early heart disease in men below 45 : म्हातारपणात म्हणजे ५० ते ६० वयोगटातील लोकांना दिसून येणारे त्रास आता २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये दिसून येत आहेत. अलिकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका झपाट्याने वाढत आहे. WHO च्या मते, हृदयरोग (CVD) हे जगभरातील मृत्यूचे सगळ्यात पहिले कारण आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, हृदयविकारामुळे (Heart Disease) होणाऱ्या मृत्यूंपैकी (Premature Deaths) सुमारे ८० टक्के मृत्यू आता मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत आहेत; ज्यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
एशियन हॉस्पिटलमधील असोसिएट डायरेक्टर आणि हेड युनिट-II (कार्डियोलॉजी) डॉक्टर एल.के. झा यांच्या मते, ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक वेगाने वाढत आहेत. अनेकदा या आजाराची लक्षणे स्पष्टपणे लक्षणे दिसत नाहीत. ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये लवकर एथेरोस्क्लेरोसिस (रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे), उच्च रक्तदाब, इन्सुलिन प्रतिरोध, उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या वेगाने वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, हे आजार अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय वाढत आहेत.
डॉक्टर झा यांनी स्पष्ट केले की, तरुणांमध्ये हा आजार वाढणारी अनेक कारणे असतात; जी पुढीलप्रमाणे आहेत…
- खराब जीवनशैली, ज्यामुळे हृदयाचे सर्वात जास्त नुकसान होत आहे.
- बसून राहण्याची जीवनशैली हृदयाचा धोका निर्माण करते.
- ताण, खराब झोप, धूम्रपानाच्या सवयी, चयापचय, अनुवांशिक घटक, याव्यतिरिक्त, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि असामान्य कोलेस्टेरॉलची पातळी, पर्यावरणीय प्रदूषण, स्क्रीनसमोर दीर्घकाळ बसणे देखील, जळजळ, चुकीचे अन्नपदार्थ खाणे अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकते.
- हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो.
- हे सर्व सायलेंट घटक आहेत जे रक्तवाहिन्यांना शांतपणे नुकसान करतात आणि हृदयरोगास कारणीभूत ठरतात.
- जर समस्येचे लवकर निराकरण केले नाही तर लहान वयातच हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
तरुण वयात पुरुष या लक्षणांकडे करतात दुर्लक्ष
डॉक्टर झा यांच्या मते सर्वात मोठा धोका असा आहे की, पुरुषांना कमी वयात हार्ट अटॅकची पारंपरिक (क्लासिक) लक्षणे, जसे की तीव्र छातीत दुखणे, नेहमी दिसून येत नाहीत. तरुणांमध्ये हृदयविकाराची काही लक्षणे अशी असतात जी, थकवा, अशक्तपणा किंवा ताण समजून दुर्लक्षित केली जातात.
थकवा, हलक्या शारीरिक हालचाली करताना श्वास घेण्यास त्रास, अपचनाच्या वारंवार तक्रारी, छातीत हलका त्रास, चक्कर येणे, हृदय गती वाढणे किंवा झोपेचा त्रास होणे अशी लक्षणे जाणवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, वेदना छातीऐवजी जबडा, मान, खांदा किंवा पाठीपर्यंत पसरू शकतात. तज्ज्ञांनी सांगितले की, रुग्णाला चिंताग्रस्त वाटणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, सतत थकवा येणे ही हृदयावर वाढत्या दाबाची लक्षणे असू शकतात. जर तरुणांना त्यांच्या शरीरात अशी लक्षणे दिसली तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे समजून घेऊन हृदयरोग टाळू शकता.
या चाचण्या जीवघेण्या आजारांपासून बचाव करू शकतात…
डॉक्टर झा यांनी तरुणांना हृदयरोग टाळण्यासाठी रक्तदाब, लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखरेची चाचणी, बॉडी मास इंडेक्स (BMI) यासारख्या मूलभूत पण महत्त्वाच्या चाचण्या नियमितपणे करण्याचा सल्ला दिला आहे. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) या तपासणीद्वारे हृदयाची धडधड कशी चालू आहे हे पाहिले जाते.या चाचणीमुळे हृदयाची गती (हार्ट रेट), ठोके नियमित आहेत का नाहीत आणि धडधडीत काही बिघाड (असामान्यता) आहे का हे समजू शकते. ही एक साध आणि पटकन होणारी तपासणी आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, हार्ट अटॅक लवकर निदान झाल्यास जीवनशैलीत वेळेवर बदल केले जाऊ शकतात. आवश्यक असल्यास औषधोपचार सुरू करता येतात. जितक्या लवकर आपण जोखीम घटक ओळखू, तितकीच मोठी हृदयविकाराची घटना टाळण्याची शक्यता जास्त असते.
डॉक्टरांचा सल्ला
लेखात दिलेली माहिती केवळ जागरूकता उद्देशाने आहे. जर तुम्हाला कोणतीही लक्षणे आढळली तर स्वतः औषधोपचार करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

