First Symptoms of Cancer: कधी तुम्हाला अचानक थकवा जाणवतो का? किंवा काही कारण नसताना वजन कमी होतंय, असं वाटतंय? अनेकदा आपण अशा लहानसहान बदलांकडे दुर्लक्ष करतो… पण हाच निष्काळजीपणा कधी मोठ्या धोक्याची चाहूल ठरू शकतो. कारण- कर्करोग हा असा आजार आहे, जो शरीरात हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला अगदी साध्या लक्षणांमागे लपून बसतो.

कर्करोगाचा एकच ठरावीक पहिला संकेत नसतो. तो शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. मात्र, शरीरात होणारे लहान बदलही दुर्लक्षित करू नयेत, असे ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. मनदीप सिंह मल्होत्रा यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाचा एकच ठरावीक ‘पहिला संकेत’ नसतो. तो शरीराच्या कोणत्या भागात निर्माण होतो यावर त्याची लक्षणे अवलंबून असतात. मात्र, काही सूचक बदल असे असतात, जे वेळेत ओळखले, तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. चला, जाणून घेऊया ते धोक्याचे इशारे…

अचानक वजन कमी होणं- सर्वांत पहिला इशारा?

जर तुम्ही कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होत असल्याचं पाहत असाल, तर तो एक महत्त्वाचा इशारा असू शकतो. अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये शरीराची ऊर्जा वेगाने खर्च होते, ज्यामुळे वजन घटू लागतं. सुरुवातीला हा बदल आनंददायी वाटू शकतो; पण त्यामागे गंभीर कारण दडलेलं असू शकतं.

सतत थकवा-विश्रांती घेतली तरी ऊर्जा नाही?

दिवसभर काम केल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे; पण जर पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात ताजेपणा वाटत नसेल, तर तो केवळ सामान्य थकवा नसू शकतो. दीर्घकाळ टिकणारा अशक्तपणा हा कर्करोगाचा लपलेला संकेत असू शकतो.

शरीरात गाठ किंवा सूज- दुर्लक्ष करू नका!

शरीराच्या कोणत्याही भागात गाठ जाणवणं हा सर्वांत स्पष्ट इशारा मानला जातो. विशेषतः ती गाठ हळूहळू वाढत असेल, दुखत नसेल किंवा तिचा आकार बदलत असेल, तर लगेच तपासणी करणे गरजेचे आहे. अनेकदा अशा गाठी सुरुवातीला निरुपद्रवी वाटतात; पण त्या गंभीर आजाराचं रूप धारण करू शकतात.

त्वचेत बदल- लहानसा फरक; पण मोठा संकेत

त्वचेवरचा एखादा मोल (तीळ) अचानक बदलतोय का? त्याचा रंग, आकार किंवा किनार बदलली आहे का? हे संकेत त्वचेच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात. त्वचेतील कोणताही अनोखा बदल दुर्लक्षित करू नये.

सतत खोकला किंवा आवाजात बदल – साधी सर्दी नाही?

जर खोकला अनेक आठवडे थांबत नसेल, आवाज बसलेला वाटत असेल किंवा गिळताना त्रास होत असेल, तर तेही धोक्याचे संकेत असू शकतात. विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांसाठी हे लक्षण अधिक गंभीर ठरू शकते.

वारंवार संसर्ग – कमकुवत रोगप्रतिकार शक्ती?

जर तुम्हाला वारंवार सर्दी, ताप किंवा इतर संसर्ग होत असतील किंवा जखम भरून येण्यासाठी खूप वेळ लागत असेल, तर याचा अर्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. काही प्रकरणांमध्ये हे कर्करोगाशी संबंधित असू शकतं.

महत्त्वाचं काय?- प्रत्येक लक्षण कर्करोगच असतो का?

नाही. वरील सर्व लक्षणे दिसली म्हणजे कर्करोगच झाला आहे, असं नाही; पण ही लक्षणं दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. योग्य वेळी तपासणी आणि निदान केल्यास कर्करोगावर उपचार शक्य आहेत, विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात.

वेळीच पाऊल उचला- जीवन वाचू शकतं!

शरीरात होणाऱ्या कोणत्याही असामान्य बदलांकडे गांभीर्याने पाहा. काही दिवसांपेक्षा जास्त काळ एखादं लक्षण टिकून राहिलं, तर विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा- वेळेत घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

आजच स्वतःकडे लक्ष द्या… कारण- कधी कधी शरीर आधीच इशारा देत असतं.