What Are the Best Travel Snacks for Diabetics : प्रवासादरम्यान अनेक लोक रेल्वे स्टेशनवर मिळणारे समोसे, पकोडे किंवा इतर खाद्यपदार्थ गरम चहाबरोबर खाण्याचा आनंद घेतात. पण, जर तुम्हाला मधुमेह असेल. तर तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लांबच्या प्रवासात जेवणाच्या वेळा बदलू शकतात. त्यातच स्टेशनवर मिळणारे अन्न नेहमीच आरोग्यदायी असेल, असे नाही. म्हणून तुम्ही तुमच्या रेल्वे प्रवासादरम्यान तज्ज्ञांनी शिफारस केलेले काही आरोग्यदायी स्नॅक्स बरोबर ठेवा. त्यामुळे तुमची भूक भागेल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
काही जण बाहेरचं खाणं टाळावं म्हणून घरूनच घरी बनवलेले बटाट्याचे पराठे, पुलाव किंवा इतर स्वादिष्ट पदार्थ बरोबर घेऊन जातात. पण, जेव्हा मधुमेहाचा प्रश्न येतो. तेव्हा केवळ चव महत्त्वाची नसते, तर योग्य वेळी योग्य अन्न खाणे महत्त्वाचे असते.
लांबच्या रेल्वे प्रवासात कधी कधी जेवणाला उशीर होऊ शकतो; तर कधी अचानक भूक लागते. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होण्याचा धोका वाढू शकतो. पण, घरून निघताना थोडी तयारी केल्यास ही समस्या टाळता येते.
द इंडियन एक्स्प्रेसने बोलताना, बंगळुरू येथील एस्टर आरव्ही हॉस्पिटलच्या वरिष्ठ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अदिती प्रसाद आपटे यांनी रेल्वे प्रवासासाठी योग्य ठरू शकतील असे चार पदार्थ सांगितले आहेत.
मीठ, साखर न घातलेले बदाम किंवा अक्रोड
बदाम व अक्रोड यांसारख्या सुक्यामेव्यामध्ये आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने, फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो. हे पदार्थ प्रवासात घेऊन जाणेही सोपे असते आणि ते लवकर खराबसुद्धा होत नाहीत. त्यामुळे हा सर्वांत सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
भाजलेले चणे किंवा शेंगदाणे
भाजलेले चणे किंवा शेंगदाणे हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये प्रथिने व फायबर चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते आणि अति खाण्याचा धोका कमी होतो.
क्रॅकर्स किंवा खाखरा
होल ग्रेन क्रॅकर्स किंवा मल्टीग्रेन खाखरा हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Low GI) असलेले पदार्थ आहेत. त्यामुळे हे अन्न हळूहळू पचते आणि शरीराला ऊर्जा हळूहळू मिळते. त्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) अचानक वाढत नाही, तर ती नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ताजी फळे
सफरचंद व संत्र्यासारख्या फळांमध्ये नैसर्गिक फायबर असते, जे शरीरातील साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते. ती अनेक तास ताजी राहतात, त्यामुळे प्रवासासाठी ते एक चांगला पर्याय आहेत. पण, जास्त पिकलेली केळी आणि आंबे प्रवासात घेऊन जाणे आणि खाणे टाळा.
प्रवास करताना या गोष्टीही ठेवा लक्षात
अदिती प्रसाद आपटे यांच्या मते, मधुमेही रुग्णांनी प्रवास करताना जेवणाच्या वेळांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. स्नॅक्सबरोबर जेवणांमध्ये जास्त अंतर पडत नाही. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी होण्याचा किंवा नंतर वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो.
संपूर्ण धान्य, सुकामेवा, भाजलेले चणे, फायबरयुक्त फळे यांसारखे कमी जीआय (GI) असलेले पदार्थ उत्तम पर्याय आहेत. पण, तळलेले पदार्थ, गोड चहा, बिस्किटे, पॅकबंद स्नॅक्स टाळावेत.
एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोडे थोडे, संतुलित जेवण केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
प्रवासात दिवसभर वारंवार पाणी प्यायला हवे. कारण – डिहायड्रेशनमुळे रक्तातील साखर वाढू शकते.
ज्यूस, शीतपेये, गोड पेये टाळा, चहा, कॉफी मर्यादित प्या. ग्लुकोमीटर, आवश्यक औषधे, शुगर-फ्री ओआरएस, आपत्कालीन परिस्थितीसाठी अशा गोष्टी बरोबर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
ट्रेनमध्ये कोणत्या वस्तू टाळाव्यात?
ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तू मधुमेही रुग्णांसाठी योग्य नाहीत. त्यामध्ये गोड चहा, बिस्किटे, पकोडे, कटलेट सँडविच, बिर्याणी, वडापाव, पॅकेज केलेले स्नॅक्स यांचा समावेश आहे. या पदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, साखर, मीठ, अस्वास्थ्यकर चरबी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते. त्याशिवाय अनेकदा असे पदार्थ शिळ्या तेलात किंवा अतिरिक्त मीठ टाकून बनवलेले असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे ज्यूस, शीतपेये आणि फ्लेवर्ड दूध यांसारखी गोड पेयेदेखील रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकतात. त्यामुळे घरून आणलेले आरोग्यदायी स्नॅक्स, सुकामेवा किंवा ताजी फळे निवडणे हा एक सुरक्षित आणि चांगला पर्याय असू शकतो.
