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
बद्धकोष्ठतेपासून आराम
फणसात फायबरचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात अनेकांना डियहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, पण फणसातील फायबरच्या प्रमाणामुळे तो खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
पिकलेला फणस फळ म्हणून खाल्ला जातो. त्यातील अँटीऑक्टिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरारीची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. उन्हाळ्यात जंतू आणि जीवाणूजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो, यामुळे फणस प्रतिकारशक्ती वाढवून हंगामी आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करतो.
वजन कमी करण्यास मदत
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर फणस बिनधास्तपणे खाऊ शकता. त्यात चरबी आणि कोलेस्ट्रॉल नसते, म्हणजे वजन वाढण्याचा धोका नाही.
हाडं होतात मजबूत
फणसात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ज्यांची हाडं कमजोर आहेत ते फणस नक्की खाऊ शकतात, त्यामुळे हाडं मजबूत होतात.
